भारतात जास्त काम करणाऱ्यांचा, ओव्हरटाईम करणाऱ्यांचा गौरव केला जातो, ही जणू भारतातील कार्यसंस्कृतीच आहे. पगारवाढ मिळवण्यासाठी, टार्गेट पूर्ण करण्यासाठी, वरिष्ठांकडून प्रशंसा मिळवण्यासाठी लोक आठ ते नऊ तासांच्या वर काम करतात. पण, याच कामाचे दीर्घकालीन घातक परिणाम आरोग्यावर होतात. नुकताच पुण्यातील २६ वर्षीय तरुणीचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याची बातमी समोर येताच, कामाचा ताण आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम, यावर इंटरनेटवर लोक चर्चा करताना आणि आपली मतं मांडताना दिसत आहेत.

बिग फोर अकाउंटिंग आणि कन्सल्टिंग फर्मपैकी एक असणाऱ्या अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) मध्ये काम करणारी पुण्यातील २६ वर्षीय तरुणी अ‍ॅना सेबॅस्टियन पेरायिलचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचे तिच्या आईचे म्हणणे आहे. तरुणीचा जुलै महिन्यात मृत्यू झाला. हा मृत्यू कामाच्या अतिताणामुळे झाला असल्याचा आरोप करत तिच्या आईने ईवाय कंपनीचे चेअरमन राजीव मेमाणी यांना पत्र लिहिले. पुण्यातील २६ वर्षीय तरुणीच्या मृत्यूचे प्रकरण काय आहे? जास्त कामाचा तरुणीच्या तब्येतीवर काय परिणाम झाला? किती टक्के भारतीय कर्मचारी कामामुळे तणावात आहेत? त्याविषयी जाणून घेऊ.

हेही वाचा : डबे, बाटल्या तयार करणारी लोकप्रिय ‘टपरवेअर’ कंपनी झाली दिवाळखोर; कारण काय? या कंपनीचे नक्की काय चुकले?

कामाच्या ताणामुळे तरुणीचा मृत्यू?

अ‍ॅना सेबॅस्टियन पेरायिलची आई अनिता ऑगस्टीन यांनी ईवाय इंडियाचे चेअरमन राजीव मेमाणी यांना पत्र लिहून सांगितले की, माझ्या वाटेला जे दुःख आले, ते दु:ख इतर कोणाच्या वाटेला येऊ नये म्हणून हे पत्र लिहिणे आवश्यक होते. ऑगस्टीन यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी २३ नोव्हेंबर रोजी सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अ‍ॅना १९ मार्च रोजी पुण्यातील ईवाय या कंपनीत रुजू झाली. ती ईवाय ग्लोबलची सदस्य संस्था मधील ‘S R Batliboi’च्या ऑडिट टीमचा एक भाग होती. “तिची खूप स्वप्ने होती. ईवाय ही तिची पहिली नोकरी होती आणि अशा प्रतिष्ठित कंपनीत पहिली नोकरी मिळाल्याने ती आनंदात होती. पण, चार महिन्यांनंतर, २० जुलै २०२४ रोजी जेव्हा मला अ‍ॅनाच्या मृत्यूची बातमी ऐकावी लागली, तेव्हा माझे जग उद्ध्वस्त झाले. ती फक्त २६ वर्षांची होती,” असे त्यांनी लिहिले. त्यांनी पुढे सांगितले की, अ‍ॅनाने तिची सीए परीक्षा उत्तीर्ण केली आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली.

कंपनी जॉइन केल्यानंतर लगेचच तिला चिंता, निद्रानाश आणि तणावाचा त्रास होऊ लागला. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

