जो बायडेन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतून माघार घेताना कमला हॅरिस यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. शिकागो येथे पुढील महिन्यात होत असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या मेळाव्यात कमला हॅरिस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. मात्र कमला हॅरिस यांच्याऐवजी इतर कुणाला उमेदवारी मिळण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येण्यासारखी नाही. ते का आणि उमेदवारी मिळाल्यास कमला हॅरिस व डेमोक्रॅटिक पक्ष यांच्यासमोर कोणती आव्हाने आहेत, याविषयी…
नियुक्त की निर्वाचित?
जो बायडेन हे डेमोक्रॅटिक पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले अमेरिकेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्या पदाला आणि मताला वजन आहे. बायडेन केवळ अमेरिकेचे अध्यक्षच नाहीत. तर २०२४मधील अध्यक्षीय निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षांतर्गत झालेल्या निवडणुकाही त्यांनी या वर्षी बहुमताने जिंकल्या आहेत. त्यामुळे एक उमेदवार म्हणूनही त्यांच्या मताला किंमत आहे. पण आता त्यांनी माघार घेतल्यामुळे, एकीकडे त्यांचे मत आणि दुसरीकडे अध्यक्षीय उमेदवार ‘नियुक्त’ नसावा, तर ‘निर्वाचित’ असावा हा लोकशाही संकेत अशा कात्रीत डेमोक्रॅटिक पक्ष सापडला आहे. अध्यक्षीय निवडणुकीला म्हणजे ४ नोव्हेंबरला जेमतेम शंभरहून थोडे अधिक दिवस उरलेले आहेत. त्यामुळे प्रचाराला फार अवधी राहिलेला नाही. अशा परिस्थितीत कमला हॅरिस यांना उमेदवारी देऊन त्यांच्या प्रचारावर लक्ष केंद्रित करावे, की पक्षांतर्गत निवडणूक घेऊन वेळेचा विपर्यास आणि मतभेदांचे प्रदर्शन करावे यावरही निर्णय करावा लागेल.
हे ही वाचा… कमलाची ओळख!
डेमोक्रॅटिक मेळाव्यात काय होणार?
अमेरिकेत अध्यक्षीय उमेदवार निवडण्यासाठी रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट या दोन्ही प्रमुख पक्षांना अनेक पक्षांतर्गत निवडणुका आणि मेळावे घ्यावे लागतात. पक्षांचे राज्या-राज्यातील नोंदणीकृत मतदार, पदाधिकारी, विद्यमान नामदार (रिप्रेझेंटेटिव्ह आणि सेनेटर) त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराला मत देतात. प्रत्येक मतदारक्षेत्रात ज्या अध्यक्षीय उमेदवारास बहुमत मिळते, त्या मतदारक्षेत्राच्या प्रतिनिधीने अंतिम मेळाव्यात संबंधित उमेदवारालाच मत द्यायचे असते. यांना डेलिगेट्स असे संबोधले जाते. ज्या उमेदवाराकडे सर्वाधिक डेलिगेट मते, तो विजयी ठरतो. बायडेन यांना यापूर्वीच ४६९६ डेलिगेट्स मतांमध्ये पूर्ण बहुमत मिळालेले आहे. आता बायडेन शर्यतीतून बाहेर पडल्यामुळे, तांत्रिकदृष्ट्या मेळाव्याच्या दिवशी डेमोक्रॅटिक पक्षाच्या डेलिगेट्सवर बायडेन यांच्या उत्तराधिकारी म्हणून कमला हॅरिस यांच्या नावासमोर शिक्का मारण्याचे बंधन नाही. तसे झाल्यास वेगळाच पेच उद्भवेल आणि तातडीने उमेदवार ठरवण्यासाठी निवडणूक घ्यावी लागेल. पक्षाच्या जुन्या-जाणत्या नेत्या आणि प्रतिनिधिगृहाच्या माजी सभापती नॅन्सी पलोसी निवडणुकीच्या बाजूने आहेत. पण त्यांना डेमोक्रॅटिक पक्षात पाठिंबा मिळण्याची शक्यता फार नाही. त्यामुळे विद्यमान उपाध्यक्ष आणि बायडेन यांच्या नावाची पसंती मिळालेल्या हॅरिस यांचेच नाव अंतिम निवडणुकीसाठी जाहीर होण्याची शक्यता सर्वाधिक आहे.
कमला हॅरिस यांना पर्याय कोण?
