– भक्ती बिसुरे

अख्ख्या जगाला २०२० पासून अक्षरश: वेठीस धरलेल्या करोनाचे नवनवे प्रकार पुढील काही काळ येत राहणार हे आता सर्वांनीच जाणले आणि स्वीकारले आहे. २०२१ च्या अखेरीस आणि २०२२ च्या सुरुवातीला काही काळ करोना विषाणूच्या ओमायक्रॉन या प्रकाराने सर्वांच्या तोंडचे पाणी पळवले. डेल्टा या महाभयंकर प्रकारानंतर आलेला ओमायक्रॉन तुलनेने सौम्य ठरला. ओमायक्रॉननंतर जगभरातील करोना निर्बंध मोठ्या प्रमाणावर शिथिल झाले आहेत. पण जग हळूहळू पूर्वपदावर येते आहे, तोपर्यंत युरोपातून नव्या प्रकाराने आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली आहेच. 

India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
Dengue, chikungunya fever, Dengue Pune,
दिवाळीनंतर पुण्यात डेंग्यू, चिकुनगुन्याचा ताप अचानक कमी! जाणून घ्या कारणे
Mumbai constituencies polluted, byculla, Shivdi,
मुंबईत चार मतदारसंघ प्रदूषित; भायखळा, शिवडी, देवनार, मानखुर्दच्या समस्येकडे सर्वपक्षिय दुर्लक्ष
Loksatta explained Why has the central government recommended the influenza vaccine
केंद्र सरकारने इन्फ्लूएन्झा लशीची शिफारस का केली आहे? भारताला फ्लूचा विळखा?
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच

करोनाचा नवा प्रकार कोणता?

जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच ‘डेल्टाक्रॉन’ या नव्या करोना उपप्रकाराचे आव्हान जगासमोर असल्याचा इशारा दिला आहे. डेल्टा आणि ओमायक्रॉन या दोन्हींची वैशिष्ट्ये असलेल्या या प्रकाराचे डेल्टाक्रॉन असे नामकरण करण्यात आले आहे. युरोपच्या काही भागांमध्ये याचे अस्तित्व सापडल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. फ्रान्स, नेदरलँड्स आणि डेन्मार्कमध्ये प्रामुख्याने डेल्टाक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. अमेरिकेच्या काही भागातही हे रुग्ण आढळल्याचे निरीक्षण आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे मुख्यालय असलेल्या हेलिक्स या प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या करोनाबाधित नमुन्यांच्या जनुकीय क्रमनिर्धारणातून डेल्टाक्रॉनचे निदान झाल्याचे सांगण्यात येत आहे. करोनाच्या डेल्टा प्रकारच्या विषाणूचे शरीर आणि ओमायक्रॉनचे स्पाईक प्रोटीन – अशा दोन्ही प्रकारांतील जनुकीय वैशिष्ट्ये आढळून आल्याने त्याला डेल्टाक्रॉन असे संबोधण्यात येत आहे.

डेल्टाक्रॉन चिंताजनक? 

डेल्टाक्रॉन या नावातच डेल्टा असल्याने या नव्या प्रकाराबाबत धसका वाटणे साहजिक आहे, मात्र अद्याप हा प्रकार किती गंभीर किंवा किती सौम्य आहे, याबाबत निश्चित माहिती नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. डेल्टा या प्रकाराने जगभर सर्वाधिक रुग्णांना गंभीर संसर्ग झाला. हजारो माणसांनी डेल्टाने निर्माण केलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेत आपले जीव गमावले. त्यामुळे साहजिकच डेल्टा या नावाभोवती भीतीचे वलय आहे. मात्र, त्यानंतर आलेला ओमायक्रॉन हा डेल्टाच्या तुलनेत अत्यंत सौम्य विषाणू ठरला. त्याने जगभर निर्माण केलेली लाट जेवढ्या वेगाने पसरली तेवढ्याच वेगाने ओसरली देखील. जगभर झालेले लक्षणीय प्रमाणातील लसीकरण आणि नागरिकांना होऊन गेलेला करोना संसर्ग यांमुळे समूह प्रतिकारशक्तीही विकसित झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून यापुढील काळात दिसणारा संसर्ग सौम्य ठरण्याची शक्यता साथरोगाच्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

खबरदारी हाच उपाय?

