Delhi Assembly Election Results 2025: आज दिल्लीच्या निवडणुकांचा निकाल लागला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या निवडणुकीत अनेक मुद्द्यांवर घमासान चर्चा सुरू आहे, त्यात सर्वाधिक चर्चा झाली ती यमुनेच्या प्रदूषणावर. अरविंद केजरीवाल यांनी यमुनेच्या पाण्यावर भाजपाशासित हरियाणामध्ये विषप्रयोग करण्यात आल्याचा आरोप केला. तर पंतप्रधान मोदींनी तेच पाणी मी पितो असे म्हटले होते. त्यामुळे आपची सत्ता गेल्यावर आता यमुनेच्या पाण्यात कमळ फुलल्याने यमुना स्वच्छ होणार का, यावर नवी चर्चा सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर यमुनेचे प्रदूषण आणि तिचे प्राचीन पौराणिक महत्त्व नेमकं काय सांगते याचा घेतलेला आढावा.
यमुनेचा पूर
यमुना ही प्राचीन काळापासून तिच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे. गंगेसारखी ती वेगवान आणि हिंस्र न वाटता आपल्या स्थिर आणि संयमी प्रवाहासाठी ओळखली जाते. यमुना नदी ही हिंदू धर्मात कासव वाहन असलेल्या यमुना देवीच्या स्वरूपात दर्शवली जाते. गेल्या काही दशकांमध्ये यमुनेच्या प्रदूषणावर सतत चर्चा होत असली तरी तिचे सांस्कृतिक महत्त्व आणि इतिहास बाजूला पडला आहे. तिच्या काठावर वाढलेल्या अनियंत्रित बांधकामांमुळे ती अधिक उग्र आणि विध्वंसाचे प्रतीक ठरली आहे. या सर्वांचा परिपाक म्हणजे २०२३ साली आलेल्या पुरामुळे यमुनेच्या पाण्याची पातळी २०८ मीटरवर पोहोचली आणि मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली. अशीच स्थिती थोड्याफार फरकाने २०२४ सालीही निर्माण झाली होती. त्यामुळे यमुनेच्या पाण्याने दिल्लीच्या रस्त्यांवर आपले अस्तित्व पुन्हा दाखविण्याचा प्रयत्न केला हा विध्वंसाकडे जाण्याचा संकेत असावा, अशी चर्चा सुरू झाली.
पुरातन इतिहास आणि बदलते प्रवाह
एका गाजलेल्या पुरातन चित्रात सलीमगड किल्ला आणि लाल किल्ल्याला जोडणारा पूल आहे. त्यात या पुलाखाली वाहणारा यमुनेचा प्रवाह दिसतो. मात्र, तो प्रवाह आजच्या काळात रिंगरोड आणि इतर रस्त्यांनी झाकला गेला आहे. यमुनेच्या अलीकडच्या पुरामुळे तिच्या पूर्वीच्या प्रवाहाचा आठव डोह पुन्हा एकदा जागा झाला. अशाच प्रकारची स्थिती मथुरा आणि आग्र्यासारख्या ऐतिहासिक शहरांमध्येही दिसून आली. या भागांमध्ये गेल्या कित्येक दशकांत न झालेली पूरस्थिती अनुभवायला मिळाली. यामुळे यमुनेच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
कृष्ण, मथुरा आणि यमुना
हिंदू धर्म आणि भारतीय पौराणिक कथांमध्ये यमुनेला विशेष महत्त्व आहे. कृष्णजन्मभूमी मथुरेतून वाहणाऱ्या या नदीला पवित्र मानले जाते. कृष्णाचा जन्म झाल्यावर वसुदेव जेव्हा त्याला गोकुळात घेऊन जात होते तेव्हा यमुनेने आपला प्रवाह बाजूला केला आणि त्यांना मार्ग दिला असा पौराणिक संदर्भ आहे. म्हणूनच कृष्ण आणि यमुना यांच्यातील संबंध अतूट मानला जातो. यमुनेला ‘कालिंदी’ असेही म्हटले जाते. हे नाव कालिया नागाशी संबंधित आहे. कालिया नागाने यमुनेचे पाणी विषारी केले होते आणि कृष्णाने यमुनेच्या प्रवाहात उतरून त्याला पराजित केले, अशी कथा आहे.
