अनेक जणांना नियमित माउथवॉश वापरण्याची सवय असते. अनेकदा डॉक्टर्सदेखील माउथवॉश वापरण्याचा सल्ला देतात. परंतु, माउथवॉशच्या वापरामुळे कर्करोगाचा (कॅन्सर) धोका वाढतो, अशी धक्कादायक माहिती एका नवीन अभ्यासात समोर आली आहे. या अभ्यासात लिस्टरीन माउथवॉशचा उल्लेख करण्यात आला आहे. बहुतांश लोकांकडे लिस्टरीन कंपनीचा माउथवॉश असतो, जो प्रत्येक मेडिकलमध्ये मिळतो. हाच लिस्टरीनचा माउथवॉश शरीरासाठी घातक ठरत आहे. जर्नल ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजीमध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, लिस्टरीनचा नियमित वापर केल्याने कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. परंतु, लिस्टरिन माउथवॉशचे उत्पादन करणार्‍या कंपनीने हे दावे फेटाळून लावले आहेत.

“लिस्टरीनच्या वापरामुळे तोंडात आढळणार्‍या काही जिवाणूंची संख्या वाढते. हे जीवाणू अन्ननलिका आणि कोलोरेक्टल कर्करोग, हिरड्यांचे आजार आणि शरीरातील इतर रोगांसाठी कारणीभूत ठरू शकतात”, असे संशोधनात आढळून आले. माउथवॉशच्या वापरामुळे कर्करोगाचा धोका कसा वाढतो? केवळ लिस्टरीन माउथवॉशच शरीरासाठी घातक आहे का? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

हेही वाचा : जपानमध्ये मांस खाणार्‍या जिवाणूचा उद्रेक, ४८ तासांत माणसाचा मृत्यू; हे जीवाणू जगभरात थैमान घालणार?

अभ्यासात काय?

शास्त्रज्ञांच्या संशोधनात असे आढळून आले की, अत्यंत लोकप्रिय असणार्‍या लिस्टरीन माउथवॉशच्या दैनंदिन वापरामुळे शरीरात दोन प्रकारचे जीवाणू तयार होतात. एक म्हणजे फुसोबॅक्टेरियम न्यूक्लिएटम आणि दुसरे म्हणजे स्ट्रेप्टोकोकस एंजिनोसस. हे दोन्ही जीवाणू कर्करोगाशी संबंधित आहेत. फुसोबॅक्टेरियम न्यूक्लिएटम पीरियडॉन्टल रोग म्हणजेच हिरड्यांच्या रोगांशी संबंधित आहे. या जिवाणूंचा प्रभाव वाढल्यास तोंडात जळजळ आणि ट्यूमरदेखील होऊ शकतो; ज्यामुळे कोलोरेक्टल कर्करोग होण्याचा धोका वाढतो. हा जीवाणू ऊतींवर परिणाम करतो, ज्यामुळे संपूर्ण शरीराच्या आरोग्यावर याचा परिणाम होतो.

तर, स्ट्रेप्टोकोकस एंजिनोसस हा स्ट्रेप्टोकोकस एंजिनोसस ग्रुप (एसएजी) चा एक भाग आहे. स्ट्रेप्टोकोकस गटातील जीवाणू शरीरासाठी अतिशय घातक असतात. ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते, त्यांच्यावर हे जीवाणू अधिक लवकर परिणाम करतात. हे जीवाणू सामान्यतः पोट आणि आतड्यांमध्ये आढळून येतात. “संशोधनातील हे निष्कर्ष सूचित करतात की, लिस्टरीन माउथवॉशचा नियमित वापर शरीरासाठी घातक ठरू शकतो. बाजारात अल्कोहोलचे प्रमाण असणारे माउथवॉश मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. तोंडाची दुर्गंधी येऊ नये म्हणून किंवा हिरड्यांचे आजार टाळण्यासाठी त्यांचा दररोज वापर करू शकतात, परंतु त्यांनी याच्या परिणामांबद्दलदेखील जागरूक असले पाहिजे ”, असे अभ्यासाचे पहिले लेखक डॉ. जोलिन लॉमेन यांनी ‘टेलिग्राफ’ला सांगितले.

इतर माउथवॉश सुरक्षित आहेत का?

हा अभ्यास केवळ लिस्टरीन माउथवॉशचा होता, परंतु अभ्यासावर काम करणार्‍या बेल्जियममधील इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनचे शास्त्रज्ञ प्राचार्य ख्रिस केन्यॉन यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आणि सांगितले की, अल्कोहोलचे प्रमाण असणारे इतरही माउथवॉशच्या वापरामुळे जीवाणू आढळू शकतात. “लोकांनी शक्य असल्यास माउथवॉश वापरणे टाळावे आणि जर ते वापरत असतीलच तर त्यांनी अल्कोहोल नसणारे माउथवॉश वापरावे. तसेच दररोज न वापरता माउथवॉशचा वापर मर्यादित ठेवावा”, असे केन्यॉन यांनी ‘टेलिग्राफ’ला सांगितले.

हेही वाचा : आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या जोशीमठचे नामांतर; कारण काय? या जागेचे धार्मिक महत्त्व काय?

लिस्टरीन माउथवॉशमध्ये सुमारे २० टक्के अल्कोहोलचे प्रमाण आहे. परंतु, तज्ज्ञांच्या मते हे प्रमाण दुर्गंधी दूर करण्यासाठी पुरेसे नाही, पण या प्रमाणामुळे आजार नक्की उद्भवू शकतात. माउथवॉश केवळ एक संरक्षक घटक म्हणून वापरले जाऊ शकते. त्यामुळे अभ्यासातील संशोधकांच्या सल्ल्यानुसार अल्कोहोल नसलेले माउथवॉश वापरावे. दरम्यान, लिस्टरीन माउथवॉशचे उत्पादन करणार्‍या केनव्ह्यू कंपनीच्या एका प्रवक्त्याने ‘डेली मेल’ला सांगितले, “आमच्या अभ्यासानुसार या संशोधनातील माहिती, कोणताही निष्कर्ष काढण्यास पुरेशी नाही.”