भारतीय लष्कराच्या भात्यात ‘नागास्त्र एक’ हे स्वदेशी बनावटीचे आत्मघाती ड्रोन समाविष्ट झाले आहे. नव्या आयुधाने सैनिकांना जोखीम न पत्करता शत्रूचे तळ, चिलखती वाहने, दारुगोळा आगार, घुसखोरांची तुकडी वा तत्सम ठिकाणांवर हल्ला चढविण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘नागास्त्र एक’ काय आहे?

लक्ष्याभोवती घिरट्या घालत त्याचा वेध घेणारी हवाई शस्त्र प्रणाली, अशी ‘नागास्त्र एक’ची साधी, सोपी ओळख सांगता येईल. एकदा लक्ष्य सापडले की, ते त्याच्यावर धडकून विस्फोट घडवते. हल्ला चढविण्याच्या पद्धतीमुळे ते आत्मघाती, ‘कामिकाझे ड्रोन’ वा विस्फोटक ड्रोन म्हणून ओळखले जाते. अशा प्रकारातील ड्रोनचा अचूक हल्ला संवेदकांवर अवलंबून असतो. जीपीएस सक्षम असणारे नागास्त्र अचूक हल्ला चढवते. दिवस-रात्र पाळत ठेवता येईल, अशा कॅमेऱ्यांनी ते सुसज्ज आहे. फारसा आवाज न करता भ्रमंती करते. ३० किलोमीटरपर्यंतचा पल्ला गाठते. नागास्त्रचे वजन १२ किलो असून ते एक किलो स्फोटके ( वॉरहेड्स) वाहून नेऊ शकते. एका उड्डाणात ६० मिनिटांपर्यंत हवेत भ्रमंती करण्याची त्याची क्षमता आहे. हे ड्रोन विशिष्ट प्रकारच्या स्टँड (ट्रायपॉट) अथवा हातानेही मार्गक्रमित करता येते.

हेही वाचा >>>विश्लेषण: विद्यापीठांत वर्षांतून दोनदा प्रवेश देण्याचे धोरण कसे असेल?

वैशिष्ट्य काय?

आत्मघाती प्रकारातील इतर ड्रोनपेक्षा नागास्त्र एक हे वेगळे आहे. नागास्त्रची रचना हे त्याचे बलस्थान आहे. लक्ष्य न सापडल्यास नियोजित हल्ला रद्द करून ते आपल्या तळावर परतू शकते. हवाई छत्रीच्या मदतीने जमिनीवर त्याचे अवतरण करता येते. अतिशय कमी आवाजामुळे शत्रूला त्याचा माग काढणे अवघड होते. २०० मीटर उंचीवरून शत्रू त्याला ओळखू शकत नाही. टेहेळणीसाठी प्रभावी कॅमेरे, एक किलो उच्च स्फोटक वाहून नेणे, शांतपणे कार्यरत राहणे, अचूक हल्ल्याची क्षमता, पुनर्प्राप्ती, पुनर्वापर ही त्याची वैशिष्ट्ये जगातील यासारख्या ड्रोनपासून त्याचे वेगळेपण अधोरेखित करतात. ७५ टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर करून निर्मिलेले हे आत्मघाती ड्रोन आहे. त्यामुळे अशा हवाई शस्त्र प्रणालीवरील परकीय अवलंबित्व कमी होणार आहे. कारण, यापूर्वी सैन्याला परदेशातून बरीच किंमत मोजून ती खरेदी करावी लागली आहेत.

कुठे तैनात होणार?

भारतीय लष्कराने आपत्कालीन खरेदीचा अधिकार वापरून या ड्रोनची खरेदी केली आहे. त्याचा वापर चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तातडीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केला जाईल. सोलर इंडस्ट्रिजच्या इकॉनॉमिक्स एक्स्प्लोझिव्ह लिमिटेडकडे (ईईएल) ४८० नागास्त्र एकचा पुरवठा करण्यासाठी मागणी नोंदविलेली आहे. पुरवठ्याआधीची तपासणी यशस्वीपणे पार पडल्यानंतर पहिल्या टप्प्यात १२० ड्रोन लष्करास प्राप्त झाले.

हेही वाचा >>>जपानमध्ये मांस खाणार्‍या जिवाणूचा उद्रेक, ४८ तासांत माणसाचा मृत्यू; हे जीवाणू जगभरात थैमान घालणार?

ड्रोनने युद्धशैली कशी बदलतेय?

युद्धभूमीवर टेहेळणी आणि हल्ले चढविण्यात ड्रोन परिणामकारक ठरतात, हे रशिया-युक्रेन युद्धात दिसून आले. लष्करी कारवाईला ड्रोनने नवी दिशा मिळाली. भविष्यातील युद्धे मुख्यत्वे ड्रोनवर आधारित असतील. अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये त्याचा प्रभावीपणे वापर केला होता. आता तर हे आयुध दहशतवादी संघटनांच्याही हाती पडले आहे. त्याची प्रचीती मध्यंतरी सीरिया सीमेलगतच्या जॉर्डनमधील अमेरिकेच्या तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्यातून आली होती. इस्रायली सैन्याने २०२१ मध्ये गाझामधील संघर्षात ड्रोन तैनातीत एआयचा वापर केला होता. गाझामधील ज्या भागातून रॉकेट डागली जातात, ती स्थळे शोधण्याचे काम इस्त्रायली ड्रोनकडून केले जाते. सैन्यदलास ड्रोनद्वारे गुप्त माहिती मिळवणे, टेहळणी व शत्रू प्रदेशात पाहणीतून शत्रुची ठावठिकाणे शोधणे, हल्ला चढविणे, तोफखान्याच्या माऱ्याची पडताळणी करता येते. उच्च क्षमतेचे कॅमेरे, संवेदकांमुळे ड्रोनकडून प्रत्येक क्षणाची माहिती मिळते. काही ड्रोन लक्ष्याची हालचाल, भौगोलिक स्थितीचे अवलोकन करतात. लक्ष्याचा मागोवा घेतात. आधुनिक ड्रोन शत्रूवर हल्ला करण्याची क्षमता बाळगतात. ‘नागास्त्र एक’ हे यातील आत्मघाती प्रकारचे ड्रोन आहे.

स्पर्धेत भारत कुठे?

जागतिक पातळीवर ड्रोन तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत अमेरिका आणि इस्रायल हे अग्रेसर असून चीन, इराण, रशिया, तुर्की असे काही देश या क्षेत्रात पाय रोवत आहेत. सैन्यदलांच्या गरजा लक्षात घेऊन संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) मानवरहित विमानांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले. भारतीय सैन्यदल १८ वर्षांपासून ड्रोनचा वापर करीत आहे. त्याची सुरुवात परदेशी बनावटीच्या सर्चर मार्क- १, सर्चर मार्क- २ या ड्रोनपासून झाली. सीमावर्ती भागातील टेहळणीपासून सुरू झालेला हा प्रवास आत्मघाती ड्रोनच्या निर्मितीवर येऊन ठेपला आहे. पुढील दशकभरात विविध क्षमतेची शेकडो ड्रोन भारतीय सशस्त्र दलात समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.