गुजरातमध्ये चांदीपुरा हा विषाणू पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा विषाणू प्रामुख्याने लहान मुलांसाठी जीवघेणा ठरत आहे. गुजरातमध्ये गेल्या पाच दिवसांत चांदीपुरा विषाणूच्या संसर्गामुळे सहा मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर एकूण संशयित रुग्णांची संख्या आता १२ वर पोहोचली आहे. गुजरातचे आरोग्य मंत्री, रुषिकेश पटेल यांनी सोमवारी या चिंताजनक परिस्थिती विषयी माहिती दिली. हा विषाणू किती घातक आहे? याची लक्षणे आणि त्यावरील उपाय काय? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

साबरकांठा जिल्ह्यातील हिमतनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमधील बालरोगतज्ज्ञांनी चांदीपुरा विषाणूने चार मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. त्यानंतर या विषाणूचा प्रसार वाढल्याचे लक्षात आले आणि सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) पाठवण्यात आले. तेव्हापासून अशीच लक्षणे दाखविणाऱ्या आणखी चार मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संशयित रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. रुग्णालयात आता अरवलीतील तीन, महिसागरमधील एक आणि खेडा येथील एक रुग्ण उपचार घेत आहेत. याव्यतिरिक्त, राजस्थानमधील दोन आणि मध्य प्रदेशातील एक रुग्ण असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. २०१७ नंतर आता चांदीपुरा विषाणू पुन्हा चर्चेत आला आहे.

हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांचे कडवे टीकाकार जेडी व्हॅन्स अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाचे दावेदार; काय आहे भारताशी कनेक्शन?

चांदीपुरा विषाणू काय आहे?

महाराष्ट्रात १९६५ मध्ये या विषाणूची प्रथम ओळख पटली होती. महाराष्ट्रातील नागपूरयेथील चांदीपूर गावाच्या नावावरून या विषाणूचे नाव चांदीपुरा विषाणू असे ठेवण्यात आले. हा विषाणू राबडोव्हायराईड कुटुंबातील आणि व्हेसीक्युलोव्हायरस वंशाशी संबंधित आहे. याचा वेसिक्युलर स्टोमाटायटीस आणि रेबीजला कारणीभूत असलेल्या विषाणूंशी जवळचा संबंध आहे. ‘राबडो’चा अर्थ ग्रीक भाषेत ‘रॉडचा आकार’ असा होतो. हा विषाणू रॉडच्या आकाराचा असल्याचे त्याला हे नाव देण्यात आले आहे, असे शास्त्रज्ञ ए.बी. सुदीप, वाय.के. गुरव आणि व्ही.पी. बोंद्रे यांनी ‘इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च’मध्ये प्रकाशित केलेल्या २०१६ च्या एका लेखात लिहिले होते. .

या विषाणूविषयी अनेकांना माहीत नाही. विशेषत: हा विषाणू लहान मुलांवर परिणाम करतो. हा विषाणू भारताच्या विविध भागांमध्ये, तसेच आशिया आणि आफ्रिकेतील इतर देशांमध्ये आढळून आला आहे. मध्य भारतात २००३-२००४ दरम्यान या विषाणूचा उद्रेक झाला होता. या विषाणूमुळे त्यावेळी देशभरात ३२२ मुलांचा मृत्यू झाला. आंध्र प्रदेशात १८३, महाराष्ट्रात ११५ आणि गुजरातमध्ये २४ मृत्युंची नोंद करण्यात आली होती.

विषाणूची लक्षणे

चांदीपुरा विषाणू, प्रामुख्याने नऊ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना प्रभावित करतो आणि याचा मृत्यू दरही जास्त आहे. हा विषाणू सँडफ्लाय किंवा ड्रेनफ्लाइज या माश्यांच्या चाव्याव्दारे, तसेच डास आणि उवांच्या चाव्याव्दारेही पसरतो. चांदीपुरा विषाणूमुळे रूग्णाला ताप येतो. तसेच अतिसार, उलट्या, पोटदुखी सारखे लक्षणेही आढळून येतात. गंभीर प्रकरणांमध्ये, मेंदूला सूज येते आणि रुग्ण कोमात जाऊन त्याचा मृत्यूही होऊ शकतो. शास्त्रज्ञांच्या अहवालानुसार, बहुतेक संक्रमित रूग्णांच्या मृत्यूचे प्राथमिक कारण एन्सेफलायटीस आहे; ज्यात विषाणूचा मेंदूच्या ऊतींवर प्रभाव होतो. पावसाळ्यात, विशेषतः ग्रामीण भागात हा आजार सामान्य असला तरी, तो संसर्गजन्य नाही, असे राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

आजारावरील उपचार

सध्या, चांदीपुरा विषाणूच्या संसर्गासाठी कोणताही विशिष्ट अँटीव्हायरल उपचार नाही. त्यामुळे, काळजी हा एकमेव पर्याय आहे. प्रभावी व्यवस्थापन यासह चांगले पोषण, स्वच्छता, आरोग्य आणि जनजागृती यांद्वारे विषाणूचा प्रसार रोखण्यात मदत होऊ शकते.

सरकार या उद्रेकाचा सामना कसे करत आहे?

आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी जनतेला घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. अरवली येथील मुख्य जिल्हा आरोग्य अधिकारी एमए सिद्दीकी यांनी ‘एएनआय’ला सांगितले, “या विषाणूच्या जागरुकतेसाठी सामान्य स्तरावर ५० टीम तयार करण्यात आल्या आहेत. मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की डास मारण्यासाठी त्यांनी कीटकनाशके वापरावीत. लहान मुलांना डासांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांना पूर्ण बाह्यांचे कपडे घालून द्यावेत.”

हेही वाचा : मलेशियाचे राष्ट्रीय चिन्ह मलायन वाघ नामशेष होण्याच्या मार्गावर; कारण काय?

राज्य सरकारने अधिसूचना जारी केल्यानंतर आत्तापर्यंत, ४,४८७ घरांमधील १८,६४६ लोकांची तपासणी करण्यात आली आहे आणि २,०९३ घरांमध्ये माशांची संख्या नियंत्रित करण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. पटेल यांनी ‘पीटीआय’लादेखील सांगितले की, परिस्थिती नियंत्रणात आहे आणि लक्षणे कायम राहिल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेण्याचा सल्ला दिला जात आहे. राज्य या अनपेक्षित आरोग्य संकटाशी लढा देत आहे. विषाणूचा प्रादुर्भाव व्यवस्थापित करण्यासाठी सरकार आणि लोकांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत, असेही ते म्हणाले.