Evolution of Dattatreya’s Trimurti: दत्ताचे वर्णन विविध स्वरूपात केले जाते. त्रिमुख-षड्भुज दत्ताचे स्वरूप आज जनमानसात प्रचलित आहे. यारूपात दत्तात्रेयांच्या मागे गाय आणि चार श्वान दर्शवले जातात. गाय हे पृथ्वीचे प्रतीक आहे, तर चार श्वान चार वेदांचे प्रतीक मानले जातात. परंतु, प्राचीन उपासक एकमुखी दत्ताचीच पूजा करत होते. महाभारत, पुराण, अर्वाचीन उपनिषदांमध्येही दत्ताच्या केलेल्या वर्णनात मूर्ती त्रिमुखी नसून एकमुखीच असल्याचे आढळते. प्राचीन मूर्तिविज्ञान शास्त्रातही एकमुखी दत्ताचेच संदर्भ अढळतात. किंबहुना मध्ययुगीन कालखंडात होऊन गेलेले चांगदेव राऊळ यांचे गुरु एकमुखी दत्तच आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्रिमुखी दत्ताची उपासना कधी सुरु झाली याचाच घेतलेला हा आढावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जातीय व धार्मिक समन्वयाचा दत्त संप्रदाय

भारतीय संस्कृतीत विशेषतः महाराष्ट्रात दत्त उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शैव, वैष्णव आणि शाक्त अशा तीनही प्रमुख उपासनाप्रवाहांमध्ये दत्ताचा प्रभाव आढळून येतो. विशेष म्हणजे या प्रवाहांच्या गुरुस्थानी असलेले दत्ताचे स्थान त्यांचे या उपासना मार्गांमधील महत्त्व स्पष्ट करते. गेली बाराशेहून अधिक वर्ष दत्त आणि दत्त संप्रदाय भारतीय भक्ती मनावर अविरत राज्य करत आहे. महाराष्ट्रात दत्तभक्तीचा प्रसार जातीभेदातीत, संप्रदायातीत, किंबहुना धर्मातीत आहे. या संप्रदायात दत्तात्रेयाला श्रध्येय मानणाऱ्या उपासकांत हिंदूंबरोबर मुस्लिम समाजाचाही समावेश आहे.

अधिक वाचा: Kalyan Durgadi Fort: दुर्गाडी किल्ल्याचा मुद्दा वादग्रस्त; पण कल्याणचा २००० वर्षांचा प्राचीन इतिहास काय सांगतो? 

दत्त हे कोणत्याही एका पंथाचे नाहीत

दत्त हे उपास्यदैवत मानणाऱ्या धर्मपंथाची मुळे पंधराव्या शतकात नरसिंह सरस्वतींमुळे रुजली, असं असलं तरी दत्त हे एका कोण्या पंथाचे नाहीच. दत्त हे योग आणि तंत्रमार्गातील आचार्य मानले जातात. अवधूतगीता, त्रिपुरोपास्तिपद्धति, आणि परशुरामकल्पसूत्रम् हे त्यांच्याशी संबंधित ग्रंथ आहेत. दत्ताचे एकाक्षरी, षडक्षरी, अष्टाक्षरी, आणि दत्तगायत्री असे विविध मंत्र आहेत. दत्ताला अवधूत जोगी म्हणून ओळखले जाते त्यामुळे नाथ संप्रदायातही त्यांची उपासना होते. म्हणूनच नाथ संप्रदायालाही ‘अवधूत पंथ’ असेही म्हटले जाते. महानुभाव पंथाचे आदिकारण दत्तच असल्याचे चक्रधर स्वामींनी म्हटले आहे. महानुभाव पंथाच्या सूत्रपाठ व लीळाचरित्र आदिग्रंथांमध्ये दत्तमाहात्म्याचे वर्णन आहे. वारकरी संप्रदायातील संत तसेच आनंद संप्रदायातील साधकांनी दत्ताविषयी आदर व्यक्त केला आहे. चैतन्य संप्रदायात एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेल्या भैरव अवधूत नावाच्या सद्पुरुषाने ज्ञानसागर नावाच्या ग्रंथाद्वारे दत्तोपासनेचा प्रचार केला. दत्तोपासना प्राचीन काळापासून होत असली तरी तिला संप्रदायाचे स्वरूप नरसिंह सरस्वती यांच्या प्रभावामुळे मिळाले. दत्ताचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ तर दुसरे अवतार नरसिंह सरस्वती मानले जातात. जनार्दन स्वामी, एकनाथ, दासोपंत, मुक्तेश्वर, निरंजन रघुनाथ, माणिक प्रभू, अक्कलकोटचे स्वामी, वासुदेवानंद सरस्वती अशा महापुरुषांनी दत्त संप्रदायाची परंपरा पुढे नेली.

