भारताच्या दोम्माराजू गुकेशने वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी कँडिडेट्स ही बुद्धिबळ विश्वातील अत्यंत प्रतिष्ठेची आणि खडतर स्पर्धा जिंकण्याचा चमत्कार केला. या विजयामुळे बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीमध्ये विद्यमान जेता चीनचा डिंग लिरेनशी टक्कर घेण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला. गुकेश हा आजवरचा सर्वांत युवा कँडिडेट्स जेता ठरला. डिंग लिरेनशी सरशी झाल्यास तो बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वांत युवा जगज्जेताही बनू शकेल. त्याच्या या अविस्मरणीय कामगिरीविषयी…
सुरुवातीची आव्हाने…
स्पर्धा सुरू होण्याच्या आधी दोन घटक गुकेशच्या दृष्टीने प्रतिकूल होते. तो या स्पर्धेत सर्वांत लहान (१७ वर्षे) होता. कँडिडेट्ससारख्या महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये अनुभव हा घटक अनेकदा निर्णायक ठरतो. निव्वळ युवा ऊर्जा एका टप्प्यापर्यंत साथ देऊ शकते. ती महत्त्वाची असतेच. पण स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात इतर घटकांचा विचार करण्याची परिपक्वता आवश्यक असते. ती वयानुरूप वाढते. दुसरा प्रतिकूल घटक होता रँकिंगचा. एकूण आठ बुद्धिबळपटूंमध्ये गुकेश २७४३ एलो गुणांसह सहावा होता. त्याच्यापेक्षा अमेरिकेचे फॅबियानो करुआना (२८०३) आणि हिकारू नाकामुरा (२७८९), रशियाचा इयान नेपोम्नियाशी (२७५८) या तीन खेळाडूंकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात होते. नेपोम्नियाशी हा दोन वेळचा कँडिडेट्स जेता आहे. हे तिघे आणि गुकेश अशा चौघांनाही १४व्या म्हणजे अंतिम फेरीत जेतेपदाची संधी होती. त्यात गुकेशने बाजी मारली हे विलक्षण आहे. अंतिम फेरीत गुकेशने नाकामुराला बरोबरीत रोखून ९ गुणांपर्यंत मजल मारली. दुसरीकडे नेमोप्नियाशीविरुद्ध विजयाची संधी करुआनाने दवडली आणि त्यांचा डावही बरोबरीत सुटला. त्यामुळे करुआना, नाकामुरा आणि नेपोम्नियाशी यांना प्रत्येकी ८.५ गुणांपर्यंतच मजल मारता आली आणि गुकेश विजेता ठरला.
हेही वाचा… आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीचा फटका कापसाला बसणार? कापूस उत्पादकांसमोर कोणते पर्याय?
आनंदचा वारसदार…
कँडिडेट्स स्पर्धा ही गेल्या काही वर्षांमध्ये महत्त्वाची ठरू लागली, कारण या स्पर्धेत विजेता ठरणारा आणि ठरणारी बुद्धिबळपटू विद्यमान जगज्जेत्यांचे आव्हानवीर बनतात. भारताचा महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यालाच आतापर्यंत ही स्पर्धा जिंकता आली होती. आनंदने अर्थातच पुढे जाऊन अनेकदा जगज्जेतेपदही मिळवले. त्याने यापूर्वी २०१४मध्ये कँडिडेट्स स्पर्धा जिंकली आणि तो त्या वेळच्या जगज्जेत्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनसमोर आव्हानवीर बनला. दरम्यानच्या काळात भारतीय बुद्धिबळपटूंनी बुद्धिबळ विश्वात लक्षवेधक कामगिरी करण्यास सुरुवात केली होती. आनंदपासून प्रेरणा घेऊन भारत बुद्धिबळातील महासत्ता बनेल, असे गेली अनेक वर्षे बोलले जात आहे. पण आनंदनंतर कोण, या प्रश्नाचे उत्तर चटकन देता येत नव्हते. कारण अनेक गुणवान बुद्धिबळपटू उदयाला आले, तरी त्यांच्यापैकी आनंदप्रमाणे जगज्जेता कोण बनेल, या उत्तराची प्रतीक्षा होती. अवघ्या दहा वर्षांत एखादा बुद्धिबळपटू कँडिडेट्स जिंकून जगज्जेतेपदापासून एका पावलावर येईल, असे नक्कीच वाटले नव्हते. गुकेशने ती प्रतीक्षा संपवली.
कँडिडेट्स स्पर्धेत वाटचाल कशी?