डेल्टाक्रॉन या नव्या करोना प्रकाराबाबत उपलब्ध असलेली माहिती सध्या अत्यंत तोकडी आहे. युरोप, अमेरिकेत या प्रकारचे रुग्ण आढळून आल्यानंतर त्यावर अधिक संशोधन करण्यास प्रयोगशाळा आणि शास्त्रज्ञांनी स्वत:ला वाहून घेतले आहे. मात्र, त्याच्या वर्तनाचा अंदाज येईपर्यंत मागील दोन वर्षांपासून आपण घेत असलेली करोना प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे कायम ठेवणे हाच उपाय असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून स्पष्ट करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुखपट्टीचा वापर, हातांची स्वच्छता, लक्षणे दिसल्यास रुग्णाने स्वत:चे विलगीकरण करणे, उपलब्ध करोना प्रतिबंधात्मक लस, वर्धक मात्रा टोचून घेणे या बाबींकडे दुर्लक्ष नको, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.

नवे प्रकार अधिक सौम्यच असतील का?

विषाणू विरोधी प्रतिकारशक्तीपासून स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी विषाणू सातत्याने स्वत:मध्ये बदल घडवून आणतो. यालाच वैद्यकीय परिभाषेत विषाणूचे उत्परिवर्तन किंवा म्युटेशन असे म्हणतात. सर्व प्रकारच्या विषाणूंमध्ये सातत्याने बदल होऊन त्यांचे नवनवे प्रकार निर्माण होतात. करोना विषाणू संसर्ग आणि त्यातून उद्भवलेल्या महासाथीमुळे आपण हे जवळून अनुभवले आहे. मात्र, एका ठरावीक कालावधीनंतर येणारे विषाणूचे नवे प्रकार हे सौम्य होत जातात, असे निरीक्षण साथरोग तज्ज्ञांकडून नोंदवण्यात येते. लसीकरण, औषधोपचार, समूहाची रोग प्रतिकारशक्ती म्हणजेच ‘हर्ड इम्युनिटी’ या कारणांमुळे मानवी शरीर साथीच्या रोगाला तोंड देण्यास सक्षम होत जाते. त्याच बरोबर विषाणूची परिणामकारकता कमीकमी होत जाण्याचीच शक्यता अधिक असते. करोनाच्या काळात ओमायक्रॉन या नुकत्याच येऊन गेलेल्या विषाणू प्रकाराने आपल्याला हे दाखवूनही दिले आहे. मात्र, प्रत्येक वेळी येणारा प्रकार सौम्यच असेल असे नसल्याने प्रतिबंधात्मक नियमांचा विसर न पडू देणे वैयक्तिक आणि सामूहिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

महासाथ अंतर्जन्य (एंडेमिक) होणार का आणि कधी? 

करोना विषाणूचे नव्याने येणारे प्रकार हे सौम्य असल्यास करोना महासाथ (पँडेमिक) अंतर्जन्य रोगाच्या (एंडेमिक) दिशेने वाटचाल करत आहे का, याबाबत अनेक चर्चा जागतिक स्तरावर होताना दिसत आहेत. मात्र, साथीच्या एंडेमिक होण्याबाबत अद्याप कोणताही निष्कर्ष काढणे शक्य नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. आजाराची जागतिक पातळीवरील तीव्रता कमी होऊन ती स्थानिक किंवा एखाद्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशापुरती मर्यादित होणे याला त्या आजाराची वाटचाल पँडेमिक ते एंडेमिक झाली असे म्हणता येते. आजार एंडेमिक झाला तरी त्याचे गांभीर्य किंवा तीव्रता कमी होण्याची शक्यता असतेच असे नाही. विशेषत: जगाच्या पाठीवर अद्याप एक तृतीयांश नागरिकांचे संपूर्ण किंवा अजिबात लसीकरण झालेले नसताना करोना महासाथ एंडेमिक होणार का, या प्रश्नाचे उत्तर लांब असल्याचे तज्ज्ञांकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

bhakti.bisure@expressindia.com