Viking skeletons found: मध्य डेन्मार्कमधील एका गावात पुरातत्त्व अभ्यासकांनी एक महत्त्वपूर्ण शोध लावला आहे. या शोधामुळे वायकिंग युगाबद्दल अधिक माहिती उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका ऐतिहासिक दफनभूमीत सुमारे ५० अत्यंत चांगल्या स्थितीत जतन केलेले सांगाडे सापडले आहेत. बोर लुंडो यांनी या स्थळावर उत्खनन केले आहे. ते म्हणतात, ‘हा शोध खूपच रोमांचक आहे. कारण आम्हाला खूप चांगल्या स्थितीत जतन झालेले मानवी सांगाडे सापडले आहेत. इतरवेळी दफनांमध्ये काही दात सापडले तरी आम्ही स्वतःला नशीबवान समजतो. परंतु इथे तर आम्हाला संपूर्ण सांगाडे सापडले आहेत.
म्युझियम ओडेन्सेमधील तज्ज्ञांनी सांगितले की, या सांगाड्यांचे संरक्षण मातीतील अनुकूल रासायनिक घटकांमुळे झाले. विशेषतः चुनखडी आणि पाण्याची उच्च पातळी यामुळे झाले. ही जागा गेल्या वर्षी सर्वेक्षणादरम्यान सापडली. या सर्वेक्षणादरम्यान ओडन्सेच्या ईशान्येला पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आसूम गावाच्या बाहेरील भागात वीजवाहिनांच्या नूतनीकरणाचे काम सुरू होण्यापूर्वी सर्वेक्षण सुरू होते. ओडन्से डेन्मार्कमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. तज्ज्ञांना आशा आहे की, या सापडलेल्या सांगाड्यांची डीएनए चाचणी होईल. त्यामुळे नव्याने इतिहास समजण्यास मदत होणार आहे. शिवाय अभ्यासक वायकिंगच्या सामाजिक पद्धतींचा अभ्यास करणार आहेत. त्यात वायकिंगचे नातेसंबंध, स्थलांतर आणि इतर सामाजिक गोष्टींचा समावेश असणार आहे.
या शोधामुळे शास्त्रीय अभ्यासाला वाव मिळणार आहे, असे बोरे लुंडो म्हणाले. गेली कित्येक शतकं हे अवशेष चिखलमय जमिनीत तग धरून होते. “आम्हाला आशा आहे की, आम्ही सर्व सांगाड्यांचे डीएनए विश्लेषण करू शकू आणि ते एकमेकांशी संबंधित आहेत का आणि ते कुठून आले आहेत हे पाहू शकू.” वायकिंग युग इ.स. ७९३ ते १०६६ या कालावधीतील मानले जाते. दरम्यान वायकिंग म्हणून ओळखले जाणारे नॉर्स लोक मोठ्या प्रमाणावर लूटमार करत होते. त्यांनी युरोपभर वसाहती निर्माण केल्या, प्रदेश जिंकले आणि व्यापार केला. इतकेच नव्हे तर ते उत्तर अमेरिकेपर्यंतही पोहोचले. आसूम येथे सापडलेले वायकिंग कदाचित योद्धे नव्हते. बोरे लुंडो यांना विश्वास आहे की, या स्थळावर कदाचित एक साधारण वस्ती होती. कदाचित हा एक शेती करणारा समुदाय असावा. हे स्थळ आता मध्य ओडन्सेमध्ये असलेल्या एका किल्ल्यापासून पाच किलोमीटर अंतरावर स्थित आहे. या दोन हजार चौरस मीटरच्या दफनभूमीत पुरुष, महिला आणि मुलांचे अवशेष आहेत. सांगाड्यांव्यतिरिक्त काही दहन केलेले अवशेष देखील सापडले.
सामाजिक स्थिती समजण्यास मदत होते
एका कबरीत एका महिलेला वॅगनमध्ये दफन करण्यात आले होते. वायकिंग वॅगनचा वरचा भाग ताबूत म्हणून वापरला गेला होता. याचा अर्थ ती समाजाच्या वरील वर्गातील होती, असे बोरे लुंडो यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले. पुरातत्त्वज्ञांना दफनांमध्ये ब्रुचेस, मण्यांच्या माळा, शस्त्र आणि काचेचे तुकडे देखील सापडले आहेत. हा तुकडा कदाचित तावीज म्हणून वापरण्यात आला असावा. बोरे लुंडो म्हणाले की, ब्रुचेसच्या डिझाइनवरून असे सूचित होते की, या मृतांचे दफन ८५० ते ९०० इ.स. दरम्यान झाले होते. दफनातून मृत व्यक्तींचा सामाजिक स्तर दिसतो. या स्थळावर काहींच्या दफनात काहीच नाही तर काहींकडे ब्रुचेस आणि मोत्याच्या माळा आहेत.