त्रिवेणी संगम
भगवद् पुराणात यमुनेला कृष्णाची पत्नी म्हणूनही दर्शवले आहे. महाभारतात देवी यमुना ही सूर्यदेवाची पत्नी संजना हिची कन्या आणि यमराजाची जुळी बहीण म्हणून संदर्भ येतो. या पौराणिक कथांमुळे यमुनेला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. वृंदावन आणि मथुरेत यमुनेच्या काठावर विविध मंदिरे आणि धार्मिक केंद्रे आहेत. येथे अनेक सण मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. गंगेची उपनदी म्हणून यमुना प्रयागराज (पूर्वीचे अलाहाबाद) येथे गंगेत विलीन होते. प्रयागराज हे ठिकाण गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा त्रिवेणी संगम मानले जाते.
आग्रा आणि सौंदर्यशास्त्र
यमुनेच्या काठावर राहणाऱ्या लोकांचा आणि या नदीचा संबंध फार मोठा आहे. विशेषतः मुघल काळात आग्र्यातील यमुनेच्या काठावर राजस सौंदर्याचा आविष्कार पहायला मिळाला. ताजमहालाजवळून वाहणाऱ्या या नदीच्या सौंदर्यात मुघल बादशाहांनी भर घातली. बाबराने उत्तर भारताच्या उन्हाळ्याने त्रस्त होऊन यमुनेच्या काठावर सुंदर बागा उभारल्या. यातील प्रसिद्ध रामबाग आजही अस्तित्वात आहे. दिल्ली आणि मथुरेत यमुनेच्या काठावर सार्वजनिक आणि धार्मिक वास्तू होत्या, तर आग्र्यात मुघल खासगी वास्तू दिसून येतात. त्यामुळे यमुना नदी आग्र्याच्या भूतकाळाचा आणि तिच्या वैभवाचा एक अविभाज्य भाग ठरली आहे.
दिल्ली आणि बदल
यमुनेचा आणि दिल्लीत झालेल्या राजकीय बदलांचा अतिशय जवळचा संबंध आहे. महाभारतात उल्लेखलेल्या इंद्रप्रस्थचे स्थान आजच्या दिल्लीच्या परिसरात होते, असे मानले जाते. दिल्ली अनेक शतकांपासून वेगवेगळ्या राजवटींचे केंद्र राहिली आहे. १५४६ मध्ये शेरशाह सुरीचा पुत्र सलीम शाह सुरीने यमुनेच्या बेटावर सलीमगड किल्ला बांधला. काही वर्षांतच मुघल सम्राट हुमायूँने हा प्रदेश परत मिळवला आणि या किल्ल्याचे नाव नूरगड असे ठेवले. पुढे, औरंगजेबाने या किल्ल्याचा उपयोग तुरुंग म्हणून केला, तर ब्रिटिशांनीही त्याचा वापर कारागृह म्हणून केला. १६४७ मध्ये शहाजहानाबाद हे शहर पूर्ण झाले आणि दिल्ली मुघल साम्राज्याची अधिकृत राजधानी ठरली. दिल्ली आणि लाहोर यापैकी नवी राजधानी निवडताना यमुनेमुळे दिल्लीला प्राधान्य देण्यात आले. नदीमुळे शहराच्या थंड हवामानाला मदत झाली, तसेच जलवाहतूक आणि पिण्याच्या पाण्याचा स्रोतही उपलब्ध झाला.
आधुनिक काळातील यमुना आणि तिची दुरवस्था
ब्रिटिश सत्तेच्या काळात दिल्लीच्या जलस्रोतांवर आणि पूरक्षेत्रांवर मोठ्या प्रमाणात बदल झाले. यामुळे यमुनेच्या प्रवाहावर विपरीत परिणाम झाला. अलीकडच्या काळात दिल्लीच्या झपाट्याने होणाऱ्या नागरीकरणामुळे यमुनेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आज यमुना फक्त एक प्रदूषित नदी म्हणून ओळखली जाते. औद्योगिक वस्ती, कचऱ्याचा ढीग, रसायने आणि गाळ यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तसेच, विविध धरणे आणि बंधारे बांधल्याने तिच्या नैसर्गिक प्रवाहावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. दिल्लीचे हे चित्र पुढील तीन वर्षांत बदलण्याचे आश्वासन आता सत्तारूढ होणाऱ्या भाजपाने दिल्लीकरांना दिले आहे.