World Turtle Day : आज आंतरराष्ट्रीय कासव दिवस आहे. कासवांच्या संवर्धनासंबंधात जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. कासवाच्या अनेक प्रजाती आहेत. त्यातील सागरी कासव हे पर्यावरणाच्या रक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. कासव दिनाच्या निमित्ताने सागरी कासवांचे पर्यावरणातील योगदान जाणून घेऊया…
हेही वाचा : विश्लेषण : भारतातील चलनबंदीची गाथा…
आंतरराष्ट्रीय कासव दिन का साजरा करतात ?
आंतरराष्ट्रीय कासव दिन दरवर्षी 23 मे रोजी साजरा केला जातो. तया दिवसाची सुरुवात २000 मध्ये झाली. कासव आणि कासवांच्या प्रजातींचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कासव दिन साजरा करण्यात येतो. कासवांच्या संरक्षणासाठी काय योगदान देता येईल, यासंदर्भात जागृती करण्यात येते. आंतरराष्ट्रीय स्तरावर कासवाच्या रंगाची वेशभूषा करून, तसेच कासव दत्तक घेऊन, कासव संवर्धन केंद्रांना मदत करून, कासवांबाबत जनजागृती केली जाते.कॅलिफोर्नियाच्या सुसान टेलम यांनी ‘जागतिक कासव दिन’ हा शब्द नोंदीत केला आहे.
हेही वाचा : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या शुद्धीकरणावरून शाब्दिक चकमक; ही ‘शुद्धता’ नेमकी आली कुठून ?
समुद्री कासव महत्त्वाचे का आहे?
समुद्रामध्ये अनेक जलचर आहेत. लहान अमिबापासून ते देवमाशापर्यंत अनेक सागरी जीव समुद्रात राहतात. परंतु, या सर्वांमध्ये सागरी कासव हे वेगळे आहे. सागरी कासवांना शास्त्रज्ञ ‘कीस्टोन प्रजाती’ म्हणतात. कारण, सागरी कासवे अन्य सागरी जीवांना प्रभावित करत असतात. सागरी कासवे समुद्रातील गवतांची उंची मर्यादित ठेवतात. ग्रीन टर्टल्स खासकरून समुद्रातील गवतावर चरतात. त्यामुळे गवताची अमर्याद वाढ होत नाही. यामुळे पाण्यातील कार्बनडायॉकसाईड योग्य प्रमाणात राहतो. तसेच त्यांच्या खाण्याच्या सवयी समुद्राच्या स्वच्छतेसाठी मदत करतात. सागरी कासव त्यांच्या भक्ष्याच्या आधारे समुद्राचे व्यवस्थापन करत असते.
सागरी कासवांच्या वेगवेगळ्या प्रजाती वेगवेगळ्या गोष्टी खातात, जरी त्यापैकी बहुतेकांना जेलीफिश आवडतात. लेदरबॅक सागरी कासव जेलीफिश खाण्यात माहिर आहेत. सागरी कासव जेलीफिशची संख्या मर्यादित ठेवते . हे जेलीफिश लहान माशांची शिकार करतात. त्यामुळे त्यांच्यावर मर्यादा ठेवण्याचे कार्य सागरी कासव करते. कॅनडाच्या नोव्हा स्कॉशियाच्या पाण्यात ४५० किलो वजनाचे प्रौढ लेदरबॅक कासव दररोज सुमारे ३३० किलो जेलीफिश खात असल्याची माहिती कार्तिक शंकर यांच्या फ्रॉम सूप टू सुपरस्टार या पुस्तकात दिली आहे.
हेही वाचा : हिंदू मंदिरांमध्ये कासव का असते?