कमला हॅरिस यांच्या नावावर मतैक्य झाले नाही आणि निवडणूक घ्यावी लागली, तर काही नावांची चर्चा बायडेन यांच्या माघारीआधीच सुरू झाली होती. केंटकीचे गव्हर्नर अँडी बेशीर, बायडेन प्रशासनातील वाहतूक मंत्री पीट बटिगीग, कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम, मिशिगनच्या गव्हर्नर ग्रेट्चेन व्हिटमर, पेनसिल्वेनियाचे गव्हर्नर जॉश शापिरो, इलिनॉयचे गव्हर्नर जे. बी. प्रिट्झकर, कोलोरॅडोचे गव्हर्नर जॅरेड पॉलिस ही नावे आघाडीवर आहेत.
हे ही वाचा… जो बायडेन यांची अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीतून माघार… पुढे काय होणार?
कमला हॅरिस यांचे गुणदोष कोणते?
कमला हॅरिस यांनी कधी काळी म्हणजे २०२०मध्ये अध्यक्षपद उमेदवारीसाठी बायडेन यांना आव्हान दिले होते. पण सुरुवातीच्या प्रायमरीजमध्ये (पक्षांतर्गत निवडणुका) फार भरीव काही करता न आल्यामुळे त्यांनी माघार घेतली. उपाध्यक्ष म्हणून सुरुवातीच्या काळात त्यांना म्हणावी तशी लोकप्रियता लाभू शकली नव्हती. मेक्सिको सीमा प्रश्न, आंतरराष्ट्रीय संबंध या आघाड्यांवर त्यांची कामगिरी निस्तेज होती. मात्र हळूहळू त्यांनी कारभारावर पकड घेण्यास सुरुवात केली आहे. गर्भपाताच्या मुद्द्यावर त्यांनी आक्रमरपणे डेमोक्रॅटिक पक्षाची बाजू मांडली. आफ्रिकी-अमेरिकी, आशियाई-अमेरिकी, हिस्पॅनिक वंशियांमध्ये त्यांना मान्यता आणि लोकप्रियता मिळू लागली आहे.
कमला हॅरिसना ट्रम्पसमोर कितपत संधी?
ट्रम्प यांचा मतदार प्राधान्याने गोरा, ग्रामीण, पारपंरिक वर्गातला मोडतो. या वर्गाच्या लांगुलचालनासाठी ट्रम्प कमला हॅरिस यांच्या गौरेतरपणाचा मुद्दा वाजवू शकतात. हॅरिस या स्त्री आहेत. अमेरिकेतील पारंपरिक मतदाराने अजूनपर्यंत तरी एकाही स्त्रीला अध्यक्षपदावर बसवलेले नाही. हिलरी क्लिंटन यांनी ट्रम्प यांच्यासमोर अध्यक्षपदाची निवडणूक लढवली. पण त्यांचे स्त्री असणे काही राज्यांमध्ये त्यांच्यासाठी गैरसोयीचे ठरले. त्या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. स्थलांतरितांच्या मुद्द्यावर कमला हॅरिस यांना लक्ष्य केले जाऊ शकते. स्वेच्छा गर्भपाताच्या मुद्द्यावर कमलांची भूमिका अतिशय आग्रही व आक्रमक आहे. त्यावरूनही पारपंरिक मतदारांच्या राज्यांमध्ये ट्रम्प त्यांच्यावर टीका करू शकतात. मात्र बायडेन यांच्याविरोधात मांडला जायचा तो वयाचा मुद्दा रिपब्लिकन पक्षाला कमला हॅरिस यांच्याबाबत मांडता येणार नाही. किंबहुना, आता तोच मुद्दा रिपब्लिकन कंपूचा कमकुवत दुवा ठरू शकतो. कारण ट्रम्प ऐशीच्या उंबरठ्यावर आहेत, तर कमला हॅरिस यांनी साठीही ओलांडलेली नाही. शिवाय त्या मूळच्या वकील असल्यामुळे, कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या ट्रम्प यांच्या दाव्यांच्या ठिकऱ्या उडवण्याची क्षमता बाळगून आहेत. डेमोक्रॅट वर्तुळात त्या आक्रमक म्हणून ओळखल्या जातात. तुलनेने बायडेन नेमस्त मानले जायचे. त्यामुळे बायडेन यांच्याविरुद्ध दाखवलेला आक्रस्ताळेपणा हॅरिस यांच्याविरुद्ध खपून जाणार नाही याची जाणीव रिपब्लिकन नेतृत्वाला होऊ लागली आहे.