चेहऱ्याचे सौंदर्य आणि केस प्रत्यारोपण संदर्भातील शस्त्रक्रिया या दंत वैद्यकक्षेत्रातील ओरल ॲण्ड मॅक्सिलोफेशियल तज्ज्ञांकडून केल्या जातात. त्यात चेहऱ्याची पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया, चेहऱ्यावर आघात झाल्यास त्याची शस्त्रक्रिया, तोंड, डोके, मान आणि जबडा यांच्या शस्त्रक्रिया तसेच चेहऱ्यावरील सुघटन शस्त्रक्रिया करण्याबरोबरच दुंभगलेले ओठ यांसारख्या शस्त्रक्रियांचा समावेश असतो. दंत वैद्यक शास्त्रातील डॉक्टरांना दातांवरील उपचार, रचना आणि शस्त्रक्रियेचे शिक्षण दिले जाते. तसेच चेहऱ्याचे सौंदर्य, केस प्रत्यारोपण याबाबतच्या शस्त्रक्रिया या त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या अंतर्गत येत असल्याने डायनॅमिक डर्मेटोलॉजिस्ट ॲण्ड हेअर ट्रान्सप्लांट असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या वादात न्यायलयाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

ओरल आणि मॅक्सिलोफेशियल म्हणजे काय?

ओरल आणि मॅक्सिलोफेशियल शस्त्रक्रिया, ज्याला ओएमएफएसदेखील म्हणतात. भारतीय दंत परिषदेद्वारे या अभ्यासक्रमाच्या शाखेला मान्यता देण्यात आली आहे. भारतात, मॅक्सिलोफेशियल तज्ज्ञ होण्यासाठी पाच वर्षांची दंतवैद्यक अभ्यासक्रमाची पदवी आणि त्यानंतर तीन वर्षांचे पदव्युत्तर शिक्षण आवश्यक आहे. भारतात ओरल आणि मॅक्सिलोफेशियल शस्त्रक्रियेमध्ये जटिल अशा दंत शस्त्रक्रियेच्या उपचारांचा समावेश होतो. त्यात अक्कल दाढ काढणे, दंतरोपण, क्रॅनिओमॅक्सिलोफेशियल ट्रॉमा, ओरोफेशियल वेदना आणि जबड्याची सांधेदुखी यांचा समावेश होतो. जबड्यातील ट्यूमर काढण्याची शस्त्रक्रिया, डोके आणि मानेचा कर्करोग, त्याचप्रमाणे नाक, डोळा आणि कानाची सुघटनशल्य शस्त्रक्रिया करणे, चेहऱ्यावरील सौंदर्य शस्त्रक्रिया, मायक्रोव्हॅस्क्युलर शस्त्रक्रिया, दुंभगलेल्या ओठाच्या शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. भारतात जवळजवळ २० ते २५ टक्के आघातग्रस्त रुग्णांमध्ये सामान्यतः चेहऱ्यावर आघात झालेली प्रकरणे असतात.

हे ही वाचा…A new White Revolution: भारत सध्या कुठे आहे? कुठे असायला हवा?

हा प्रश्न का उद्भवला?

भारतात वैद्यकीय व आयुष अभ्यासक्रमाचे शिक्षण, त्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे, त्यांनी द्यावयाची सेवा, त्यांची नोंदणी यांदर्भातील नियम हे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगामार्फत निश्चित केले जातात. तर दंत विषयक अभ्यासक्रम, मार्गदर्शक तत्त्वे, सेवा, नोंदणी यांसंदर्भातील सर्व निर्णय हे भारतीय दंत परिषदेकडून निश्चित केले जातात. ओरल ॲण्ड मॅक्सिलोफेशियल अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांना दंत अभ्यासाबरोबरच चेहरा आणि चेहऱ्याभोवतीच्या सर्व शस्त्रक्रिया शिकवल्या जातात. त्यामुळे भारतीय दंत परिषदेने ओरल ॲण्ड मॅक्सिलोफेशियल या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांना चेहऱ्याचे सौंदर्य, केस प्रत्यारोपण, डोके व मानेचा कर्करोग यासंदर्भातील शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे भारतात ओरल ॲण्ड मॅक्सिलोफेशियल पदवी घेणारे दंत वैद्यक हे या शस्त्रक्रिया करत आहेत. भारतीय दंत परिषद व राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग या दोन्ही स्वायत्त संस्था असल्याने त्यांच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. भारतीय दंत परिषदेच्या निर्णयामुळे ओरल ॲण्ड मॅक्सिलोफेशियल तज्ज्ञ या शस्त्रक्रिया करू शकतात.