‘न्यूज १८ नुसार, ईवायमध्ये कार्यरत होण्यापूर्वी तिने ‘G Joseph & Associates’साठी २०२० ते २०२२ पर्यंत दोन वर्षांहून अधिक काळ ऑडिट असिस्टंट म्हणून काम केले. तिने ‘The Institute of Chartered Accountants of India (ICAI)’ मधून पदवी प्राप्त केली होती. जेव्हा अ‍ॅनाने पहिल्यांदा ईवाय पुणे येथे काम करायला सुरुवात केली, तेव्हा तिच्या निदर्शनास आले होते की, तिच्या टीमचे बरेच कर्मचारी कामाच्या प्रचंड ताणामुळे नोकरी सोडत होते. “तिने ईवायमध्ये अथक परिश्रम केले. परंतु, कामाचा भार, नवीन वातावरण आणि दीर्घ कामाच्या तासांचा तिच्यावर शारीरिक, भावनिक आणि मानसिकदृष्ट्या परिणाम झाला. कंपनी जॉइन केल्यानंतर लगेचच तिला चिंता, निद्रानाश आणि तणावाचा त्रास होऊ लागला. परंतु, कठोर परिश्रम आणि चिकाटी ही यशाची गुरुकिल्ली आहे, यावर विश्वास ठेवून तिने स्वत:ला पुढे नेले,” असे ऑगस्टीन यांनी सांगितले.

जास्त कामाचा तिच्या तब्येतीवर कसा परिणाम झाला?

ॲनाच्या सीए दीक्षांत समारंभासाठी ऑगस्टीन आणि त्यांचे पती पुण्यात असताना ॲनाने छातीत दुखण्याची तक्रार केल्याचे आणि त्यासाठी तिला रुग्णालयात नेल्याचे ऑगस्टीन यांनी स्पष्ट केले. आम्ही तिला पुण्याच्या रुग्णालयात नेले तेव्हा हृदयरोगतज्ज्ञांनी आम्हाला सांगितले की, ती खूप उशिरा जेवत होती आणि तिची झोपही पूर्ण होत नव्हती. परंतु, त्यावेळी तिचे इकोकार्डियोग्राम (ECG) सामान्य होते. त्यानंतर डॉक्टरांनी तिला अँटासिड्स लिहून दिल्याचे ऑगस्टीन यांनी सांगितले. त्यांनी पत्रात म्हटले की, “आमचे तिच्याबरोबरचे अखेरचे दोन दिवस होते, मात्र तरीही ती कामाच्या दबावामुळे कुठल्याही गोष्टींचा आनंद घेऊ शकली नाही.”

“तिने रात्री उशिरापर्यंत काम केले. तिच्या असिस्टंट मॅनेजरने एकदा तिला रात्रीच्या वेळी एका कामासाठी बोलावले, जे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पूर्ण करणे आवश्यक होते. अशा कामांमुळे तिला आराम करण्यासाठी फारसा वेळ मिळत नव्हता. जेव्हा तिने याविषयी वरिष्ठांना सांगितले, तेव्हा ‘तुम्ही रात्री काम करू शकता, आम्ही सर्व तेच करतो,’ असा त्यांचा प्रतिसाद असल्याचे,” त्यांनी पत्रात लिहिले. “ॲना अगदी थकलेल्या अवस्थेत कामावरून परत यायची आणि त्याच कपड्यात बिछान्यावर कोसळायची. ती तिचे सर्वोत्तम प्रयत्न करत होती. डेडलाइन पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करत होती. आम्ही तिला नोकरी सोडायला सांगितली, पण तिला शिकायचे होते,” असे त्या म्हणाल्या. स्वत:ला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात ॲनाने कामाच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचा दावा ऑगस्टीन यांनी केला.

बदल घडवून आणण्याचे आवाहन

ऑगस्टीनने मेमानी यांना व्यवसायाच्या कार्यसंस्कृतीकडे लक्ष देण्यास सांगितले. त्यांनी लिहिले की, “नवीनांवर अशा कामाचे ओझे टाकणे, त्यांना रात्रंदिवस काम करायला लावणे, अगदी रविवारीही काम करण्यास सांगणे काही योग्य नाही. तुम्ही नवीन कर्मचाऱ्यांचा थोडा विचार करायला हवा होता. त्याऐवजी, ती नवीन होती याचा पुरेपूर फायदा व्यवस्थापनाने घेतला.” “ॲनाबरोबर जे घडले त्यामुळे अशी कार्यसंस्कृती प्रकाशझोतात आली आहे, ज्यात माणसाकडे दुर्लक्ष करून तो करत असलेल्या जास्त कामाचा गौरव केला जातो. हे फक्त माझ्या मुलीबद्दल नाही, तर अशा आशावादी आणि अनेक स्वप्न पाहणाऱ्या ‘ईवाय’मधील इतर तरुणांविषयीही आहे,” असे त्या म्हणाल्या. सीए होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने अनेक वर्षे मेहनत घेतली आणि इतक्या वर्षांची मेहनत कंपनीच्या या चार महिन्यांच्या तणावाने वाया घालवली, असेही त्या म्हणाल्या. आता या पत्राची दखल घेतली जाईल आणि कंपनीत आवश्यक बदल केले जातील, जेणेकरून दुसऱ्यांच्या वाट्याला ही दुःख येऊ नये, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

