दिल्लीतील हवेची गुणवत्ता काही दिवसांपासून खालावली असून, गंभीर पातळीवर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे अनेकांमध्ये विविध आजार उद्भवताना दिसत आहेत. त्यामुळे रुग्णालयात रुग्णसंख्येतही वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेचा परिणाम केवळ पूर्वीपासून आजारी असणाऱ्या व्यक्तींवरच नव्हे, तर निरोगी व्यक्तींवरही होताना दिसत आहे. त्यात मुख्य म्हणजे ‘वॉकिंग न्यूमोनिया’च्या घटनांमध्येही वाढ झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. काय आहे वॉकिंग न्यूमोनिया? न्यूमोनियापेक्षा हा आजार वेगळा कसा? त्याची लक्षणे आणि उपाय काय? त्याविषयी जाणून घेऊ या…
वॉकिंग न्यूमोनिया म्हणजे काय?
‘वॉकिंग न्यूमोनिया’ हा शब्द न्यूमोनियाच्या सौम्य प्रकरणांसाठी वापरला जातो. वॉकिंग न्यूमोनिया सामान्य न्यूमोनियापेक्षा कमी गंभीर मानला जातो. या आजारात श्वासनलिकेला सूज येते. बऱ्याचदा ‘सायलेंट न्यूमोनिया’ म्हणूनही याचा उल्लेख केला जातो. मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया नावाच्या जीवाणूमुळे ‘वॉकिंग न्यूमोनिया’ची परिस्थिती उद्भवते. १९३० च्या दशकात या आजाराला हे नाव मिळाले. या परिस्थितीत रुग्णालयात दाखल होण्याची गरज नसते. परंतु, गंभीर प्रदूषणामुळे रुग्णांमध्ये याची लक्षणे दिसून येऊ लागली आहेत. २००९ च्या अभ्यासानुसार, जे लोक नायट्रोजन डाय-ऑक्साइडच्या परिसरात एक वर्षाहून अधिक काळ राहतात त्यांना न्यूमोनिया होण्याची दुप्पट शक्यता असते.
हेही वाचा : देश संकटात आणि राजाच्या राज्याभिषेकावर दौलतजादा; नागरिकांची आगपाखड
न्यूमोनियापेक्षा ‘वॉकिंग न्यूमोनिया’ वेगळा कसा?
न्यूमोनिया हा श्वसनमार्गाचा आजार आहे. न्यूमोनियामध्ये फुप्फुसातील पेशींना सूज येते आणि फुप्फुसात हवेच्या अत्यंत छोट्या छोट्या पिशव्या असतात. वॉकिंग न्यूमोनिया हा प्रदूषणासारख्या पर्यावरणीय घटकांमुळे उद्भवू शकतो. याचा परिणाम मुख्यतः सर्वांत तरुण वयोगटावर होतो. त्याचा सर्वाधिक परिणाम पाच ते १४ वर्षे वयोगटातील मुलांवर, तसेच ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींनादेखील हा आजार होऊ शकतो. विषाणूमुळे दमा, जुनाट आजार, कमकुवत रोगप्रतिकार शक्ती आणि जे लोक औषधोपचार घेत असतात, त्यांना याचा संसर्ग होण्याची शक्यता असते.
वॉकिंग न्यूमोनियाची लक्षणे काय?
वॉकिंग न्यूमोनियाची लक्षणे फ्लूसारखी असतात. त्यात ताप, थंडी वाजून येणे, खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, अशक्तपणा व पुरळ ही लक्षणे दिसून येतात. याव्यतिरिक्त वॉकिंग न्यूमोनिया असलेल्या व्यक्तीला श्वसनाच्या सौम्य लक्षणांचा सामना करावा लागतो. श्वसन समस्येचा त्रास तीन ते पाच दिवसांपेक्षा जास्त काळ होऊ शकतो. याचे निदान बहुतांशी शारीरिक तपासणी किंवा एक्स-रेद्वारे केले जाते.
