दिल्लीमधील कथित मद्यविक्री घोटाळ्याची सध्या देशभरात चर्चा होत आहे. या कथित घोटाळ्यासंदर्भात सीबीआयने ‘आप’चे नेते मनीष सिसोदिया यांनी अटक केली आहे. सध्या सिसोदिया यांना ४ मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या मद्यविक्री घोटाळ्यात ‘दक्षिण गटा’चा (South Group) समावेश आहे, असे ईडीने म्हटले आहे. ईडीने उल्लेख केलेला हा दक्षिण गट काय आहे? या दक्षिण गटाचा दिल्लीमधील कथित मद्यविक्री घोटाळ्याशी कसा संबंध लावला जातोय? यावर नजर टाकू या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> विश्लेषण: एरिक गार्सेटी कोण आहेत? भारताचे राजदूत म्हणून जो बायडेन यांनी केली होती निवड, लैंगिक छळाचे प्रकरण भोवले

ईडीने उल्लेख केलेला दक्षिण गट काय आहे?

ईडीने कथित मद्यविक्री घोटाळ्यासंदर्भात दोन आरोपपत्रे दाखल केली आहेत. या आरोपपत्रांत दक्षिण गटाने दिल्लीमधील घाऊक आणि किरकोळ मद्यविक्री क्षेत्रात प्रवेश करता यावा, म्हणून लाच दिल्याचा दावा करण्यात आला आहे. ईडीच्या तक्रारीनुसार आम आदमी पार्टीचे कम्युनिकेशन इन्चार्ज विजय नायर यांना दक्षिण ग्रुपने १०० कोटी रुपये दिले होते. विजय नायर यांनी ‘आप’चे प्रतिनिधित्व केले होते. या दक्षिण गटामध्ये आंध्र प्रदेशमधील ओंगले येथील खासदार मागुंता श्रीनिवासुलू रेड्डी, तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या कलवकुंतला कविता (के. कविता) अशा दिग्गज व्यक्तींचा समावेश आहे. तसेच या दक्षिण ग्रुपमध्ये मागुंता रेड्डी यांचे पुत्र राघव रेड्डी, अरबिंदो फार्मा कंपनीचे संस्थापक पी. व्ही. रामप्रसाद रेड्डी यांचे पुत्र पी. सारनाथचंद्र रेड्डी यांचाही यामध्ये समावेश आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : मिथेनचे उत्सर्जन रोखण्यात जीवाश्म इंधन कंपन्यांना अपयश, जाणून घ्या IEA च्या अहवालात नेमकं काय?

दक्षिण गटावर काय आरोप आहेत?

दिल्लीमधील मद्यविक्री घोटाळ्यात दक्षिण गटाचा समावेश असल्याचा दावा ईडीने आपल्या आरोपपत्रात केला आहे. दिल्लीच्या बाजारपेठेत प्रवेश मिळावा तसेच घाऊक आणि किरकोळ मद्यविक्री क्षेत्रात विस्ताराची संधी मिळावी यासाठी दक्षिण गटाने १०० कोटी रुपये दिल्याचे ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे. दिल्ली सरकार आणि दक्षिण गट यांच्यात संधी घडवून आणण्याचे काम नायर यांनी केले आहे. तसेच मद्यनिर्मिती आणि विक्री क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी पेरनोड रिकार्ड या कंपनीची ग्लेनलिवेट, जॅमसन, बॅलनटीन्स, रॉयल स्टॅग, १०० पिपर्स, ब्लेंडर्स प्राईड व्हिस्की, जोकोब्स क्रीक वाईन अशा मद्यांच्या घाऊक विक्रीचे अधिकार इंडोस्पिरीट या कंपनीला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पेरनोड रिकार्ड ही फ्रान्स येथील मद्यनिर्मिती करणारी कंपनी आहे. तर इंडोस्पिरीट ही कंपनी समीर महेंद्रू यांच्या मलकीची आहे. दिल्ली मद्य घोटाळ्यात महेंद्रू हेदेखील आरोपी आहेत. याच इंडोस्पिरीट कंपनीच्या मदतीने दक्षिण गटाने नफा मिळवण्याचा प्रयत्न केला, असा दावा ईडीने केला आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : मंदावलेल्या ‘जीडीपी’मध्ये, घटता ग्राहक-उपभोग अधिक चिंताजनक… पण का?

कथित मद्यविक्री घोटाळ्यामुळे दिल्ली सरकारचे किती नुकसान झाले?

दिल्लीमधील कथित मद्यविक्री घोटाळ्यामुळे दिल्ली सरकारला साधारण ५८१ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. सरकारला ही रक्कम कराच्या रूपात मिळणार होती. ही रक्कम महेंद्रू यांच्या इंडोस्पिरिट कंपनीकडे वळवण्यात आली आणि याच रकमेचा उपयोग पुढे आप पक्षाला लाच देण्यासाठी झाला, असे ईडीने म्हटले आहे.

के. कविता यांच्यावर काय आरोप आहेत?

ईडीने महेंद्रू यांनी दिलेल्या जबाबाच्या आधावरावर के. कविता यांच्यासह इतरांना या प्रकरणात आरोपी केले आहे. दक्षिण गट माझ्याकडे आला होता. तुमच्या इंडोस्पिरिट या कंपनीत आम्हाला स्वारस्य आहे, असे या दक्षिण गटाने मला सांगितले होते. दक्षिण गटासोबत भागीदारी करताना आम्ही फोन कॉलवर चर्चा केली होती. तसेच के. कविता यांच्याशी माझी बैठक झाली होती, असे महेंद्रू यांनी सांगितल्याचे ईडीने म्हटले आहे. महेंद्रू सुरुवातीला दक्षिण गटाशी भागीदारी करण्यास उत्सुक नव्हते. मात्र आपचे विजय नायर यांनी महेंद्रू यांना दक्षिण गटाकडे भरपूर पैसे आहेत. या गटाचे चांगले राजकीय संबंध आहेत. तसेच त्यांची अरविंद केजरीवाल यांच्याशीही चांगली ओळख आहे, असे सांगितले होते. पुढे के. कविता यांची महेंद्रू यांच्याशी सप्टेंबर २०२२ मध्ये चर्चा झाली होती. तसेच २०२२ साली महेंद्रू यांनी के. कविता यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीमध्ये अरुण पिलाई यांच्यासोबत व्यवसाय करणे म्हणजे माझ्यासोबत व्यवसाय करण्यासारखे आहे. आपण आपली भागीदरी वेगवेगळ्या क्षेत्रांत वाढवू या, असे आश्वासन कविता यांनी महेंद्रू यांना दिले होते, असेही ई़डीने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : ब्रिटनमध्ये भाजीपाल्याची टंचाई, टोमॅटोचा भाव चौपट; जाणून घ्या नेमकं काय घडतंय?

दरम्यान, अरुण रामचंद्र पिलाई हे हैदराबाद येथील उद्योजक आहेत. त्यांचाही या दक्षिण गटात समावेश असल्याचे म्हटले जात आहे. के. कविता यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. ईडीने या प्रकरणात रावघ मागुंता यांना अकट केली आहे. तसेच के. कविता यांचे हैदराबाद येथील चार्टर्ड अकाऊंटंट बुचीबाबू गोरांताला यांनाही अटक केली आहे. पी. सरथचंद्र रेड्डी यांनाही ईडीने १० नोव्हेंबर २०२२ रोजी अटक केली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi liquor policy k kavitha accused what is south group know detail information prd