आपण या आधी कधी भेटलो आहोत का? मी या ठिकाणी कधीतरी आलोय का? आणि हे प्रश्न तुम्हाला या आधी कधी पडले आहेत का? जर शेवटच्या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असेल तर हे ‘देजा वू’ (Deja vu) आहे. तुम्ही एखाद्या नवीन शहरात गेलेले असता आणि तेथील एखादी वास्तू, चौक किंवा रस्ता तुम्हाला आपलासा वाटतो? किंवा एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदाच भेटलो तरी त्याची या आधी कधीतरी भेट झाली आहे, असा विचार मनात घोळत राहतो? हे सर्व अनुभव तुम्हाला एकदा तरी आले असतील तर तुम्हीदेखील इतरांप्रमाणे ‘देजा वू’चा अनुभव घेतलेला असावा. ‘देजा वू’ या संकल्पनेला वैज्ञान किंवा तर्काचा काही आधार आहे का? असे अनुभव अनेकांना का येतात? यासंबंधी घेतलेला हा आढावा.

फ्रेंच तत्त्ववेत्ता आणि संशोधक एमिल बोइराक (Emile Boirac) यांनी १८७६ साली पहिल्यांदा ‘देजा वू’ ही संज्ञा वापरली. ज्याचा अर्थ होतो, ‘आधी पाहिलेले.’ ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो यांच्या आधीपासून अनेक तत्त्वज्ञांनी ‘देजा वू’सारख्या घटनांचा अर्थ उलगडून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी काही काळापूर्वी सिग्मंड फ्रॉइड (Sigmund Freud) यांनी या संज्ञेचा अर्थ उलगडताना सांगितले की, “आपल्या मनात सुप्तावस्थेत असलेल्या आठवणी आणि वर्तमान परिस्थितीत सुधारणा करण्याची आपली इच्छा यांच्या संयोगामुळे असे अनुभव कधीकधी येतात.” कार्ल युंग यांच्या मते आपल्या बेसावध मनातील आठवणींशी निगडित घटना ‘देजा वू’शी संबंधित असतात. तर आधुनिक हॉलीवूडमध्ये याला ‘ग्लिच इन द मेट्रिक्स’ अशी संज्ञा देण्यात आली आहे.

munabam beach kearala controversy
मुनंबम जमीन वादावरून ख्रिश्चन आणि हिंदू एकवटले; नेमकं प्रकरण काय? देशभरात चर्चेत असलेला हा जमिनीचा वाद काय आहे?
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत…
carbon border tax
‘कार्बन बॉर्डर’ टॅक्स काय आहे? भारतासह चीन याचा विरोध का करत आहे?
Happy Children's Day 2024
Happy Children’s Day 2024:…तर भारत हा जादुई देश तुम्हाला हत्तीही पाठवेल! जगभरच्या मुलांना असे का वाटत होते?
loksatta analysis global foods mnc s selling less healthy products in India
बहुराष्ट्रीय खाद्य उत्पादक कंपन्या भारतात हलक्या प्रतीची उत्पादने विकतात? काय सांगतो नवा अहवाल?
reality about donald trump and vladimir putin friendship
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन खरोखर एकमेकांचे मित्र आहेत का? दोघांच्या मैत्रीत युक्रेनचा ‘बकरा’?
batenge toh katenge slogan by bjp in maharashtra assembly election
‘बटेंगे…’चा मुद्दा राज्यातील प्रचारात केंद्रस्थानी कसा आला? भाजप आक्रमक, विरोधक सावध?
reserve bank of india latest marathi news
विश्लेषण: १४ महिन्यांतील उच्चांकी चलनवाढीमागे कारणे कोणती? व्याजदर कपात आणखी लांबणीवर? जीडीपी वाढही मंदावणार?
japan ban wedding after 25 for women
‘या’ देशात महिलांना पंचविशीनंतर विवाहास मनाई, प्रस्तावावरून नागरिक संतप्त; कारण काय?

जेम्स जोर्डाना यांनी मात्र ‘देजा वू’ हा एक सामान्य अनुभव असून, त्यात अलौकिक असे काहीच नाही, असे सांगितले आहे. जेम्स जोर्डाना हे वॉशिंग्टनच्या जॉर्जटाऊन विद्यापीठातील न्युरोलॉजी विभागाचे प्राध्यापक आहेत. “देजा वू हा व्यक्तिनिष्ठ अनुभव असून तो अनेक वेळेला पुन्हा पुन्हा येऊ शकतो. जरी ‘देजा वू’प्रमाणे एखादी घटना आपल्या आयुष्यात घडलीच नसेल तरीही काम करत असताना, विचार किंवा भावनेतून अनेक वेळा हा अनुभव येतो,” असे जोर्डाना यांनी स्पष्ट केले.