मातब्बर खेळाडूंसमोर भक्कम बचाव आणि तुलनेने कमी रँकिंगवाल्या खेळाडूंसमोर विजयासाठी प्रयत्न करणे अशी गुकेशची व्यूहरचना होती. त्यात तो पुरेपूर यशस्वी ठरला. करुआना, नाकामुरा आणि नेपोम्नियाशी यांच्याविरुद्धचे प्रत्येकी दोन्ही डाव त्याने बरोबरीत सोडवले. अलीरझा फिरूझा या फ्रान्सच्या बुद्धिबळपटूविरुद्ध त्याचा एकमेव पराभव झाला. पण फिरूझावर त्याने परतीच्या लढतीमध्ये मात करून फिट्टंफाट केली. विदित गुजराथी आणि आर. प्रज्ञानंद यांना त्यांनी प्रत्येकी एकेका डावात हरवले, इतर दोन डावांत बरोबरी साधली. तर अझरबैजानचा निजात अबासोव या सर्वांत दुबळ्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध त्याने दोन्ही डाव जिंकले. त्यामुळे या स्पर्धेत तो सातत्याने पहिल्या तीन खेळाडूंमध्ये राहिला. यातून अंतिम टप्प्यात त्याच्यावर कमी दडपण राहिले.
हेही वाचा… विश्लेषण : सर्वाधिक BH मालिका वाहन क्रमांकाची खरेदी पुण्यात का? हा क्रमांक कुणाला मिळू शकतो?
गुकेशचे वैशिष्ट्य काय…
विख्यात महिला बुद्धिबळपटू आणि समालोचक सुसान पोल्गार यांनी म्हटल्याप्रमाणे, गुकेश मानसिकदृष्ट्या अतिशय कणखर आणि त्याच्या वयाच्या मानाने खूप अधिक परिपक्व आहे. बुद्धिबळ पटावरील कोणत्याही निकालाने तो विचलित होत नाही. फिरूझाविरुद्ध विजयी संधी दवडल्यानंतर तो पराभूत झाला, तेव्हा हताश झाल्यासारखा वाटला. परंतु लगेच त्याने स्वतःला सावरले. अंतिम टप्प्यात त्याच्याकडे संभाव्य विजेता म्हणून पाहिले जाऊ लागल्यानंतर मुलाखतींमध्येही त्याने या चर्चेला फार महत्त्व दिले नाही. ग्रेगर गाजेवस्की हा पोलिश बुद्धिबळपटू त्याचा प्रशिक्षक-सहायक (ट्रेनर कम सेकंड) होता. गाजेवस्कीने यापूर्वी आनंदबरोबरही काम केले आहे. त्याचाही प्रभाव गुकेशच्या खेळावर आहे. गुकेश सर्व ओपनिंगमध्ये खेळू शकतो आणि त्याचा एंडगेमही चांगला आहे. अलीकडच्या काळातील वादातीत महान बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनने काही वर्षांपूर्वी गुकेशलाच आनंदचा खरा वारसदार म्हणून संबोधले होते. अर्थात या स्पर्धेत तो विजेता ठरेल, असे कार्लसनलाही वाटले नव्हते.
जगज्जेत्या डिंग लिरेनचे आव्हान…
डिग लिरेनने गतवर्षी याच काळात रशियाच्या इयान नेपोम्नियाशीला हरवून जगज्जेतेपद पटकावले होते. त्याची मजलही बरीचशी अनपेक्षित होती. गेल्या काही महिन्यांमध्ये डिंगच्या खेळात घसरण झाली आहे. त्याच्या तब्येतीच्या तक्रारीही सुरू असतात. विशेष म्हणजे, कँडिडेट्स स्पर्धा जिंकल्यामुळे गुकेश लाइव्ह रँकिंगमध्ये लिरेनच्या वर सरकला आहे. दोघांमधील जगज्जेतेपदाची लढत या वर्षाच्या अखेरीस अपेक्षित आहे. अर्थात डिंगला कमी लेखण्याची चूक गुकेश करणार नाही. गुकेशप्रमाणेच डिंगही विचलित न होणारा, स्थितप्रज्ञ बुद्धिबळपटू म्हणून ओळखला जातो. शिवाय चीनची बुद्धिबळ यंत्रणा त्याच्या पाठीशी उभी आहे. त्याच्याकडे अनुभवही भरपूर आहे. ३१ वर्षीय डिंग लिरेन विरुद्ध १७ वर्षीय गुकेश अशी ही दोन पिढ्यांमधील लढत असेल. वयातील इतकी तफावत यापूर्वी दोनच आव्हानवीरांच्या वेळी पाहायला मिळाली होती. ते होते गॅरी कास्पारॉव (वि. अनातोली कारपॉव) आणि मॅग्नस कार्लसन (वि. आनंद). विशेष म्हणजे दोघेही त्यावेळी सर्वांत युवा जगज्जेते ठरले होते! त्यांचा विक्रम मोडण्याची संधी गुकेशला चालून आली आहे.