पुरातत्त्वज्ञ म्हणतात की, “दफनामध्ये सापडलेल्या अनेक वस्तू डेन्मार्कच्या सीमांच्या पलीकडील प्रदेशांमधून आलेल्या आहेत. त्यामुळे १० व्या शतकातील वायकिंग व्यापारी मार्गांचा मोठा उलगडा होतो. या कालखंडात बऱ्याच व्यापारी घडामोडी सुरू होत्या,” असे बोरे लुंडो म्हणाले.”आम्हाला गोतलंड बेटावरून आलेले एक ब्रुच देखील सापडले. गोतलंड हे स्वीडनच्या पूर्व भागात आहे. तसेच सुरीच्या पात्याला धार करण्यासाठी वापरले जाणारे धारदार दगड देखील सापडले आहेत. विविध प्रकारच्या वस्तू नॉर्वे आणि स्वीडनकडे निर्देश करतात.” दफन स्थळ गेल्या वर्षी सापडले आणि एप्रिलमध्ये सुरू झालेले उत्खनन या महिन्यात संपले. वस्तूंची खोकी म्युझियम ओडेन्सेच्या संरक्षक प्रयोगशाळेत स्वच्छता आणि विश्लेषणासाठी पाठवण्यात आली आहेत. संरक्षक जॅनी आम्सगार्ड एब्सेन यांना आशा आहे की, मातीमध्ये ब्रुचेसच्या मागील भागांवर किंवा सुरीच्या दांड्यांवर जतन केलेले अन्य पदार्थ देखील सापडू शकतात. “आम्हाला खरोखरच मोठे चित्र समजून घेण्याची आशा आहे. तिथे राहणारे लोक कोण होते? त्यांचा कोणाशी संवाद होता?” असे ते म्हणाले. “हे थोडेसे जिगसॉ पझलसारखे आहे. सर्व विविध पझलचे तुकडे एकत्र ठेवले जातील,तेव्हा चित्र स्पष्ट होईल.”
अधिक वाचा: World Cotton Day 2024: भारतीय वस्त्रोद्योगाला ब्रिटिशांनी लावला सुरुंग; नेमके काय घडले?
वायकिंग कोण होते?
युरोपच्या इतिहासात इसवी सनाच्या ८ व्या ते ११ व्या शतकाच्या दरम्यान स्कँडिनेव्हियातील वायकिंग प्रसिद्ध होते. कुशल योद्धे, समुद्रप्रवासी आणि व्यापारी अशी त्यांची ओळख होती. वायकिंग समाजाने त्यांच्या दीर्घ, जलद जहाजांच्या मदतीने समुद्र मार्गे लांबवर प्रवास केला आणि वेगवेगळ्या ठिकाणी आक्रमणे, व्यापार आणि वसाहती स्थापन केल्या. वायकिंग संस्कृती आणि जीवनशैली ही युद्धकला, निडरतेसाठी आणि अज्ञात प्रदेशांच्या शोधासाठी प्रसिद्ध होती. वायकिंग शब्दाचा अर्थ “समुद्री चाच्यांशी संबंधित” किंवा “छापा मारणारा” असा होतो. त्यांनी स्कँडिनेव्हियातून बाहेर पडून इंग्लंड, आयर्लंड, फ्रान्स, आणि अगदी रशियापर्यंत जाऊन व्यापार आणि आक्रमणे केली.
त्यांची प्रसिद्ध छापेमारी
इसवी सन ७९३ मध्ये इंग्लंडमधील लिंडिसफार्न चर्चवर टाकलेला छापा हीच वायकिंग युगाची सुरुवात मानली जाते. वायकिंग लोकांनी केवळ लुटालूटच केली नाही तर त्यांनी अनेक ठिकाणी व्यापारी मार्ग निर्माण केले, आयसलँड, ग्रीनलँड, आणि काही काळासाठी अमेरिकेतील न्यूफाऊंडलँड अशा नव्या प्रदेशांत वसाहती स्थापन केल्या. त्यांची धार्मिक श्रद्धा मुख्यतः नॉर्स देवतांवर आधारित होती, ज्यात ओडिन, थॉर, आणि लोकी यांसारख्या देवांचा समावेश आहे. वायकिंग काळाचा शेवट ११ व्या शतकाच्या उत्तरार्धात झाला. जेव्हा ख्रिस्तिकरण आणि युरोपातील सत्तेची बदलती परिस्थिती यामुळे त्यांचा प्रभाव कमी झाला.