Maharashtra government Rajmata Gomata: महाराष्ट्र सरकारने देशी गायींना ‘राज्यमाता- गोमाता’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये महाराष्ट्रातील देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती हा प्रस्ताव मान्य करून या संदर्भातला शासन आदेश (जीआर) जारी करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय संस्कृती आणि मिथकं गायींबद्दल काय सांगतात हे जाणून घेणं माहितीपूर्ण ठरावं.

पौराणिक संदर्भ

गायींना भारतीय संस्कृतीत पवित्र मानले जाते. याशिवाय प्राचीन इजिप्त, ग्रीस, इस्रायल, रोम अशा अनेक संस्कृतींमध्ये गायींना अन्यनसाधारण महत्त्व होते. भारतीय पुराणकथांमध्ये गायीला अत्यंत पूज्य आणि प्रतिमात्मक स्थान आहे. गाय ही मातृत्व, समृद्धी आणि पावित्र्याचे प्रतिनिधित्व करते. हिंदू धर्मातील अनेक शास्त्रं आणि महाकाव्यांमध्ये गायीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. हिंदू पुराणकथांमध्ये कामधेनू या पूजनीय गायीचा संदर्भ सापडतो. या गायीला सुरभी असेही म्हणतात. ही एक दिव्य गाय असल्याचे मानले जाते. कामधेनूला सर्व गायींची माता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

गोविंदा आणि नंदिनी

कामधेनूची ख्याती इच्छापूर्ती करणारी गाय म्हणून आहे. कामधेनू कोणतीही इच्छा पूर्ण करण्यास सक्षम असते आणि ही गाय समुद्रमंथनाच्या वेळी प्रकट झाली होती. यानंतर महत्त्वाची मानली गेलेली गाय म्हणजे कामधेनूची कन्या नंदिनी. नंदिनीचा संदर्भ अनेक कथांमध्ये आढळतो. नंदिनीशी संबंधित ऋषी वसिष्ठ आणि राजा विश्वामित्र यांची प्रसिद्ध कथा आहे. भारतीय संस्कृतीत गायींचा संबंध हा श्रीकृष्णाशी जोडलेला आहे. नंदाच्या घरी बालपण गेल्यामुळे श्रीकृष्ण हा गवळी किंवा गोपालकाच्या स्वरूपात पूजला जातो. म्हणूनच श्रीकृष्णाचे ‘गोविंदा’ हे नाव सुप्रसिद्ध आहे.

अधिक वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांनी तिरुपती बालाजीचे घेतले होते दर्शन; ऐतिहासिक संदर्भ काय सांगतात?

ऋग्वेदातील उल्लेख

हिंदू धर्मातील सर्वात प्राचीन ग्रंथ ऋग्वेदामध्ये गाईला अघ्न्या म्हटले आहे. अघ्न्या म्हणजे ‘जिला मारले जाऊ नये’ अशी. हे उदाहरण प्राचीन कालखंडातील गायीच्या पवित्र स्थानाचे निदर्शक आहे. ऋग्वेदात गायीला संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे, तत्कालीन कालखंडात दुग्धजन्य पदार्थ हे समाजाचा प्रमुख आहार स्रोत होते. महाभारतात विविध कथांमध्ये गायींचा उल्लेख आहे. एक महत्त्वपूर्ण संदर्भ म्हणजे धर्मकर्माच्या रूपात गायींना दान करणे (गोदान) असा येतो. रामायणातील राजा दिलीप देखील नंदिनीप्रति असलेल्या त्याच्या भक्तीसाठी प्रसिद्ध आहे. विष्णु पुराण आणि गरुड पुराण यांसारख्या विविध पुराणांमध्ये गायींच्या गुणांचा गौरव करण्यात आला आहे. गायीला समृद्धी, नैतिक मूल्ये आणि शांतिप्रिय समाजाचे प्रतीक मानले जाते. या ग्रंथांमध्ये गायीचे धार्मिक विधींमधील महत्त्व विशद केले आहे. गायींना खाऊ घालणे किंवा दान करणे हे अत्यंत पुण्यकारी कर्म मानले जाते. या संदर्भांतून भारतीय पुराणकथांमधील गायींचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट होते.

