राजधानी दिल्लीत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या रुग्णांच्या यकृतावर परिणाम होत असून ‘कॅपिलरी लीक सिंड्रोम’चा धोका वाढत असल्याचं डॉक्टरांनी म्हटले आहे. ऑक्टोबरमध्ये दिल्लीत डेंग्यूच्या ९०० रुग्णांची नोंद झाली आहे. वर्षभरात राजधानीत या रोगाचे १ हजार ८७६ रुग्ण आढळून आले आहेत. सरासरी सहा ते १० रुग्ण दररोज या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल होत असल्याचे दिल्लीतील डॉक्टरांनी सांगितले आहे. यामध्ये २० ते ४० वयोगटातील रुग्णांचा समावेश जास्त आहे.
डेंग्यू रुग्णांचे यकृत का खराब होत आहे?
करोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर रोगप्रतिकार शक्तीतील अनियमीततेमुळे आणि मंदावलेल्या शारिरीक हालचालींमुळे यकृतावर परिणाम होत आहे. डेंग्यूमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांपैकी बहुतेक रुग्णांमध्ये यकृत किंवा मूत्रपिंडाच्या आजाराची लक्षणं असतात, अशी माहिती दिल्लीतील डॉक्टरांनी दिली आहे. डेंग्यूचा संसर्ग DENV-1, DENV-2, DENV-3 आणि DENV-4 या सीरोटाइप्समुळे होतो. सध्या दिल्लीत DENV- 2 हा प्रकार आढळून येत आहे, अशी माहिती फरिदाबादमधील ‘क्यूआरजी’ रुग्णालयाचे डॉ. संतोष कुमार अग्रवाल यांनी दिली आहे.
डेंग्यूचा यकृतावर कसा परिणाम होतो?
“डेंग्यू विषाणूच्या संसर्गामध्ये, उच्च पातळीच्या रक्तातील विषाणूंमुळे (viremia) यकृत, मेंदुसह इतर अवयवांवर परिणाम होतो. या प्रक्रियेत यकृत सर्वातआधी बाधित होते. या संसर्गामुळे रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होतो”, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. २९ वर्षांखालील डेंग्यू रुग्णांमध्ये ‘हेपेटायटीस’चा धोका वाढला आहे. या वयोगटातील व्यक्तींमध्ये यकृत निकामी होण्याचे प्रमाण कमी असल्याची माहिती दिल्लीतील ‘अपोलो स्प्रेक्ट्रा’ रुग्णालयातील ‘इंटर्नल मेडिसीन’ विभागाचे संचालक डॉ. रवी शंकरजी केसरी यांनी दिली आहे. ओटीपोटातील वेदना, उलट्या आणि भूक न लागणे हे यकृत खराब होण्याची प्राथमिक लक्षणं आहेत. डोळ्यात आणि लघवीमध्ये पिवळसरपणा, हेदेखील यकृत खराब होण्याचे लक्षण आहे.
विश्लेषण : दक्षिण कोरियात चेंगराचेंगरी, १४० लोकांचा मृत्यू; पण गर्दी प्राणघातक कशी ठरू शकते?
डेंग्यू रोगाची कारणं आणि लक्षणं
‘एडिस इजिप्ती’ डासाच्या चावण्यामुळे डेंग्यू रोगाचा प्रसार होतो. हा डास चावल्यानंतर तीन ते चार दिवसांनी लक्षणं दिसू लागतात. डेंग्यूमुळे प्लेटलेटची संख्या झपाट्याने कमी होऊ लागते. उच्च ताप, अंगदुखी, डोकेदुखी, उलट्या, पोटदुखी, अशक्तपणा, थकवा ही सामान्य लक्षणं रुग्णांमध्ये दिसतात. डेंग्यू हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे. या रोगावर वेळीच उपचार न केल्यास रुग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो.