संजय जाधव
जागतिक तापमानवाढीचे चटके सर्वानाच बसत आहेत. मागील वर्ष हे दशकभरातील उष्णतेच्या लाटेचे सर्वाधिक दिवस असलेले वर्ष ठरले. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात २०२२ मध्ये उष्णतेच्या लाटेचे १९० दिवस नोंदवण्यात आले. २०२१च्या तुलनेत हे प्रमाण सहापट अधिक आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अहवालानुसार, २०२२ हे वर्ष १९०१ पासूनचे सर्वाधिक तापमानाचे पाचवे वर्ष ठरले. देशातील तापमान १९८१ ते २०१० या वर्षांतील सरासरी तापमानापेक्षा मागील वर्षी अर्ध्या टक्क्याने वाढले. वाढत्या उष्णतेचे चटके देशाच्या अर्थव्यवस्थेलाही बसत आहेत. तापमानाचा पारा वाढेल तसतसा विकासाचा वेग मंदावण्याची चिन्हे आहेत.
ऊर्जा क्षेत्रावरील ताण वाढण्यामागची कारणे..
तापमानाचा पारा आणखी वाढल्यास ऊर्जा क्षेत्रावरील ताण वाढणार आहे. कारण उन्हाळय़ात वातानुकूलन यंत्रणांसह कृषिपंपांचा वापर वाढेल. विजेची मागणी वाढल्याने तुटवडा निर्माण होऊन भारनियमन करावे लागेल. त्याचा परिणाम उद्योगांसह शेतीवर होईल. उद्योगांना पुरेसा वीजपुरवठा न झाल्यास त्यांना काम बंद ठेवावे लागेल. त्यातून कामगारांचे कामाचे तास व उत्पादकताही कमी होईल. यंदा जानेवारीतच विजेची मागणी उच्चांकी पातळीवर पोहोचली होती. मागील उन्हाळय़ाच्या तुलनेत यंदा उन्हाळय़ात विजेची मागणी २० ते ३० टक्के वाढण्याची शक्यता आहे. देशातील एकूण वीजनिर्मितीपैकी ७० टक्के निर्मिती औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतून होते. सध्या देशातील कोळशाचा साठा कमी आहे. त्यामुळे विजेची मागणी वाढणार असली तरी निर्मिती कमी होण्याची चिन्हे आहेत.
सर्वाधिक फटका कामगार क्षेत्राला?
उष्णतेची तीव्रता वाढल्यास त्याचा परिणाम कामगारांच्या उत्पादकतेवर होईल. केवळ बांधकाम क्षेत्रातील कामगारांना याचा फटका बसणार नाही. बाह्य वातावरणात काम करणाऱ्या कामगारांवर अनेक उद्योग अवलंबून आहेत. यामुळे अनेक क्षेत्रांची उत्पादकता कमी होईल. उष्णतेच्या लाटेचे परिणाम सार्वजनिक आरोग्यावर होतील. सार्वजनिक आरोग्य हा अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा घटक आहे. कारण आजारी पडण्याचे प्रमाण वाढल्यास कामगारांची उत्पादकताही कमी होईल. अर्थव्यवस्थेतही याचे पडसाद उमटतील. सकल राष्ट्रीय उत्पादनाचा ४० टक्के वाटा अशा क्षेत्रांतून येतो, ज्यात बाह्य वातावरणात काम करणे गरजेचे असते. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, उष्णतेची तीव्रता वाढल्याने उत्पादकता कमी होऊन २०३० पर्यंत जगभरात आठ कोटी नोकऱ्या जातील. यापैकी एकटय़ा भारतात ३.४ कोटी नोकऱ्या कमी होतील.
ग्रामीण अर्थव्यवस्थेवर कोणते परिणाम होतील?
वाढत्या उष्णतेमुळे कृषी क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम होतील. अनेक पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. उष्णतेचा सर्वाधिक परिणाम ताज्या शेतमालाच्या वाहतुकीवर होईल. देशात शीतगृहांची सुविधा पुरेशा प्रमाणात नसल्याचा फटका बसेल. या सर्व गोष्टींचा परिणाम एफएमसीजी कंपन्यांवर होईल. या कंपन्या खाद्यपदार्थाचे उत्पादन करतात. त्यांच्या उत्पादनांची मोठय़ा प्रमाणात विक्री ग्रामीण भागांत होते. कृषी क्षेत्राला फटका बसल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेत घसरण होईल. ग्रामीण भागात ट्रॅक्टर आणि दुचाकी विकणाऱ्या कंपन्यांच्या कामगिरीवरही याचा परिणाम होईल.
महागाई वाढण्यामागची कारणे काय?
जास्त उष्णतेचा फटका कृषी क्षेत्राला बसून उत्पादनात घट होईल आणि पर्यायाने बाजारपेठेतील भाव वाढतील. चालू आर्थिक वर्षांत डाळींचे भाव जास्त राहतील, असा अंदाजही ‘क्रिसिल’ या पतमानांकन संस्थेने व्यक्त केला आहे. महागाईत वाढ झाल्यास रिझव्र्ह बँकेचे सध्या थांबलेले व्याजदरवाढीचे चक्र पुन्हा सुरू होण्याची भीती आहे. महागाई आटोक्यात येत नसल्याने रिझव्र्ह बँकेने मे २०२२पासून तब्बल अडीच टक्क्यांची व्याजदरवाढ केली आहे. एप्रिलमधील पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवण्यात आले असले, तरी भविष्यात महागाई वाढल्यास व्याजदरवाढीचे सूतोवाच करण्यात आले आहे. व्याजदरवाढ झाल्यास त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या वाढीवरही होऊ शकतो.
अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम होईल?
कडक उन्हाळय़ामुळे दिवसाचे कामाचे तास कमी होतील. त्यामुळे उत्पादकतेवरही परिणाम होईल. विविध क्षेत्रांवर याचा ताण येईल. कृषी, खाणकाम आणि बांधकाम या क्षेत्रांना सर्वाधिक फटका बसणार आहे. कामगारांचे कामाचे तास कमी झाल्याने सकल राष्ट्रीय उत्पादनात २.५ ते ४.५ टक्के फटका बसण्याची शक्यता आहे. तापमान वाढल्यास हे नुकसान आणखी वाढेल. सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर देशांतर्गत आणि जागतिक आव्हानांचा मोठा परिणाम होत आहे. यातच सकल राष्ट्रीय उत्पादनातील घसरण अडचणीची ठरू शकते. sanjay.jadhav@expressindia.com