वाडिया समूहाच्या मालकीची स्वस्त दरातील प्रवासी विमानसेवा ‘गो फर्स्ट’ने मे महिन्यात स्वेच्छा दिवाळखोरी जाहीर केली. दुसरीकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे देशातील प्रमुख शहरांकडे प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. याच कारणामुळे मागील काही दिवसांपासून देशांतर्गत विमान वाहतूक सेवा चांगलीच महागली आहे. एक प्रवाशाने तर दिल्लीहून अहमदाबादला जाण्यासाठी तब्बल २१ हजार रुपये मोजले आहेत. विमान वाहतुकीसाठी तिकीट दर वाढल्यामुळे प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत. परिणामी तिकीट दरवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी थेट केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर देशांतर्गत विमान वाहतूक सेवा का महागली? सध्या तिकिटांचे दर किती आहेत? केंद्र सरकारने तिकीट दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत? हे जाणून घेऊ या…

दिल्ली ते मुंबई प्रवासासाठी मोजावे लागले १८ हजार ६५४ रुपये

साधारण महिन्याभरापासून विमान प्रवास महागला आहे. विशेष म्हणजे प्रवासाच्या दिवशी आणि विमानोड्डाणाच्या २४ तास अगोदर तिकीट काढायचे असेल तर प्रवाशांना खूप पैसे मोजावे लागत आहेत. देशातील सर्वांत महत्त्वाचे आणि प्रवाशांची संख्या जास्त असलेल्या सहा विमान मार्गांच्या तिकिटात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासह दिल्ली आणि मुंबईच्या बाहेर जाणाऱ्या विमानांच्या तिकिटाचे दर तर प्रचंड वाढले आहेत. १ जून रोजी दिल्ली ते मुंबई प्रवास करण्यासाठी प्रवाशांना एका तिकिटासाठी साधारण १८ हजार ६५४ रुपये मोजावे लागले आहेत. १ मे रोजी याच मार्गाने प्रवास करण्यासाठी साधारण ६१२५ रुपये तिकीट होते. म्हणजेच एका महिन्यात तिकीट दरांत तिप्पट वाढ झाली आहे. तत्काळ विमान तिकीट महागडेच असते. मात्र मागील एका महिन्यात विमानाच्या तिकिटांत अपेक्षेपेक्षा वाढ झाली आहे. १ जून रोजी मुंबईहून कोचीला जाण्यासाठी २० हजार रुपये हे सर्वांत स्वस्त तिकीट होते. महिन्याभरापासून दिल्ली ते कोलकाता स्पॉट तिकिटामध्ये साधारण ७३ टक्के तर दिल्ली ते पुणे तिकिटात २१४ टक्के वाढ झाली आहे. १ मे रोजी दिल्ली ते पुणे तिकीट ५४६९ रुपये होते. आता हेच तिकीट १७ हजार २०० रुपये झाले आहे. ३० दिवसांपूर्वी बुक केलेल्या तिकिटांचाही दर वाढला आहे. मात्र ही दरवाढ तुलनेने कमी आहे.

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
Shivaji Park ground, Shivaji Park, MNS Shivaji Park,
शिवाजी पार्कचे मैदानाचा निर्णय गुलदस्त्यात, महायुतीने मैदान अडवल्यामुळे ४५ दिवसांची मर्यादा संपल्याचा मनसेचा आरोप
Raj Thackeray Election
Raj Thackeray : राज ठाकरे निवडणूक का लढवत नाहीत? बाळासाहेब ठाकरेंबरोबरचा ‘तो’ प्रसंग आठवत म्हणाले…
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर

हेही वाचा >>> विश्लेषण : नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक कशी होते? नोकरीपायी चार महिन्यांत साडेपाच कोटी गमावले?

दिवाळखोरीमुळे ‘गो फस्ट’ने उड्डाण थांबवले

हवाई वाहतूक सेवा देणाऱ्या ‘गो फस्ट’ या हवाई वाहतूक कंपनीने स्वेच्छेने दिवाळखोरी जाहीर केली आहे. ही देशातील तिसरी सर्वांत मोठी हवाई वाहतूक सेवा देणारी कंपनी होती. मात्र दिवाळखोरीमुळे या कंपनीने २ मे रोजी विमानोड्डाणे थांबवली. एका मोठ्या कंपनीने विमानोड्डाणे थांबवल्यामुळे हवाई वाहतूक सेवेवर ताण पडत आहे. परिणामी आता विमानाच्या तिकिटाचे दर गगनाला भिडले आहेत.

विमानाची तिकिटे का महागली, नेमके कारण काय?

‘गो फस्ट’ ही हवाई वाहतूक सेवा देणारी कंपनी सध्या सक्रिय नसल्यामुळे त्याचा ताण इतर हवाई वाहतूक कंपन्यांवर पडत आहे. ही कंपनी एप्रिल ते ऑक्टोबर या महिन्यांत आठवड्याला साधारण १५०० विमानोड्डाण करणार होती. मात्र कंपनीने आपली सेवा थांबवल्यामुळे ज्या लोकांनी या कंपनीकडून अगोदरच तिकिटे बुक केलेली आहेत, त्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. ते तिकीट बुक करण्यासाठी अन्य हवाई वाहतूक कंपन्यांकडे जात आहेत. सध्या विमानातून प्रवास करण्यासाठी तिकिटांची मागणी वाढल्यामुळे दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. विद्यार्थ्यांच्या शाळांना सुट्टी असते. परिणामी फिरण्यासाठी तसेच नातेवाईकांकडे जाणाऱ्या मुलांचे प्रमाण बरेच असते. असे असतानाच ‘गो फस्ट’ने दिवाळखोरी जाहीर केल्यामुळे अन्य विमान कंपन्यांवर त्याचा ताण आला. याबाबत बोलताना एका हवाई वाहतूक कंपनीच्या कर्मचाऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे. “मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तसेच जून महिन्यात सुरुवातीचे काही दिवस विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते. या काळात शाळा सुरू होणार असल्यामुळे विद्यार्थी आपापल्या घरी परततात. करोना महासाथीनंतर पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या एवढी वाढली आहे,” असे या अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>> विश्लेषण: बलात्कार पीडितेला मंगळ म्हणून लग्नाला आरोपीचा विरोध ..काय आहे नेमके हे प्रकरण ? 