भारतीय संस्कृतीतील त्रिमूर्ती

आज जनमानसात प्रसिद्ध असलेली दत्त मूर्ती किंवा ओळख ही त्रिमूर्ती आहे. त्यामुळे दत्ताच्या त्रिमुखी मूर्तीचे रहस्य धुंडाळत असताना देवतेची त्रिमुखी मूर्ती भारतीय संस्कृतीत कधीपासून घडवण्यास सुरुवात झाली हे जाणून घेणं गरजेचं ठरतं. प्रसिद्ध अभ्यासक रा. चिं. ढेरे यांनी त्यांच्या ‘दत्त संप्रदायाचा इतिहास’ (१९९९) या पुस्तकात दिलेल्या संदर्भानुसार, भारतीय परंपरेतील त्रिमूर्ती ही संकल्पना ब्रह्मा-विष्णू-महेशात्मक आहे. या त्रिदेवांच्या अस्तित्त्वातून उत्पत्ती-स्थिती-लय या अवस्था आणि सत्त्व, रज, तम हे त्रिगुण सूचित होतात. तरीही मूर्तिविज्ञानाच्या दृष्टिकोनातून इतिहास पाहता वेदांमध्ये त्रिमूर्तीचे मूळ आढळत नाही. कारण तीनही देवांपैकी फक्त रुद्र आणि विष्णू यांचे संदर्भ वेदांमध्ये सापडतात. तर त्यांच्या तुलनेत इंद्रादी देवतांना अधिक महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा समावेश करणारी मूर्ती वेदवाङ्मयात नाही. आज प्रसिद्ध असलेल्या त्रिमूर्तीचा पहिला उल्लेख मैत्रायणी उपनिषदात आढळतो. या उपनिषदाची रचना सर्व अर्वाचीन उपनिषदात प्राचीनतम समजली जाते.

त्रिमूर्ती आणि सिंधू संस्कृती

सिंधू संस्कृतीतीत सापडलेल्या अवशेषांच्या माध्यमातून शिव ही देवता वेदपूर्व काळापासून भारतीय संस्कृतीत रुजल्याचे काही अभ्यासक मानतात. लिंग आणि मूर्ती अशा दोन्ही स्वरूपात शिवाची उपासना होत असावी. वेदांमधील रुद्र आणि वेदपूर्व लिंगोपासना यांच्या समन्वयातून पुढे पुराणकालीन शिव देवता आकारास आली. सिंधू संस्कृतीतील शिव हा पशुपती, महायोगी आहे. सिंधू कालीन एका मृण्मय मुद्रेवर असलेल्या योग्याच्या प्रतिमेची ओळख शिव अशी करण्यात आली आहे. ही प्रतिमा पशुपती शिव म्हणून ओळखली जाते. हा शिव त्रिमुखी असल्याचे मत अभ्यासक व्यक्त करतात.

शिवाची त्रिमुख प्रतिमा उत्पत्ती-स्थिती-लय या अवस्थांची निदर्शक आहे. याचा अर्थ सिंधू संस्कृतीतही या तीन अवस्था आणि त्यांचे मूर्त स्वरूप ज्ञात असल्याचे सूचित होते. याशिवाय पुढील काळात शिवाच्या त्रिमुखी प्रतिमांचा आढळ अनेक ठिकाणी झाला. या त्रिमुखी शिवाच्या अनुकरणांतून ब्रह्मा-विष्णू-महेशात्मक त्रिमूर्तीचा उद्भव झाला असावा, असे मानले जाते. उत्तरकामिकगम, रुपावतार, रुपमंडन, शिल्परत्न इत्यादी ग्रंथात त्रिमूर्तीची मूर्तिंवैज्ञानिक वर्णने आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेशात्मक मूर्तीतही तीन भेद आढळून येतात. शैवप्रधान, विष्णूप्रधान आणि ब्रह्माप्रधान मूर्ती आढळून येतात. म्हणजेच ज्या देवतेला प्राधान्य द्यायचे असते तिचे शीर मध्यभागी असते.

