संपूर्ण जगासाठी वायू प्रदूषण ही गंभीर आणि चिंतेत टाकणारी समस्या बनली आहे. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. भारताची राजधानी दिल्लीमध्ये तर हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) अतिवाईट आणि धोकादायक या श्रेणीमध्ये गेला आहे. एक्यूआयमध्ये हवेच्या प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या विविध घटकांचे प्रमाण मोजले जाते. हे प्रमाण एकत्र करून एक्यूआय काढला जातो. यामध्ये पीएम १०, पीएम २.५, नायट्रोजन डाय ऑक्साइड, ओझोन, कार्बन अशा अनेक घटकांचा समावेश होतो. याच पार्श्वभूमीवर या घटकांमुळे वायू प्रदूषण कसे होते? हे घटक मानवी आरोग्यास किती धोकादायक आहेत? हे जाणून घेऊ या….
पीएम १० आणि पीएम २.५ काय आहे?
पीएम (Particulate Matter ) हे वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणारे धूलिकण आहेत. पीएम आकाराने अत्यंत सूक्ष्म असतात. याच कारणामुळे ते श्वसनावाटे शरीरात सहज प्रवेश करू शकतात. हे कण आरोग्यास घातक ठरतात. पीएमच्या समोर असलेले अंक हे संबंधित धूलिकणाचा व्यास किती आहे हे सांगतात. म्हणजेच पीएम १० आणि पीएम २.५ या धूलिकणांचा व्यास अनुक्रमे १० आणि २.५ मायक्रॉनपेक्षा कमी आहे.
धूलिकणांमुळे अस्थमा, हृदयविकाराचा झटका, ब्राँकायटिसचा धोका
सूक्ष्म आकारामुळे पीएम २.५ हे धूलिकण श्वसन यंत्रणेद्वारे शरीरात जातात. या धूलिकणांमुळे अस्थमा, हृदयविकाराचा झटका, ब्राँकायटिस तसेच श्वसनाचे इतर विकार होण्याची शक्यता असते. कारखाने, वाहनांमुळे होणारे प्रदूषण, बांधकामांमुळे होणारे प्रदूषण, रस्त्यांवरील धूळ; यामुळे पीएम या धूलिकणांची निर्मिती होते. ते सूक्ष्म असल्यामुळे हवा आणि वातावरणात फिरत असतात.
नायट्रोजन डाय ऑक्साइड (NO2)
इंधनाच्या ज्वलनामुळे नायट्रोजन डाय ऑक्साइडची निर्मिती होते. वीजनिर्मिती केंद्रे तसेच वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळेही नायट्रोजन डाय ऑक्साइडची निर्मिती होते. युनायटेड स्टेट्स एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन एजन्सीने (ईपीए) नायट्रोजन डाय ऑक्साइडच्या दुष्परिणामाबद्दल सविस्तर सांगितले आहे. नायट्रोजन डाय ऑक्साइडमुळे श्वसनाचे विकार होऊ शकतात. यात अस्थमा, खोकला, श्वास घेण्यास अडथळा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. दिल्लीतील एम्स रुग्णालयाने केलेल्या अभ्यासानुसार नायट्रोजन डाय ऑक्साइडच्या संपर्कात आल्यास (शून्य ते सात दिवस) शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. ही शक्यता ५३ टक्के आहे.
ओझोन (O3)
पृथ्वीभोवती साधारण १२ ते ५० किलोमीटरच्या पट्ट्यात असणारा स्तर म्हणजे स्थितांबर (समताप मंडल-स्ट्रॅटोस्फियर). येथे ओझोन वायूचा स्तर असतो. हा ओझोन स्तर हानिकारक अतिनील किरणोत्सर्गापासून आपल्या वसुंधरेच्या जीवसृष्टीचे तसेच मानवी आरोग्याचे रक्षण करतो. मात्र, हाच ओझोन वायू पृथ्वीच्या पृष्ठभागावर आल्यास वायू प्रदूषण होते. ओझोन वायूची पृथ्वीच्या वातावरणात असलेल्या प्रदूषकांशी अभिक्रिया होते. याबाबत २०१७ साली इंटरनॅशनल जर्नल ऑफ मेडिकल पब्लिक हेल्थमध्ये एक अभ्यास प्रकाशित करण्यात आला होता. या अभ्यासानुसार पृथ्वीच्या पृष्ठभागावर ओझोनचे प्रमाण वाढल्यामुळे प्रकृतीवर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) तसेच हृदय आणि श्वसनाशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते.
