गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षातील अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. महाराष्ट्रातील शिंदे गटाच्या यामिनी जाधवांपासून ते बंगालमधील तपस रॉय यांच्यापर्यंत आणि झारखंडमधील काँग्रेसचे प्रदीप यादव यांच्यापासून ते राजस्थानमधील ज्योती मिर्धापर्यंत जवळपास १३ नेते अन् त्यांच्या कुटुंबीयांचा ईडीकडून तपास सुरू आहे. त्यातील अनेकांना भाजपानं आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिली होती. त्यातील ९ उमेदवार पराभूत झाले असून, सात भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांतील आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ईडीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर अनेक नेत्यांनी पक्षांतर केले होते. अनेक नेत्यांनी ईडीच्या कारवाईच्या भीतीपायी भाजपात जाणे पसंत केले होते. त्यातील १३ उमेदवार आणि त्यांचे कुटुंबीय केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI), प्राप्तिकर विभाग, अंमलबजावणी संचालनालय (ED) यांच्या चौकशीला सामोरे जात आहेत. खरं तर या १३ जणांपैकी आठ जण इतर पक्षातून भाजपात आले आहेत. त्यातील सात काँग्रेस नेते आणि एका तृणमूल काँग्रेस नेत्याचा समावेश आहे. तर महाराष्ट्रात ईडीच्या कारवाईच्या भीतीनं ठाकरे गटातून एकाने शिंदे गटात प्रवेश करून उमेदवारी मिळवली, एकाने वायएसआरसीपीमधून टीडीपीमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपामध्ये दाखल झालेल्या आठ जणांपैकी सहा जणांचा पराभव झाला; तसेच शिंदे गटात सामील होऊन उमेदवारी मिळवलेल्या दोघांचाही पराभव झाला. पराभूत झालेल्यांमध्ये राजस्थानमधील नागौर येथील ज्योती मिर्धा यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून कृपाशंकर सिंह यांचा पराभव झाला. तर कोलकाता उत्तर येथून रॉय आणि आंध्र प्रदेशातील अराकू येथून कोठापल्ली गीता; पटियाला येथील प्रनीत कौर आणि झारखंडमधील सिंगभूम येथील गीता कोडा यांचा पराभव झाला आहे. शिंदे गटातील यामिनी जाधव यांचा दक्षिण मुंबईतून, राहुल शेवाळे यांचा दक्षिण मध्य मुंबईतून पराभव झाला. तर प्रदीप यादव यांचा झारखंडमधील गोड्डामधून पराभव झाला. काँग्रेसच्या माजी नेत्या ज्योती मिर्धा यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास सहा महिने बाकी असताना भाजपात प्रवेश केला होता. काही महिन्यांपूर्वी शिप्रा समूहाच्या तक्रारीच्या आधारे अंमलबजावणी संचालनालयाने इंडियाबुल्सविरुद्ध चौकशी सुरू केली होती. इंडियाबुल्स हे मिर्धा यांचे सासरे चालवतात, इंडियाबुल्सचे प्रवर्तक समीर गेहलोत हे मिर्धा यांचे पती नरेंद्र गेहलोत यांचे भाऊ आहेत.

हेही वाचाः सत्तास्थापनेसाठी चंद्राबाबूंनी केली राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी? विशेष दर्जा मिळणे म्हणजे काय?

कृपाशंकर सिंह यांची २०१२ मधील बेहिशेबी संपत्तीच्या एका प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू होती. ईडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर चौकशी सुरू केली होती. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि २०२१ मध्ये भाजपामध्ये सामील झाले. नागरी संस्थांच्या भरतीमधील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने यंदा जानेवारीमध्ये पश्चिम बंगाल विधानसभेतील तृणमूल नेत्याच्या निवासस्थानावर छापा टाकला. मार्चच्या सुरुवातीला तपस रॉय भाजपामध्ये सामील झाले आणि भाजपाने त्यांना कोलकाता उत्तरमधून उमेदवारी दिली. मात्र, त्यांना टीएमसीच्या सुदीप बंदोपाध्याय यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. २०१९ च्या निवडणुकीत झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांची पत्नी गीता कोडा या राज्यातून विजयी झालेल्या काँग्रेसच्या एकमेव उमेदवार होत्या. सीबीआय आणि ईडीने त्याच्याविरुद्ध नोंदवलेल्या अनेक गुन्ह्यांपैकी एका प्रकरणात तिचा पती दोषी ठरला आणि इतर प्रकरणांची चौकशी सुरू असल्याने तिने या वर्षी फेब्रुवारीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला आणि सिंहभूममधून तिला उमेदवारी दिली. मात्र, JMM उमेदवाराकडून तिचा पराभव झाला.