वैदिक संदर्भ

वेदांनी अदितीला आणि पृथ्वीला ‘गो’ म्हटले आहे. निरुक्तानुसार ‘गो’ हा पृथ्वीचा नामपर्याय आहे. गौरिती पृथिव्या नामधेयं यदस्यां भूतानि गच्छंती । (निरुक्त, २.१.१) …गौ हे पृथ्वीचे नाव आहे, कारण भुते तिच्या ठायी गमन करतात, असा संदर्भ निरुक्तामध्ये सापडतो. पृथ्वीची गो रूपात पुराणांनी परिपुष्टी केली आहे. पृथ्वीचे दोहन करून नाना द्रव्ये प्राप्त केली गेली. त्या दोहनासाठी प्रत्येकवेळी वत्स, पात्र आणि दोग्धा या भूमिका कोणी पार पाडल्या याचे सविस्तर वर्णन पुराणांनी केले आहे. गंधवेड्या गंधर्वांनी चित्ररथाला वत्स करून पद्म पात्रात पृथ्वीचे दोहन केले आणि सुगंध मिळवले. दैत्यांच्या भाराने अथवा अन्याय अत्याचारांच्या अतिरेकाने त्रस्त झालेली पृथ्वी प्रत्येकवेळी गोरूप धारण करून परमात्म्याकडे जाते आणि त्याला दुष्टांच्या निर्दालनासाठी अवतार घ्यायला प्रवृत्त करते. अशा प्रकारच्या कथांचे पुराणात वैपुल्य आढळते. सातारा जिल्ह्यात वडगाव येथे लज्जागौरीची मूर्ती सापडली आहे, तिच्या उजव्या बाजूला वृषभ (नंदी) आहे. लज्जागौरी ही महामाता पृथ्वी असल्यामुळे ती गो-रूप आहे आणि त्यामुळे तिचा सहचर नंदी आहे (संदर्भ: लज्जागौरी: रा. चिं. ढेरे).

अधिक वाचा: Pregnancy tourism in Ladakh: प्रेग्नन्सी टुरिझम म्हणजे नक्की काय? या संकल्पनेचा संबंध इतिहासातील आर्यांच्या टोळीशी कसा जोडला गेला?

अहिंसेचा आदर्श

हिंदू धर्मात आणि संस्कृतीत अहिंसा या तत्त्वाला विशेष महत्त्व आहे. अहिंसा या तत्त्वावर आधारित शाकाहार आणि गायीचे रक्षण या दोन बाबींना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे गोमांस भक्षण करणे निषिद्ध मानले जाते.

आर्थिक महत्त्व

प्राचीन काळापासून गाय भारतीय कृषी अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. गायीचे दूध, शेण, आणि मूत्र यांचा वापर विविध कारणांसाठी केला जातो. दूध भारतीय आहारात एक महत्त्वाचा घटक आहे. याशिवाय शेण खत, इंधन, आणि गोचर्मासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे गाईचा उपयोग अनेक क्षेत्रांमध्ये केला जातो.

कृषी आणि पर्यावरणीय महत्त्व

पारंपरिक शेतीत गाईची भूमिका महत्त्वाची आहे. गाईचे शेण आणि मूत्र हे सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक घटक आहेत. गाईच्या शेणामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि पर्यावरणाचे संरक्षण होते. भारतीय शेतकरी गाईच्या पालनावर अवलंबून असतात, कारण ती शेतीच्या कामातही उपयोगी पडते.

सांस्कृतिक महत्त्व

गाईला भारतीय समाजात कुटुंबाच्या सदस्यासारखा आदर दिला जातो. गाईशी संबंधित अनेक सण आणि परंपरा आहेत. भारतीय कुटुंबे गायींना पालनकर्त्या म्हणून पाहतात, त्यामुळे तिच्याशी एक भावनिक नाते तयार होते.

नैतिकता आणि धर्मशास्त्र:

गायीला मारणे किंवा तिचे मांस खाणे हे भारतीय धर्मशास्त्रानुसार पाप मानले जाते. गायीला न मारणे आणि तिचे रक्षण करणे याकडे धार्मिक आणि नैतिक जबाबदारी म्हणून पाहिले जाते. गोदान किंवा गायीचे दान हे एक पुण्याचे कर्म मानले जाते. या सर्व कारणांमुळे गायीला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे आणि तिचा आदर हा धार्मिक, नैतिक, आर्थिक, आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून अनिवार्य आहे, असे मानले जाते. किंबहुना त्यामुळे मिथकांमधून तिचे महत्त्व समाजावर बिंबवण्यात आले, असे मिथकशास्त्र सांगते.