‘गो फस्ट’ एअरलाइन्सच्या निर्णयामुळे विमानाची तिकिटे महागली

‘गो फस्ट’ कंपनीच्या विमानाने प्रवास करण्यासाठी ज्या लोकांनी तिकीट बुक केले होते, त्यांच्याकडे सध्या कोणताही पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे ते आता अन्य हवाई वाहतूक कंपन्यांकडे तिकीट मिळेल का? यासाठी चौकशी करीत आहेत. यावर आणखी एका एअरलाइन्सच्या कार्यकारी अधिकाऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे. ” ‘गो फस्ट’ एअरलाइन्सच्या निर्णयामुळे विमानाची तिकिटे महागली आहेत. विशेष म्हणजे ‘गो फस्ट’ची विमाने ज्या मार्गाने जाणार होती, त्याच मार्गावरील तिकिटांच्या दरांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे,” असे या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

दिल्लीवरून अहमदाबादला जाण्यासाठी तब्बल २१ हजार रुपये तिकीट

विमानाच्या तिकीट दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे प्रवाशांनी आपला संताप सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. श्रुती चतुर्वेदी नेहमी विमानाने प्रवास करतात. मात्र त्यांनी दिल्लीवरून अहमदाबादला विमानाने जाण्यासाठी तब्बल २१ हजार रुपये मोजले आहेत. तसेच रोहित वर्मा नावाच्या अन्य प्रवाशाने दिल्लीवरून बंगळुरूच्या एका तिकिटासाठी २० हजार रुपये मोजले आहेत.

हेही वाचा >>> केरळमध्ये मोफत इंटरनेट सेवा देणारी योजना काय आहे? या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत?

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाचा हस्तक्षेप

दरम्यान, हवाई वाहतूक कंपन्यांनी आपल्या तिकीट दरात मोठ्या प्रमाणात वाढ केल्यामुळे शेवटी केंद्र सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे. केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी हवाई वाहतूक कंपन्यांना तिकिटाचे दर नियंत्रणात राहावेत म्हणून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे ‘गो फस्ट’ने आपली उड्डाणे रद्द केल्यामुळे ज्या मार्गांवर गैरसोय होत आहे, त्या मार्गावरील हवाई प्रवास महागणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश शिंदे यांनी हवाई वाहतूक कंपन्यांना दिले आहेत. यासह शिंदे यांनी सल्लागार गटासोबत बैठक घेऊन तिकीटवाढीची कारणे तसेच त्यावरील उपायांवर चर्चा केली. “हवाई वाहतूक कंपन्यांनी ज्या मार्गांवरील तिकिटांमध्ये वाढ झाली आहे, त्या मार्गांवर लक्ष देऊन तिकिटाचे दर नियंत्रणात कसे राहतील यावर लक्ष द्यावे. विशेष म्हणजे ‘गो फस्ट’ ही कंपनी याआधी ज्या मार्गांवर आपली सेवा देत होती, त्या मार्गांवर खास लक्ष ठेवावे,” असे नागरी उड्डाण मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

श्रीनगर, गोवा, अहमदाबाद, पुणे मार्गावरील विमानांची तिकिटे महागली

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने तिकिटाचे दर नियंत्रित राहावेत यासाठी प्रयत्न सुरू केले असले तरी नेमक्या कोणत्या मार्गावर तिकीट वाढले आहे, हे मंत्रालयाने सांगितलेले नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लेह, श्रीनगर, गोवा, अहमदाबाद, पुणे या मार्गावर जाणाऱ्या विमानांची तिकिटे महागली आहेत. मागील महिन्यात या मार्गावरील विमान प्रवास ५० ते ८० टक्क्यांनी महागल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : मॉरिशसमधून येणाऱ्या परदेशी गुंतवणुकीवर पाळत का?

ओदिशा रेल्वे अपघातानंतर तिकीट दरांत वाढ

शुक्रवारी (२ जून) ओदिशा येथे रेल्वे अपघात झाल्यानंतर विमान वाहतूक कंपन्यांनी विमानाचे तिकीट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बंगळुरू, भुवनेश्वर, कोलकाता, विझाग, हैदराबाद, चेन्नई या शहरांकडे जाणाऱ्या विमानांच्या तिकिटाचा दर थेट दुप्पट झाला आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने तिकीट दर नियंत्रणात ठेवण्याचे आवाहन करूनही ओदिशातील रेल्वे अपघातानंतर तिकिटांचा दर वाढवण्यात आला आहे. शिंदे यांनी आपत्तीच्या काळात मानवतावादी दृष्टिकोन ठेवून तिकिटांचे दर वाढणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे सांगितलेले आहे. विशेष म्हणजे या रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी मोफत विमान प्रवासाची सोय करावी, असे आवाहन त्यांनी केलेले आहे. मात्र तरीदेखील हवाई वाहतूक कंपन्यांनी आपल्या तिकीट दरांत वाढ केली आहे.