हे वाचा >> ‘अरे हे असं घडून गेलंय’वालं फिलींग अचानक तुम्हालाही येतं का? जाणून घ्या Deja vu म्हणजे नेमकं काय

जगातील लोकसंख्येपैकी ९० टक्के लोकांनी कधी ना कधी ‘देजा वू’सारखा अनुभव घेतलेला असतो. जसे जसे वय वाढते, तसे हा अनुभव येणे कमी होते. पण तुम्हाला माहितीये का, ही अस्वस्थ वाटणारी भावना का निर्माण होते?

रहस्यमय विज्ञान

जोर्डाना यांनी डीडब्लू संकेतस्थळाशी बोलताना सांगितले, “आपला मेंदू वेळ आणि अवकाश यंत्राप्रमाणे काम करतो. मेंदू वर्तमानातील आठवणींचा संबंध भूतकाळातील त्याच आठवणीसारख्या किंवा भिन्न आठवणींशी जोडतो. अशा प्रकारातून मेंदूला भविष्याविषयी नियोजन करता येते. पण या प्रक्रियेत संकेतांचे आपापसात मिश्रण होण्याची शक्यता निर्माण होते.” जोर्डाना यांच्या मते आपल्या मेंदूच्या मध्यभागी असलेल्या थॅलेमस (Thalamus) या भागातून अशा घटनांची उत्पत्ती होते. पंचेंद्रियांकडून मिळालेला संदेश- जसे की, चव, आवाज, स्पर्श इत्यादींची जाणीव- थॅलेमसकडूनच मेंदूच्या बाह्य आवरणाला (cerebral cortex) मिळते. पंचेंद्रियांकडून मिळालेल्या संदेशाचे आकलन आणि त्यावर प्रक्रिया करण्याचे काम मेंदूकडून केले जाते.

जोर्डाना म्हणाले की, मेंदूपर्यंत संदेश जाण्याच्या प्रक्रियेच्या वेगात बदल झाला, तर आपण वर्तमानात अनुभव घेत असताना ती घटना लक्षात ठेवण्याचाही प्रयत्न करत असतो. अशा वेळी आपला मेंदू भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांत अक्षरशः गोंधळून जातो. अमेरिकेतील ब्राउन विद्यापीठातील (Brown University in Providence) मायग्रेन रिसर्च आणि क्लिनिकल सायन्स विभागाचे प्राध्यापक रॉड्रिक स्पीअर्स (Roderick Spears) यांनीही मान्य केले आहे की, “देजा वूसारखा अनुभव का येतो, याचे ठाम असे स्पष्टीकरण कुणाकडेच नाही.”

यासोबतच संशोधकांनाही निष्कर्षापर्यंत पोहोचणे कठीण वाटते. कारण ‘देजा वू’ ही एक अवघड अशी घटना आहे, संशोधन करण्यासाठी प्रयोगशाळेत तिची निर्मिती करता येत नाही.

समांतर विश्वाचा आणि ‘देजा वू’चा काय संबंध?

नेटफ्लिक्सवरील ‘डार्क’ नावाची एका वेबसिरीज ‘देजा वू’ आणि समांतर विश्व या संकल्पनेवर आधारित आहे. अतिशय प्रसिद्ध अशा या वेबसिरीजमुळे ‘देजा वू’ घटनेबाबतचे गूढ काही लोकांमध्ये वाढलेले दिसते. स्पीअर्स म्हणाले, “देजा वूसारखी घटना अचानक आणि उत्स्फूर्तपणे घडते, त्यामुळे तिचा अभ्यास करणे अवघड आहे. प्रयोगशाळेत देजा वूसारखी घटना कशी घडवून आणायची याबाबत अद्यापही पुरेशी माहिती नाही.”

‘देजा वू’सारखी घटना का आणि कशी घडते? याबाबत काही दशकांपासून वैज्ञानिकांनी अनेक सिद्धांत मांडले आहेत. यातील सर्वात लोकप्रिय असलेला दुहेरी प्रक्रियेचा (dual processing) सिद्धांत न्युरोलॉजिकल अंगाने मांडलेला आहे. ज्यात मेंदूमध्ये माहिती साठवणे आणि पुन्हा प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या प्रक्रिया असतात.