त्याचा प्रसार कसा होतो?
जेव्हा संक्रमित व्यक्ती श्वास घेते, बोलते, खोकते किंवा इतरांजवळ शिंकते, तेव्हा हा आजार पसरतो. रोगजनकांच्या श्वसनोत्सर्जनाद्वारे बाहेर फेकले गेलेले थेंब हवेत तरंगत असताना इतरांना संक्रमित करू शकतात. त्यामुळे याचा प्रसार जलद होतो. एखाद्याला या आजाराने ग्रासल्यास १० दिवसांचा संसर्ग कालावधी असतो; ज्यामुळे इतरांना संक्रमण होऊ शकते. हा आजार सामान्यतः महाविद्यालये आणि शाळांसारख्या ठिकाणी जास्त प्रमाणात पसरतो.
त्याचा उपचार कसा केला जातो?
जीवाणूंद्वारे संसर्ग झाला असल्यास, डॉक्टर प्रतिजैविक देऊ शकतात. परंतु, हा विषाणूंद्वारे संसर्ग झाला असल्यास स्वतःच दूर होतो आणि फक्त लक्षणात्मक काळजी घेणे आवश्यक ठरते. फ्लूशी संबंधित न्यूमोनिया टाळण्यासाठी दरवर्षी फ्लूविरुद्ध लसीकरण करता येते. तुम्ही न्यूमोनिया लसीकरणाबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. पुरेशी झोप घ्या, सकस आहार घ्या आणि व्यायाम करा. आपले हात वारंवार धुवा आणि हात धुताना कोमट पाण्याचा किंवा साबणाचा वापर करा. अशी काळजी घेतल्यास संक्रमण होण्याचे प्रमाण कमी होते. त्याचप्रमाणे धूम्रपान टाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी, तुम्ही खोकताना किंवा शिंकताना तुमचे तोंड झाकून घ्या आणि इतरांनाही तसे करण्यास प्रोत्साहित करा.
दिल्लीची हवा किती विषारी?
सुमारे सात कोटी लोकांचे निवासस्थान असलेल्या राष्ट्रीय राजधानीत प्रदूषणाची अत्यंत गंभीर स्थिती पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (२० नोव्हेंबर) दुपारी ४ वाजताच्या आकडेवारीनुसार दिल्ली जगातील सर्वांधिक प्रदूषित शहर होते. दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक ४ वाजता ४३२ वर गेला होता. हवेत २.५ मायक्रॉनच्या प्रदूषकांचे प्रमाण २९१, तर १० मायक्रॉनच्या प्रदूषकांचे प्रमाण ४१३, कार्बन मोनोऑक्साईडचे प्रमाण १२२९ पीपीबी, सल्फर डाय-ऑक्साईचे प्रमाण ५ पीपीबी, नायट्रोजन ऑक्साईडचे प्रमाण २८ पीपीबी, ओझोन १० पीपीबी होते. अलीपूर, आनंद विहार, बवाना, नरेला, पुसा व सोनिया विहारमधील AQI ५०० वर पोहोचला होता. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी) आणि पर्यावरण मंत्रालयाने स्थापन केलेल्या कमिशन फॉर एअर क्वॉलिटी मॅनेजमेंट (सीएक्यूएम) यांनी ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅनचा चौथा टप्पा (ग्रेप-४) लागू केला आहे; त्या अंतर्गत कारखाने, बांधकामे, वाहतुकीवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. आम आदमी पार्टी (AAP) सरकार हानिकारक प्रदूषणापासून काही प्रमाणात आराम मिळवण्यासाठी कृत्रिम पावसाचा वापर करण्याची केंद्राकडे शिफारस करत आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी मंगळवारी केंद्राला पत्र लिहून, प्रदूषित प्रदेशांत कृत्रिम पाऊस पाडण्याची परवानगी मागितली आहे.