‘फिफा विश्वचषक २०२२’ स्पर्धेच्या यजमान कतारविरोधात निषेध नोंदवण्यासाठी डेन्मार्कच्या फुटबॉल संघाने काही निर्णय जाहीर केले आहेत. पश्चिम आशियाई या देशात स्पर्धेसाठी कुटुंबाविना प्रवास करणार असल्याचे डेन्मार्कच्या संघाने म्हटले आहे. “कतारमध्ये नफा निर्माण करण्यासाठी आम्हाला हातभार लावायचा नाही”, असे ‘द दानिश फुटबॉल असोसिएशन”चे (DBU) व्यवस्थापक जॅकोब हॉयर यांनी स्पष्ट केले आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या या स्पर्धेसाठी खेळाडूंसाठी नुकतीच नवी कीट जारी करण्यात आली आहे. कतारचा निषेध नोंदवण्यासाठी डेन्मार्कच्या खेळाडूंच्या जर्सीचा रंग काळा ठेवण्यात आला आहे. हा शोकाचा रंग आहे, अशी प्रतिक्रिया जर्सीची निर्मिती करणाऱ्या ह्युमेल यांनी दिली आहे. डेन्मार्ककडून कतारचा निषेध का नोंदवला जात आहे? कतारमध्ये नेमके काय घडत आहे? याबाबत हे विश्लेषण.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डेन्मार्कचा कतारवर आरोप काय?

२०२१ च्या ‘अ‍ॅमनेस्टी’ अहवालानुसार कतारमध्ये हजारो स्थलांतरीत कामगारांचे स्टेडियम आणि विश्वचषकाशी संबंधित इतर पायाभूत सुविधांच्या बांधकामात शोषण करण्यात येत आहे. या अहवालाचा संदर्भ देत ‘द दानिश फुटबॉल असोसिएशन”चे अध्यक्ष जॅकॉब जेन्सन यांनी कतार सरकार आणि ‘फिफा’ला वास्तविक परिस्थिती आणि ‘अ‍ॅमनेस्टी’ अहवालाबाबत विचारणा केली आहे. कतारच्या कामागारांसंदर्भातील धोरणांवर टीका करणारी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी जेन्सन यांनी ‘इंग्लिश फुटबॉल असोसिएशन’सह विविध संघांशी संपर्क साधला आहे. डेन्मार्कने हा मुद्दा उठवल्यानंतर स्थलांतरीत कामगारांना कतारकडून देण्यात येत असलेल्या वागणुकीबाबत विविध देशांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. स्थलांतरीत कामगारांमध्ये भारत, पाकिस्तान आणि नेपाळमधील कामगारांचा सर्वाधिक समावेश आहे. दरम्यान, विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यासाठी कतारने लावलेली बोलीही वादात सापडली होती. कतारमध्ये उन्हाळ्यात सरासरी ५० डीग्री सेल्सिअस तापमान असते. त्यामुळे उन्हाळ्यात होऊ घातलेला विश्वचषक नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.

कतारमध्ये साडेसहा हजार कामगारांचा मृत्यू?

२०१० मध्ये विश्वचषकाची घोषणा झाल्यापासून कतारमध्ये ६ हजार ५०० दक्षिण आशियाई कामगारांचा मृत्यू झाल्याचा अहवाल ‘द गार्डियन’ने प्रसिद्ध केला आहे. भारत, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका या पाच दक्षिण आशियाई देशांमधील सरासरी १२ स्थलांतरीत कामगारांचा २०१० पासून दर आठवड्याला मृत्यू झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारत संस्थापक सदस्य असलेल्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनेही (ILO) कतार कामगारांच्या मृत्यूची पुरेशी नोंद करत नाही, असे म्हटले आहे.

आरोपांवर कतारची भूमिका काय?

कामगारांचं स्वास्थ्य आणि सुरक्षेसाठी आम्ही नेहमीच पारदर्शक असल्याचे कतार विश्व चषकाच्या आयोजकांनी म्हटले आहे. “२०१४ मध्ये बांधकाम सुरू झाल्यापासून कामावर असताना तीन कामगारांचा तर इतर कारणांमुळे ३५ कामगारांचा मृत्यू झाला आहे”, असे प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे. एकीकडे कामगारांच्या शोषणाचे आरोप होत असतानाच या कामगारांसाठी काही सुविधा राबवल्याचा दावा कतार सरकारकडून येत आहे. कामगारांचं किमान वेतन २५ टक्क्यांनी म्हणजेच १ हजार कतारी रियालने वाढवण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. संबंधित कंपनीने जेवण आणि राहण्याची सुविधा न पुरवल्यास त्याचीही व्यवस्था सरकारकडून केली जात असल्याचा दावा सरकारने केला आहे. या सुधारणा सर्व क्षेत्रातील आणि सर्व देशांमधील स्थलांतरीत कामगारासाठी लागू असल्याचे कतार सरकारने स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Denmark players will wear black jersey in fifa football world cup to oppose human rights violation in qatar explained rvs
Show comments