मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वुर राणाला अखेर भारतात आणण्यात आले. राष्ट्रीय तपास संस्थेने राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण केले. डेव्हिड कोलमन हेडलीसोबत काम करणारा ६४ वर्षीय कॅनेडियन नागरिक राणा याला गुरुवारी एका विशेष विमानाने दिल्लीत आणण्यात आले. त्यानंतर आता राणा विरुद्ध एनआयए या खटल्यावर सर्वांचं लक्ष केंद्रित झालं आहे. हा खटला चालवणारे दोन वकील आहेत – दयान कृष्णन आणि नरेंद्र मान. कोण आहेत हे दोन वकील? त्यांची माहिती जाणून घेऊ…

कोण आहेत दयान कृष्णन?

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, दयान कृष्णन हे भारतातील सर्वांत अनुभवी वकिलांपैकी एक आहेत. त्यांना सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांचा वर्षानुवर्षे अनुभव आहे. कृष्णन यांनी १९९३ मध्ये नॅशनल स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटीमधून पदवी प्राप्त केली आहे. कृष्णन यांनी वरिष्ठ वकील व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश संतोष हेगडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कायदेशीर कारकि‍र्दीला सुरुवात केली. १९९९ मध्ये त्यांनी वकिली सुरू केली. त्याच वर्षी त्यांनी न्यायमूर्ती जे. एस. वर्मा आयोगात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यानंतर त्यांनी संसदेवरील हल्ल्याचा खटला, कावेरी पाणी वाद, २०१२ मधील दिल्ली सामूहिक बलात्कार व खून खटल्यांसह अनेक गाजलेल्या प्रकरणांवर काम केले. २०१४ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने कृष्णन यांना वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केले होते.

तहव्वुर राणा विरुद्ध राष्ट्रीय तपास संस्थेच्या खटल्याचे नेतृत्व करणारे दयान कृष्णन

दी इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, कृष्णन हे प्रत्यार्पण कायद्यातील तज्ज्ञ आहेत. त्यामुळेच त्यांनी अमेरिकेत राणाविरुद्धच्या अनेक प्रकरणांमध्ये पुढाकार घेतला. कृष्णन यांनी हेडलीच्या प्रत्यार्पणासाठी विशेष सरकारी वकील म्हणून काम केले. तसेच माजी नौदल अधिकारी रवी शंकरन यांच्या प्रत्यार्पणासाठी सीबीआयचे विशेष वकील म्हणून काम केले. अमेरिकेत हेडलीची चौकशी करणाऱ्या टीममध्ये कृष्णन काम करीत होते. तसेच त्यांनी दिल्ली पोलीस आणि भारतीय कुस्ती महासंघासारख्या अनेक सरकारी संस्थांचे प्रतिनिधित्व केले आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राणाचे भारतात सुरक्षितरीत्या प्रत्यार्पण करून घेण्यात कृष्णन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या कारवाईत कृष्णन यांच्याबरोबर राणाचे वकीलपत्र घेतलेले प्रत्यार्पण कायदेतज्ज्ञ पॉल गार्लिक क्युसी यांची जोरदार कायदेशीर लढाई झाली. गार्लिक यांनी यावेळी असा युक्तिवाद केला की, हा दुहेरी धोक्याचा खटला आहे. त्यावर कृष्णन यांनी म्हटले की आरोपीचे वर्तन परिस्थिती ठरवीत नाही, तर गुन्ह्यातील घटक ठरवतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. कायदेशीर भाषेत दुहेरी धोक्याचा अर्थ आहे की, एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा होणे. दोन्ही पक्षांच्या या युक्तिवादानंतर न्यायालयाने अखेर कृष्णन यांना साथ दिली.

कोण आहेत नरेंद्र मान?
दी इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ५८ वर्षीय नरेंद्र मान हे माजी सीबीआय वकील आहेत. मान यांनी जानेवारी २०११ ते २०१९ पर्यंत दिल्ली उच्च न्यायालयात विशेष सरकारी वकील म्हणून सीबीआयचे प्रतिनिधित्व केले आहे. राणाच्या प्रकरणात त्यांना तीन वर्षांसाठी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. १९९० मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून मान यांनी पदवी प्राप्त केली.
बोफोर्स प्रकरण, २०१८ मधील एसएससी पेपरफुटी, जैन डायरी हवाला घोटाळा, कॉमनवेल्थ गेम्स व एआयसीटीई घोटाळा यांसारख्या अनेक गाजलेल्या प्रकरणांमध्ये वकील म्हणून त्यांनी काम केले आहे. १९७५ मध्ये भारताचे सरन्यायाधीश ए. एन. रे यांच्या हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणातही त्यांनी भूमिका बजावली आहे. सरकारी वकिलांमध्ये एनआयएच्या वकिलांसह वकील संजीवी शेषाद्री आणि श्रीधर काळे यांचाही समावेश आहे.

विशेष सरकारी वकील नरेंद्र मान

एनआयएचे पथक तहव्वुर राणाला भारतात आणण्यासाठी मागच्या रविवारीच अमेरिकेत पोहोचले होते. मंगळवारी त्यानंतर ८ एप्रिलला संध्याकाळीच लॉस एंजेलिसमध्ये उपमहानिरीक्षक जया रॉय यांनी राणाला ताब्यात घेण्यासाठी सरेंडर वॉरंटवर स्वाक्षरी केली. त्यानंतर भारतीय पथकाने बुधवारी सकाळी राणाला विशेष विमानाने भारताकडे रवाना केले होते. दरम्यान, प्रत्यार्पणाच्या या कारवाईत तीन गुप्तचर अधिकाऱ्यांनीही सहकार्य केल्याची माहिती आहे. एनआयएचे महानिरीक्षक आशीष बत्रा आणि उपमहानिरीक्षक जया रॉय यांनीही राणाची प्रत्यार्पण प्रक्रिया पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
दरम्यान, तहव्वुर राणा हा पाकिस्तानी-कॅनेडियन नागरिक आहे. तो अमेरिकेत राहत होता. अमेरिकेच्या सुरक्षा दलांनी त्याला विविध दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असल्याबाबत दोषी ठरवले होते. राणाचा खटला दिल्ली कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे वकील पीयूष सचदेवा लढविणार आहेत.