त्रिमूर्ती भारताच्या दार्शनिक चिंतनाचे महनीय प्रतीक

रा. चिं. ढेरे यांनी म्हटले आहे की, जीव-जगत-जगदीश्वर ही त्रितत्त्वे, सत्त्व-रज-तम हे त्रिगुण, स्वर्ग-मृत्यू-पाताळ हे त्रिलोक, आधिभौतिक-आधिदैविक-आध्यात्मिक हे त्रिताप, कायिक-वाचिक-मानसिक ही त्रिपते, भूत-भविष्य-वर्तमान हे त्रिकाळ, वात-पित्त-कफ हे त्रिदोष, ज्ञान-कर्म-भक्ती हे त्रियोग इत्यादी अनेक त्रिकांप्रमाणे जन्म पावलेली त्रिमूर्ती भारताच्या दार्शनिक चिंतनाचे महनीय प्रतीक ठरली. मैत्रायणी उपनिषदांत ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र ही एकाच अव्यक्ताची अंगे असून ती सत्व, रज, तमाची प्रतीके होत असे म्हटले आहे. ब्रह्मोपनिषदात “तत्र चतुष्पादं ब्रहम विभाति । जागरिते ब्रह्मा स्वप्ने विष्णु: सुषुप्तौ रुद्रस्तुरीयमक्षम् । असा त्रयीचा उल्लेख आहे. रुद्रहृदयोउपनिषदातही त्रिमूर्तीचे वर्णन आढळते. तर कालिदासाच्या कुमारसंभवात ब्रह्मदेवाच्या त्रिमूर्ती स्वरूपाचा उल्लेख आहे.

अधिक वाचा: Indian Navy Day 2024: छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक का मानले जाते?

दत्त त्रिदेवांचा एकरस अवतार

नंतरच्या कालखंडात भारतीय संस्कृतीतील आद्य त्रिमूर्तीचे आणि दत्ताचे एकीकरण घडून आले. १२ व्या शतकापर्यंत दत्त हे एकमुखीच होते. पुढे इसवी सनाच्या पंधराव्या शतकात सरस्वती गंगाधर यांनी लिहिलेल्या गुरुचरित्रात मात्र दत्त स्वरूप त्रिमूर्ती मानले आहे. हा बदल घडून यायला त्रिमूर्तीत समाविष्ट असणाऱ्या तीनही देवतांचा आशीर्वाद कारणीभूत आहे. दत्तात्रेयांच्या मूर्तीच्या मध्यभागी विष्णूची प्रतिमा आहे. अत्री ऋषींना या तीनही देवतांपासून अंशभूत असे तीन पुत्र झाले. ब्रह्म देवापासून चंद्र, विष्णूपासून दत्त, शिवापासून दुर्वास झाले असले तरी विष्णूअवतार म्हणून दत्ताचा महिमा पुरांणांनी गायला आहे. या पुत्रांपैकी दत्तच अत्री ऋषींच्या घरी राहिले आणि चंद्र, दुर्वास निघून गेले. दत्ताच्या तुलनेत चंद्र-दुर्वासांना गौणता लाभली. पुढे चंद्र आणि दुर्वास लोकमानसांत विस्मृत होत गेले. दत्त मात्र ब्रह्म, विष्णू आणि शिव यांचा एकरस अवतार ठरले. याच एक रूपतेचे द्योतक म्हणून भागवत पुराणात आढळणारी कथा महत्त्वाची ठरते. या कथेत म्हटले आहे की, अत्री ऋषींनी पुत्र प्राप्तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर तपश्चर्या केली. हे तप विष्णुरूपी पुत्र प्राप्त व्हावा या अपेक्षेने करण्यात आलेले होते. परंतु प्रत्यक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश ते तीनही देव प्रकटले. अत्रींनी तीनही देवांची स्तुती करून प्रश्न विचारला तुम्हा पैकी ज्या एकाला मी बोलावले तो कोण? ..त्यावर त्रिदेव उत्तरले..तू ज्या एका तत्त्वाचे ध्यान करत आहेस, त्याचेच आम्ही अंशभूत आहोत. मूलतः दत्त हा विष्णूचाच अवतार आहे असे भागवतकरांचे मत असूनही त्यांनी प्रत्यक्षात या देवता त्रयींना दत्तात्रेयाच्या रूपात स्वीकारले आहे.

त्रिमूर्तीचे दत्तात्रेयाशी एकरूप होण्यापूर्वी ती केवळ तात्त्विक आणि कलात्मक संकल्पना होती. तिचे नामकरण, चरित्र आणि उपासना पद्धती ठरलेली नव्हती. मात्र, भक्तिपूर्ण लोकमानसाने ब्रह्मा, विष्णू, आणि महेश या त्रिमूर्तीची आणि त्यांच्या आशीर्वादाने जन्मलेल्या दत्तात्रेयांची सांगड घालून विशिष्ट स्वरूप आणि स्थान दिले. हे स्थान भारतीय संस्कृतीतील विविधतेत एकता या मूलतत्वाचे समन्वय करणारे ठरले आहे .

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dattatreya jayanti 2024 evolution of trimurti from the sindhu civilization vedas and guru charitra svs