उन्हाळ्यात थंड सरबतांसह गारेगार आइस्क्रीम, आइसकँडी, शीतपेयांची मागणी वाढते. पण आइस्क्रीममध्येही मोठ्या प्रमाणावर भेसळ करण्यात येते आणि त्यासाठी चक्क कपडे धुण्याच्या डिटर्जंटचा वापर केला जातो हे ऐकल्यावर आइस्क्रीमने गार होण्याऐवजी आपण भीतीने थंड पडू. कर्नाटक या महाराष्ट्राच्या शेजारी राज्यात अशी भेसळ प्रकरणे उघडकीस झाली आहेत.
कारवाईत काय आढळले?
कर्नाटकातील अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाने स्थानिक आइस्क्रीम, आइस कँडी आणि शीतपेय बनविणाऱ्या कंपन्यांना अस्वच्छ वातावरणात दुय्यम दर्जाचे उत्पादन केल्याबद्दल कारवाई केली आहे. २२० दुकानांपैकी ९७ दुकानांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. योग्य पद्धतीने साठवणूक केली नसल्याचा या दुकानांना जाब विचारण्यात आला आहे. यापैकी अनेक ठिकाणी आइस्क्रीमच्या क्रीमला फेस येण्यासाठी क्रीममध्ये डिटर्जंट पावडरचा वापर केल्याचे आढळून आले आहे. तर शीतपेये फेसाळ होण्यासाठी फॉस्फरिक अॅसिडचा वापर केला जात असल्याचे उघड झाले आहे. 
कोणत्या प्रकारची भेसळ होत होती?

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

अनेक ठिकाणी उत्पादक कंपन्या आइस्क्रीम बनवण्यासाठी डिटर्जंट, यूरिया किंवा स्टार्चचा वापर करून सिंथेटिक दूध तयार करून उत्पादनाची किंमत कमी करत असल्याचे आढळून आले. नैसर्गिक साखरेऐवजी सॅकरिननसारख्या घातक रसायनांचा तसेच परवानगी नसलेल्या घातक डायचा रंग आणि चवीसाठी वापर केला जात असल्याचे आढळले. अनेक उत्पादकांद्वारे आइसकँडी आणि शीतपेयांसाठी अशुद्ध पाण्याचा वापर केला जात होता. या पदार्थांना आकर्षक चव आणण्यासाठी आखून दिलेल्या मर्यादेपेक्षा खूप जास्त प्रमाणात रसायनांचा वापर होत होता.

डिटर्जंट पावडरचे दुष्परिणाम कोणते?

डिटर्जंट पावडर खाण्यासाठी नाही. ती कोणत्याही प्रकारे शरीरात गेल्यास दुष्परिणाम होऊ शकतात. मळमळ, उलट्या आणि जुलाब होऊ शकतात. डिटर्जंटमधील आम्ल आणि अल्कलीयुक्त घटकांमुळे घसा, अन्ननलिका आणि पोटात जळजळ होऊ शकते. डिटर्जंटच्या वासाने घशातील खवखव, श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. ही उत्पादने दीर्घकाळपर्यंत पोटात जात राहिली तर मूत्रपिंड आणि यकृताला नुकसान पोहोचवू शकतात. काही डिटर्जंटमध्ये असलेले विषारी घटक मूत्रपिंड, यकृत आणि मज्जासंस्थेला गंभीर इज पोहोचवू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे डिटर्जंटमधील विषारी घटक रक्तात मिसळले तर चयापयच क्रियेवर परिणाम होऊन रक्तातही हे आम्ल मिसळू शकते. परिणामी लहान मुलांमध्ये रक्तातील पांढऱ्या पेशी वाढणे, लॅक्टिक असिडचे प्रमाण वाढणे अशी लक्षणे दिसून येतात. फुप्फुसदाह होणे, श्वसनसंस्थेचे कार्य बिघडणे अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची नोंद घेतली गेली असल्याचे काही ऑनलाइन रिपोर्ट उपलब्ध आहेत. 

डिटर्जंटमधील काही विषारी घटकांमुळे मज्जासंस्थेवर परिणाम होऊन चक्कर येणे, डोकेदुखी, ब्रेन फॉगसारखी लक्षणेही आढळू शकतात. डिटर्जंटमध्ये सोडियम लॉरिल सल्फेट आणि फॉस्फेटसारखी घातक रसायने असतात.

फॉस्फरिक आम्लाचे कोणते दुष्परिणाम?

फॉस्फरिक आम्ल हे एक रंगहीन, गंधहीन आणि आम्लयुक्त रसायन आहे. ते अन्न, उद्योग आणि स्वच्छता करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उत्पादनांमध्ये वापरले जाते. कोलासारख्या शीतपेयांमध्येही ते असते. खते, धुण्याचे साबण, पावडर, डाग घालवणारी उत्पादने यात हे वापरले जाते. फॉस्फरिक आम्लयुक्त पेये सातत्याने घेतल्यास मूत्रपिंडाशी संबंधित आजार आणि मुतखड्यासारख्या आजारांना निमंत्रण मिळते. ज्यांना आधीच मूत्रपिंडाशी संबंधित विकार आहेत, त्यांच्यासाठी तर हे अधिक घातक आहे. हाडांचे विकार, दात किडणे यासारखे विकारही होऊ शकतात. कारण फॉस्फरिक अॅसिडमुळे दातांचे आवरण कमकुवत होते. फॉस्फरसचे प्रमाण वाढले तर मूत्रपिंडात कॅल्शिअम फॉस्फेटचे प्रमाण वाढून त्याचे खडे होतात. फॉस्फरसच्या अति प्रमाणामुळे शरीरातील मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअमचे प्रमाण कमी होते आणि याचा एकूणात शरीराच्या स्नायूंवर परिणाम होऊन शरीर कमजोर होते. फॉस्फरिक आम्लाच्या अव्याहत वापराने शरीरातील हाडे ठिसूळ होतात. 

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Detergent in ice cream what else was found in the fda operation in karnataka print exp ssb