हॉक्सबिल कासव शेवाळ खाऊन समुद्रातील दगड स्वच्छ ठेवण्यास मदत करते. कोरल रीफ हे तर हॉक्सबिल्स कासवांचे घर असते. समुद्रातील दगडांवर विविध प्रकारची प्रवाळे, रंगीत शेवाळे, पाणवनस्पती (कोरल रीफ) यांची वाढ होत असते. हॉक्सबिल्स ही सागरी कासवे या प्रकारची शेवाळे खाऊन दगड साफ ठेवत असतात. या प्रकारचे दगड हे काही माशांच्या प्रजननाचे ठिकाण असते. तसेच या दगडांमध्ये राहणारे लहान जीव या शेवाळांमुळे नष्ट होत असतात. हॉक्सबिल्स कासवे हे शेवाळ खात असल्यामुळे या लहान जीवांचेही रक्षण होते. सागरी कासवे पाण्यातील घाण खाण्याचेही काम करत असतात. पर्यायाने समुद्र स्वच्छ राहण्यास मदत होते.
सागरी कासव सर्वभक्षक असते. पाण्यात असताना पाणवनस्पती, गोगलगाई, शिंपले, झिंगे, मासे, कीटक इत्यादींवर ही कासवे उपजीविका करतात. मुखातील धारदार शृंगी पट्टांचा उपयोग अन्नपदार्थाचे बारीक तुकडे करण्यासाठी करतात.
सागरी कासवे पाण्याच्या बाहेरही पर्यावरणासाठी आपले योगदान देत असतात. सागरी कासवे ५०० पर्यंत घालतात. समुद्र किनाऱ्यांवर कासव अंडी घालते, तेव्हा बहुतांशी वेळा ती अंडी पक्व होण्याआधीच फुटतात किंवा ती पक्वच होत नाही. या अंड्यांमध्ये पोषणमूल्य अधिक असते. त्यामुळे समुद्रकाठावरील जमीन पोषक राखण्यास यामुळे मदत होते. तसेच सागरी कासवाच्या पाठीवरील कवचावर अनेक सूक्ष्मजीव राहत असतात. सागरी कासवे जेव्हा स्थलांतर करतात, तेव्हा त्या सूक्ष्मजीवांचेही स्थलांतर होते.
हेही वाचा : विश्लेषण : रविवारनंतर सोमवारच का येतो ? आठवड्याची रचना कोणी केली ?
सागरी कासवांचे आजचे वास्तव
ऑलिव्ह रिडले प्रोजेक्टने सादर केलेल्या अहवालानुसार, सागरी कासवांच्या २,५०० हून अधिक प्रजाती आहेत. ६.५ दशलक्ष सागरी कासवे आज शिल्लक आहेत. त्यात हॉक्सबिल कासवाची संख्या ५७ हजार ते ८३ हजारआहे. केम्प’स रिडले आणि फ्लॅटबॅक कासवांची अनुक्रमे १० हजार ते २५ हजार आणि ६९ हजार संख्या आहे. सागरी कासवांचे शत्रू अनेक असल्यामुळे आणि त्यांच्या संवर्धनाबाबत तितकीशी जागृकता नसल्यामुळे त्यांची संख्या घटत आहे. हवामान बदलाचा परिणाम सागरी कासवांवरही होत आहे. उच्च तापमान आणि समुद्रातील वाढते प्रदूषण सागरी कासवांवर परिणाम करते. समुद्रातील तेल गळतीमुळे सागरी कासवांचे आरोग्य खालावते. हे तेल त्यांच्या आरोग्यासाठी अयोग्य असते. फायब्रोपापिलोमॅटोसिस या रोगामुळे सागरी कासवांना ट्यूमर होण्याची शक्यता असते. तसेच नैसर्गिक शत्रू सागरी कासवांची अंडी रात्रीच उद्ध्वस्त करतात. शास्त्रज्ञांच्या मते, १०० पैकी १ सागरी कासव पूर्ण जगते. कासवांचे मांस खाण्यासाठीही त्यांची शिकार करण्यात येते.
आंतरराष्ट्रीय कासव दिनानिमित्त सागरी कासवांचे महत्त्व ओळखणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्या संवर्धनासाठी मानवी स्तरावरील शक्य तेवढे प्रयत्न करणे गरजेचे आहे.