कंपनीची भूमिका काय?

‘ईवाय’ने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आणि २६ वर्षीय तरुणीच्या अकाली मृत्यूला ‘न भरून निघणारं’ नुकसान म्हटले. “ॲना सेबॅस्टियन यांच्या दुःखद आणि अकाली निधनामुळे आम्हाला खूप दु:ख झाले आहे आणि शोकाकुल कुटुंबाप्रती आमची तीव्र संवेदना आहे. ॲना १८ मार्च २०२४ रोजी पुण्यातील ईवाय ग्लोबलची सदस्य फर्म एस आर बाटलीबोई येथे ऑडिट टीममध्ये रुजू झाली. आमच्यासाठी हे न भरून निघणारं नुकसान आहे,” असे कंपनीने म्हटले. “कुटुंबाच्या झालेल्या नुकसानाची भरपाई कोणत्याही प्रकारे करता येत नसली तरी आम्ही त्यांना आवश्यक ती सर्व मदत केली आहे आणि यापुढेही करत राहू,” असेही त्यात नमूद करण्यात आले. “आम्ही कुटुंबाने पाठवलेल्या पत्राची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. आम्ही सर्व कर्मचाऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देतो आणि भारतातील ईवाय सदस्य संस्थांमधील आमच्या एक लाख कर्मचाऱ्यांना कामासाठी उत्तम वातावरण मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,” असेही सांगितले.

किती टक्के भारतीय कामामुळे तणावात?

कामाच्या ठिकाणचा ताण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. ही एक जागतिक समस्या असली तरी भारतीयांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. जूनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात असे दिसून आले आहे की, तब्बल ८६ टक्के भारतीयांना असे वाटते की, ते त्यांच्या कामाच्या ठिकाणी संघर्ष करत आहेत किंवा कामाच्या कार्यसंस्कृतीमुळे तणावात आहेत. केवळ १४ टक्के भारतीयांना असे वाटते की, त्यांना आपल्या कामात आनंद मिळत आहे. हे २०२४ च्या ‘गॅलप स्टेट ऑफ द ग्लोबल वर्कप्लेस’च्या अहवालात उघड झाले आहे. संबंधित आकडा जागतिक सरासरी ३४ टक्क्यांपेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहे. दुसरीकडे, अनेक जण त्यांच्या वर्तमान आणि भविष्यातील परिस्थितींविषयी चिंतेत आहेत आणि त्याचा अधिक तणाव घेत आहेत.

हेही वाचा : लेबनॉनमधील पेजर स्फोटांमुळे इस्रायल आणि हिजबूल यांच्यातील संघर्ष पेटणार का?

केंद्र सरकारकडून घटनेची दखल

केंद्रीय कामगार मंत्रालयाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून ॲनाचा मृत्यू कशामुळे झाला याची चौकशी केली जाणार आहे. “ॲना सेबॅस्टियन पेरायल यांच्या मृत्यूमुळे आम्ही दुःखी आहोत. कामाच्या ठिकाणी असलेल्या असुरक्षित आणि शोषक कामाच्या वातावरणाच्या आरोपांची सखोल चौकशी सुरू आहे. आम्ही कुटुंबाला न्याय मिळवून देण्यास वचनबद्ध आहोत. कामगार मंत्रालयाकडून अधिकृतपणे तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे,” असे कामगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये सांगितले.