हे ही वाचा…विश्लेषण : वंदे भारत एक्सप्रेस यशस्वी की अयशस्वी? काही वंदे भारत धूळखात का पडून आहेत?

त्वचारोग तज्ज्ञांचा विरोध

चेहऱ्यावरील शस्त्रक्रिया व केस प्रत्यारोपण हे त्वचेशी संबंधित आहेत. ओरल ॲण्ड मॅक्सिलोफेशियल हे दाताशी संबंधित आहेत. त्यामुळे दंत चिकित्सकांनी या शस्त्रक्रिया करू नयेत यासाठी त्वचारोग तज्ज्ञांनी न्यायालयात धाव घेतली आहे. केस प्रत्यारोपण आणि त्वचाविज्ञानाची प्रक्रिया अत्यंत सूक्ष्म आहे. ती केवळ एखाद्या तज्ज्ञाद्वारेच केली जाऊ शकते. या प्रक्रियेबद्दल कोणतेही अज्ञान किंवा ज्ञानाचा अभाव घातक ठरू शकतो आणि रुग्णाच्या चेहऱ्याला दुखापत होऊ शकते. दंत चिकित्सकांद्वारे केस प्रत्यारोपण आणि त्वचाविज्ञान सेवेबाबत अनेक शल्यचिकित्सकांकडून तसेच नागरिकांकडून अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. दंत चिकित्सक स्वतःची त्वचाविज्ञान आणि केस प्रत्यारोपण तज्ज्ञ म्हणूनही जाहिरात करत आहेत. फसव्या, दिशाभूल करणाऱ्या अस्पष्ट जाहिरातींद्वारे लोकांना आपल्याकडे आकर्षित करत आहेत. समाज माध्यमांवर आणि अनेक ठिकाणी बेकायदेशीर जाहिरातींबद्दल त्वचारोग तज्ज्ञांनी आक्षेप नोंदवला आहे. या जाहिरातींमुळे निष्पाप व्यक्तींच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. सरकारी अधिकारी, भारतीय दंत परिषद आणि आरोग्य अधिकाऱ्यांकडे योग्य कारवाई करण्यासाठी अनेक तक्रारीही करण्यात आल्या.. मात्र यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे त्वचारोग तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा…Indus Valley Civilization: १०० वर्षांपूर्वी खोवला गेला मानाचा तुरा आणि भारतीय संस्कृती ठरली तब्बल ५००० वर्षांहून अधिक प्राचीन!

अमेरिकेत मान्यता

अमेरिकेतील ओरल ॲण्ड मॅक्सिलोफेशियल शस्त्रक्रिया ही एक मान्यताप्राप्त शस्त्रक्रिया आहे. मौखिक पोकळीची शस्त्रक्रिया, कृत्रिम दात बसवण्याची शस्त्रक्रिया, डेंटोअल्व्होलर शस्त्रक्रिया, टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉइंटची शस्त्रक्रिया, चेहऱ्यावरील सामान्य शस्त्रक्रिया, पुनर्रचना, डोके, मान, तोंड आणि जबडा, चेहर्यावरील कॉस्मेटिक शस्त्रक्रिया, चेहऱ्याची विकृती, क्रॅनिओफेशियल शस्त्रक्रिया, चेहऱ्याच्या त्वचेचा कर्करोग, डोके आणि मानेचा कर्करोग, मायक्रोसर्जरी फ्री फ्लॅप रिकन्स्ट्रक्शन, चेहऱ्यावरील शस्त्रक्रिया करण्यास अमेरिकेमध्ये मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे अमेरिकेतील ओरल ॲण्ड मॅक्सिलोफेशियल तज्ज्ञ या शस्त्रक्रिया करतात.