सल्फर डाय ऑक्साइड (SO2)
अमेरिकन सरकारच्या पर्यावरण संरक्षण एजन्सीनुसार वीजनिर्मिती केंद्रात वापरल्या जाणाऱ्या जीवाश्म इंधन आणि उद्योगांमुळे सल्फर डाय ऑक्साइडची निर्मिती होते. औद्योगिक प्रक्रिया आणि ज्वालामुखीसारख्या नैसर्गिक कारणांमुळेही सल्फर डाय ऑक्साइडची निर्मिती होते. सल्फर डाय ऑक्साइड हा देखील मानवाला तसेच पर्यावरणास हानिकारक आहे. या वायूमुळे हृदय, रक्तवाहिन्या तसेच श्वसनाचे आजार होऊ शकतात. सल्फर डाय ऑक्साइडची वातावरणातील अन्य घटकांशी रासायनिक अभिक्रिया झाल्यास पर्टिकुलेट मॅटर हे सूक्ष्म धूलिकण तयार होतात. या वायूमुळे झाडे, वनस्पतींवरही विपरित परिणाम होऊ शकतो.
अमोनिया (NH3)
नासाने २०१७ साली अमोनियाचे आरोग्यावर पडणारे परिणाम जाणून घेण्यासाठी एक अभ्यास केला होता. यात भारतात रासायनिक खतांचा वापर वाढत असल्यामुळे अमोनियाचे प्रमाण वाढत आहे, असे नासाने या अभ्यासात म्हटले होते. अमोनिया हा वायू पृथ्वीवरील नायट्रोजन सायकलचा एक नैसर्गिक भाग आहे. त्यामुळे या वायूला घाबरण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. मात्र, अतिरिक्त अमोनियामुळे झाडांना धोका निर्माण होऊ शकतो. तसेच हवा आणि पाण्याची गुणवत्ता कमी होऊ शकते.
अल्गल ब्लुम्समुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी
अमोनिया वायूची नायट्रिक आणि सल्फ्यूरिक अॅसिडशी रासायनिक अभिक्रिया होते. या अभिक्रियेमुळे नायट्रेट असलेले कण तयार होतात. या कणांमुळे वायू प्रदूषण होते. या कणांचा मानवी आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो. अमोनिया वायू तळे, नाले, सागरात मिसळू शकतो. तसे झाल्यास पाण्यात अल्गल ब्लुम्स तयार होतात. या अल्गल ब्लुम्समुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे पाण्यात राहणाऱ्या वेगवेगळ्या जलचर प्राण्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
लीड (Pb)
लीड म्हणजेच शिसे हा पृथ्वीच्या भूगर्भात नैसर्गिकरित्या आढळणारा विषारी धातू आहे. मात्र, शिशाचे प्रमाण वाढल्यास ते मानवी स्वास्थ्यासाठी अतिशय हानिकारक ठरू शकते. खाणकाम, स्मेल्टिंग, मॅन्यूफॅक्चरिंग आणि रिसायकलिंग यामुळे शिसे वातावरणात मिसळते आणि प्रदूषण होते. शिसे हे लहान मुलांसाठी अधिक धोकादायक असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार शिशाची विषबाधा झाल्यानंतर मुलांना कायमचे अपंगत्व येऊ शकते. शरीरात शिसे जाण्याचे प्रमाण कमी असल्यास कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. मात्र, यामुळे वेगवेगळ्या अवयवांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. शिसे हा घातक पदार्थ भिंतीला लावणारे पेंट, घरगुती रंग, रंगकांड्या, रंगीत पेन्सिल, होळीचे रंग, चिनी मातीच्या बरण्या यामध्ये वापरला जातो. याबरोबरच मातीतही शिसे असते. त्यामुळे या वस्तूंच्या सानिध्यात आल्यास त्याची विषबाधा होते. ही विषबाधा झाली की या मुलांमध्ये डोकेदुखी, चिडचिडेपणा, पोटदुखी, थकवा येणे, मळमळ होणे, रक्तक्षय, पॅरालिसीस, कमी ऐकायला येणे, एकाग्रता नसणे ही लक्षणे आढळून येतात. एवढेच नव्हे तर ज्या मुलांच्या रक्तात शिसाच्या विषाचे प्रमाण अधिक असते, अशा मुलांचा बुद्ध्यांक कमी असतो.
कार्बन मोनॉक्साईड (CO)
हा एक विषारी, रंगहीन, चवहीन वायू आहे. लाकूड, कोळसा, पेट्रोल अशा कार्बनयुक्त इंधनांच्या ज्वलनानंतर कार्बन मोनॉक्साईडची निर्मिती होते. कार्बन मोनॉक्साईड शरीरात मोठ्या प्रमाणात गेल्यास माणसाची शुद्ध हरपू शकते. या वायूच्या दीर्घकाळ संपर्कात आल्यास हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात.