शेतात कोणतंही पीक घेताना त्यामध्ये विविधता जपणे ही पंजाबमधील प्रमुख समस्या आहे. तांदळाच्या साळीला (अवरण किंवा टरफलासह विकला जाणारा तांदूळ) सरकारकडून किमान आधारभूत किंमत (MSP) मिळते. तसेच त्यातून मिळणाऱ्या उच्च उत्पन्नामुळे शेतकर्यांना खात्रीशीर परतावा मिळतो. यामुळे पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात साळीची लागवड केली जाते. दुसरीकडे सुगंधी बासमती तांदळाच्या किमतीत चढ-उतार होत असतात. शिवाय त्याला सरकारकडून किमान आधारभूत किंमत मिळत नाही. तरीही हा उत्पन्नाचा सर्वोत्तम पर्याय आहे. या लेखातून आपण बासमती तांदळाच्या पिकामागील अर्थकारण समजून घेणार आहोत.
बासमतीखाली किती क्षेत्र वाढवता येईल?
पंजाबमध्ये खरीप हंगामात सुमारे ३० ते ३१ लाख हेक्टर (७४ ते ७६ लाख एकर) जमिनीवर तांदळाची लागवड केली जाते. यातील सुमारे २५ ते २६ लाख हेक्टरवर साळीची (पॅडी) लागवड केली जाते. दुसरीकडे, गेल्या अनेक वर्षांपासून बासमती पिकाखालील क्षेत्र ४ ते ५ लाख हेक्टर राहिले आहे. जून ते जुलै महिन्याच्या दरम्यान बासमतीच्या वाणांची पेरणी केली जाते. तर सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये कापणी केली जाते.
तांदूळ निर्यातदारांचे म्हणणं आहे की, बासमतीला मोठी मागणी आहे. तसेच राज्याची बासमती तांदळाचं उत्पादन घेण्याची प्रचंड क्षमता आहे. राज्यात किमान १० लाख हेक्टर क्षेत्र बासमती पिकाखाली आणले जाऊ शकते. त्यामुळे साळीच्या लागवडीखालील क्षेत्र कमी होण्यास मदत होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
साळीच्या तुलनेत बासमतीचे उत्पादन किती?
पंजाबमध्ये कमी आणि दीर्घ कालावधीच्या दोन्ही प्रकारच्या साळीची लागवड केली जाते. कमी आणि दीर्घ कालावधीच्या साळीचे सरासरी उत्पादन अनुक्रमे २८ आणि ३६ क्विंटल प्रति एकर आहे. बासमतीमध्येही दीर्घ आणि कमी कालावधीचे वाण आहेत. या जातींचे सरासरी उत्पादन २० ते २५ क्विंटल प्रति एकर आहे. हे उत्पादन साळीच्या तुलनेत प्रति एकर ८ ते १० क्विंटल कमी आहे.
रास्त धान्य दुकानातून अन्नधान्य वाटप करण्यासाठी केंद्र सरकारकडून किमान आधारभूत किमतीद्वारे साळीची खरेदी केली जाते. सरकारकडून बासमती तांदळाची खरेदी केली जात नाही. शिवाय त्याला किमान आधारभूत किंमतही दिली जात नाही. पण भारतात पिकवलेल्या बासमती तांदळाला परदेशात मोठी मागणी असल्याने व्यापारी आणि निर्यातदारांकडून याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते.
प्रत्येक पिकासाठी नफा किती आहे?
२०२२-२३ च्या खरीप हंगामात साळ (पॅडी) पिकाला प्रति क्विंटल २ हजार ६० रुपये आधारभूत किंमत मिळाली. तर बासमती तांदळाचा दर ३ हजार २०० ते ४ हजार रुपये प्रति क्विंटल इतका होता. सध्या बासमती तांदळाचा दर ४ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल इतका आहे. काही शेतकऱ्यांनी कापणीनंतर बासमती तांदूळ साठवून ठेवला होता. आता किमती वाढल्यानंतर हा तांदूळ बाजारात आणला जात आहे, अशी माहिती फाजिल्का मंडीतील एजंट विनोद गुप्ता यांनी दिली. बासमती तांदळाचा दर क्वचित कमी होतो, अन्यथा या पिकाला नेहमी चांगला दर मिळतो. पण बऱ्याचदा स्थानिक व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी दरात तांदूळ खरेदी करतात. यावर सरकारने आळा घालणे आवश्यक आहे, असंही गुप्ता म्हणाले.
हेही वाचा- विश्लेषण: समृद्धी महामार्गावरील वन्यप्राण्यांच्या अपघाती मृत्यूंना जबाबदार कोण?
साळीच्या किमान आधारभूत किमतीनुसार, शेतकऱ्याला प्रति एकर ५७६८० ते ७४१६० रुपये उत्पन्न मिळू शकते. तर बासमती तांदळाचं उत्पादन कमी असूनही प्रति एकर ६४ हजार ते एक लाख रुपये उत्पन्न मिळू शकते. गेल्या वर्षी बासमतीचा सरासरी दर प्रतिक्विंटल २,५०० ते ३,५०० इतका होता.
बासमती पिकाचे फायदे काय?
एक किलो साळ पिकवण्यासाठी ४ हजार लिटर पाणी लागते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दुसरीकडे बासमतीची लागवड ऐन पावसाळ्यात केली जाते. त्यामुळे हे पीक पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. परिणामी मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होते. बासमतीचं पीक घेतल्यानंतर भात्याणचा वापर जनावरांच्या चाऱ्यासाठी केला जातो.
पंजाबमध्ये सरकार बासमती तांदळाचे क्षेत्र कसं वाढवता येऊ शकतं?
काही तज्ज्ञांच्या मते, केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना बासमती तांदळाच्या लागवडीसाठी ८ ते १० हजार रुपये प्रति एकर बोनस देऊन प्रोत्साहन दिले पाहिजे. साळ सोडून इतर पिके घेणार्यांना हरियाणात बोनस दिला जातो. चांगल्या दर्जाचे बियाणे, कृषी विभागाच्या सहकार्याने तांदूळ निर्यातदार उपलब्ध करणे, कालवा/नदीतून मुबलक पाणीपुरवठा, सौर ऊर्जेची सुविधा उपलब्ध करून दिल्याने राज्यात बासमती तांदळाचं क्षेत्र वाढू शकतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
हेही वाचा- विश्लेषण: महालक्ष्मी रेसकोर्सचा वाद आहे तरी काय?
त्याचबरोबर, अधिकृत कीटकनाशकांच्या न्याय्य वापरासाठी सरकारकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे. कारण यूरोपीय संघ आणि अमेरिकेत नोंदणी नसलेल्या कीटकनाशकांची भारतात मुक्तपणे विक्री केली जाते. अशा कीटकनाशकांच्या विक्री आणि वितरणावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.