हे वाचा >> मनोवेध : पुनरानुभव

उदाहरणादाखल पाहू या. तुम्ही घरातील दिवाणखाण्यात वर्तमानपत्र वाचत आहात. त्याच वेळी किचनमधून चविष्ट पदार्थ बनत असल्याचा गंध तुमच्यापर्यंत पोहोचतो. तुमच्या घरातील पाळीव कुत्रा सोफ्यावर पहुडलेला तुम्हाला दिसत आहे. अगदी तेव्हाच तुमच्या मोइलवर नोटिफिकेशन आल्याचा टोनही ऐकू येतो. खिडकीतून उन्हाची किरणे तुमच्या आंगावर पडली आहेत. या सर्व घटना एकाच वेळी घडत असताना त्यांच्या संवेदना एकमेकांशी जोडल्या जातात आणि ही एकच घटना असल्याचे विश्लेषण मेंदूपर्यंत पोहोचते.

दुहेरी प्रक्रिया सिद्धांतानुसार, मेंदू एका घटनेच्या संदेशावर प्रक्रिया करत असताना त्यात थोडासा उशीर होतो, तेव्हा त्या दोन वेगवेगळ्या घटना असल्याचा अनुभव निर्माण होतो. तेव्हा आपल्याला ही ओळखीची घटना किंवा भावना असल्याचा भास होतो.

याचप्रमाणे ‘देजा वू’ समांतर विश्वाशी निगडित असल्याचेही काही अभ्यासक म्हणतात. सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ (Theoretical physicist) डॉ. मिशिओ काकू (Michio Kaku) यांच्यामते ‘देजा वू’ ही स्मृतीशी निगडित एक त्रुटी (glitch) आहे. “मेंदूमध्ये साठवलेल्या आठवणींचे तुकडे कधीकधी आपल्याला आधीच घडून गेलेल्या घटनेचा भास असल्यासारखा अनुभव देतात.

काही सिद्धांतांनुसार ‘देजा वू’ समांतर विश्वाशीच निगडित असल्याचे सांगितले गेले आहे. समांतर विश्वातील आपले स्थान काय आहे, याची अनुभूती ‘देजा वू’च्या माध्यमातून आपल्यासमोर येत असते, असे काहींचे म्हणणे आहे.

‘देजा वू’ हे तणावाचे लक्षण आहे का?

‘देजा वू’सारख्या परिस्थितीला ‘तणाव’ कारणीभूत असू शकतो, असेही काही लोक सुचवतात. पुरेसा आराम आणि चैतन्यदायी वातावरण मिळाल्यानंतर मेंदू अधिक चांगल्या प्रकारे काम करतो. जेव्हा तुम्ही प्रचंड तणावाखाली असता किंवा अधिक चिंता करत असता तेव्हा मेंदू थकतो. अशा वेळी आपल्या मेंदूची कार्य करण्याची पद्धत किंचितशी बदलते. हे बदल लक्षात घेता, ‘देजा वू’सारखा अनुभव येणे अशक्य नक्कीच नाही, अशी माहिती जोर्डाना यांनी दिली.

तर स्पीअर्स यांच्या मते, अशिक्षित लोकांपेक्षा शिक्षित लोकांमध्ये ‘देजा वू’चा अनुभव येण्याची अधिक शक्यता असते. ते म्हणाले, “जे लोक खूप प्रवास करतात, जे त्यांची स्वप्ने लक्षात ठेवतात आणि जे लोक उदारमतवादी विचारांवर विश्वास ठेवतात, त्यांना असा अनुभव वारंवार येण्याची शक्यता असते.”

‘देजा वू’ अस्वस्थ मेंदूचे लक्षण आहे का?

जोर्डाना म्हणतात, ‘देजा वू’ हे अस्वस्थ मेंदूचे लक्षण नाही. उलट जे लोक सदृढ आहेत, त्यांनाच ‘देजा वू’चा अनुभव अधिक येतो. १५ ते २५ वयोगटातील लोकांना याचा जास्त अनुभव येतो.

पण स्पीअर्स यांचे याबाबतचे मत वेगळे आहे. ते म्हणतात, जर कुणाला वर्षातून अनेक वेळा किंवा महिन्यातून बऱ्याच वेळा असा अनुभव येत असेल तर त्यांनी वैद्यकीय सल्ला घेण्याची गरज आहे. स्पीअर्स पुढे म्हणतात, काही सेकंदांपेक्षा अधिक काळ जर ‘देजा वू’चा अनुभव आला तर वास्तव काय आहे? हे जाणण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. आपल्याकडे अजूनही ‘देजा वू’सारख्या संकल्पनेचे संरचनात्मक स्पष्टीकरण नसल्याचेही त्यांनी सांगितले.