महाराष्ट्रात शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी जून २०२२ मध्ये शिंदे गटात प्रवेश केला. राज्यातील उद्धव ठाकरे सरकार पाडून एकनाथ शिंदे गटात सामील होण्यासाठी त्या पक्षातून बाहेर पडल्या होत्या. यामिनी आणि तिचे पती यशवंत जाधव हे अनेक प्रकरणांमध्ये ईडीच्या चौकशीला सामोरे जात होते. यामिनी यांना या निवडणुकीत एनडीएने दक्षिण मुंबईतून रिंगणात उतरवले होते, परंतु शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

शिवसेनेचे दिग्गज नेते रवींद्र वायकर हे जून २०२२ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या राजकीय उलथापालथीदरम्यान उद्धव ठाकरेंबरोबर होते. परंतु त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी सुरू केली आणि त्यानंतर ईडीचाही ससेमिरा मागे लागला. यंदाच्या मार्चमध्ये वायकर शिंदे गटात सामील झाले. तसेच तुरुंगात जाणे किंवा पार्टी बदलणे यापैकी एकच पर्याय निवडण्यास त्यांना सांगण्यात आले होते. त्यांना मुंबई उत्तर-पश्चिममधून रिंगणात उतरवण्यात आले आणि अवघ्या ४८ मतांनी ते विजयी झाले. कोळसा खाण वाटप प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलेले जिंदाल यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या काही महिन्यांपूर्वी एका ताज्या प्रकरणात ईडीने छापा टाकला होता.

आंध्र प्रदेशमध्ये वायएसआरसीपीच्या माजी खासदार कोथापल्ली गीता आणि त्यांचे पती पी. रामकोटेश्वर राव यांच्यावर सीबीआयने २०१५ मध्ये गुन्हा दाखल करत आरोपपत्र दाखल केले होते, त्यांनी खोटे कारण सांगत ४२ कोटी रुपयांचे कर्ज मिळवले होते आणि पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक केली होती. जुलै २०१९ मध्ये गीताने भाजपामध्ये प्रवेश केला. परंतु सप्टेंबर २०२२ मध्ये तिला ट्रायल कोर्टाने दोषी ठरवले आणि तिच्या पतीसह पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या दोघांना सीबीआयने अटक केली होती. तेलंगणा उच्च न्यायालयाने त्यांना केवळ जामीनच दिला नाही तर शिक्षेला स्थगिती दिल्याने या जोडप्याला लवकरच दिलासा मिळाला. मात्र, ती कायम राहिल्याने गीताला निवडणूक लढवता आली नाही. १२ मार्च रोजी तेलंगणा हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती देऊन मार्ग मोकळा केला. २८ मार्च रोजी भाजपाने ती अरकू मतदारसंघातून पक्षाची उमेदवारी जाहीर केली. मात्र, वायएसआरसीपीच्या गुम्मा राणीकडून त्यांचा पराभव झाला.

काँग्रेसचे माजी नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी प्रनीत कौर यांना भाजपाने पटियालामधून उमेदवारी दिली. त्यांचा मुलगा रणिंदर सिंग २०२० मध्ये परकीय चलन उल्लंघनाच्या प्रकरणात ईडीच्या रडारवरआला होता. नोव्हेंबर २०२१ मध्ये अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस सोडली. पुढच्याच वर्षी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. कौर काँग्रेसचे धरमवीर गांधी आणि आपचे बलबीर सिंग यांच्यानंतर तिसऱ्या स्थानावर आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Defeat of 9 out of 13 candidates who defected due to fear of ed who exactly is the leader vrd
First published on: 06-06-2024 at 12:45 IST