History of Bugti Marathas in Balochistan: पानिपतच्या तिसऱ्या लढाईला २६४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘मराठा शौर्य दिन’ साजरा करण्यात आला. पानिपतच्या रणांगणावर धारातीर्थी पडलेल्या असंख्य ज्ञात-अज्ञात मावळ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मराठा शौर्य स्मारक उभारण्याचा मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. तशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे पानिपत नंतर मागे राहिलेल्या आणि आज हरियाणाचे रहिवासी असलेल्या रोड मराठ्यांविषयी चर्चा सुरु आहे. याच इतिहासाचे आणखी एक महत्त्वाचे अंग म्हणजे बलुची मराठे. त्यांच्याच इतिहासाचा घेतलेला हा आढावा.
बुग्ती मराठे
१७६१ साली झालेल्या तिसऱ्या पानिपत युद्धानंतर मराठा सैनिकांना कैद करून बलुचिस्तानमध्ये नेण्यात आले. तिथे त्यांनी परिस्थितीशी हार न मानता जुळवून घेतले आणि आपली मराठी संस्कृती पिढ्यान्‌पिढ्या जपली. सण-उत्सवांपासून ते दैनंदिन जीवनशैलीपर्यंत बुग्ती मराठ्यांची संघर्षगाथा जिद्दीची परिसीमा दर्शवणारी आहे. कराचीतला मराठी भाषक समुदाय आजमहत्त्वाचा असला तरी महाराष्ट्रातून पाकिस्तानात पाय रोवणारा हा पहिलाच समूह नव्हता. त्याही आधी आले ते बलुची मराठे. त्यांचे अस्तित्त्व हे स्थलांतर, कैद आणि जिद्दीचा एक विलक्षण इतिहास उलगडते. हे मराठे स्थानिक बुग्ती जमातीत विलीन झाले. त्यामुळेच त्यांना बुग्ती मराठे म्हटले जाते. २०२३ साली प्रकाश पवार दिग्दर्शित ‘बलुच’ हा मराठी चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाने इतिहासात लुप्त झालेल्या एका पर्वाला प्रकाशात आणले. हा चित्रपट १७६१ मध्ये तिसऱ्या पानिपत युद्धानंतर बलुचिस्तानमध्ये नेण्यात आलेल्या मराठा कैद्यांच्या संघर्षावर आधारित आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

मराठे, अहमद शहा अब्दाली आणि सत्तेसाठीचा संघर्ष

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर आणि मुघल साम्राज्याच्या ऱ्हासानंतर मराठा साम्राज्य उत्तरेकडे झपाट्याने विस्तारत गेले. यामुळे अहमद शहा अब्दाली (अहमद शहा दुर्रानी) याच्या अफगाण साम्राज्याला धोका निर्माण झाला होता. त्यामुळेच अहमद शहा अब्दाली भारतावर चाल करून आला. याला उत्तर म्हणून मराठ्यांनी सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वाखाली एक मोठे सैन्य उभारले आणि त्यांनी दिल्ली पुन्हा ताब्यात घेतली. मराठ्यांच्या याच रणनीतीला प्रत्युत्तर देण्यासाठी अहमद शहाने मराठा सैन्याला पंजाबमध्ये अडकवण्याचा डाव आखला आणि त्यांची रसद तोडली. त्याचाच परिणाम म्हणजे १७६१ साली पानिपत येथे निर्णायक लढाई झाली.

मराठ्यांचा पराभव

इतिहासकार सतीश चंद्र आपल्या ‘मेडीव्हल इंडिया’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात लिहितात की, “भाऊंना अब्दालीवर विजय मिळवणे शक्य झाले नसते, कारण त्यांच्यावर जड तोफखाने आणि स्त्रिया यांच्या जबाबदाऱ्यांचा ताण होता.” ते असेही सांगतात की, मराठा सैनिक प्रामुख्याने भाले आणि तलवारी वापरत होते, तर अफगाण सैन्याकडे जलद भरता येणाऱ्या फ्लिंटलॉक बंदुकांसह कुशल नेमबाज होते. त्यांच्याकडे प्रशिक्षित, जलद धावणारे घोडे होते. ही तांत्रिक आणि रणनीतितील श्रेष्ठता तसेच मराठा गटातील अंतर्गत मतभेद, यामुळे त्यांची शक्ती कमकुवत झाली. यामुळेच संख्येने कमी परंतु एकसंध असलेल्या अहमद शहाच्या सैन्याने मराठ्यांचा निर्णायक पराभव केला.

इंग्रज ठरले लाभार्थी

१७६१ च्या १४ जानेवारीला झालेल्या तिसऱ्या पानिपतच्या लढाईने मराठा सैन्याचा पूर्णपणे संहार केला. मुघलांनंतर सत्ता मिळवण्याच्या त्यांच्या आकांक्षेला शह दिला. शिवाय यामुळे वायव्य भारतात अनेक दशकं अस्थिरता निर्माण झाली. सतीश चंद्र पुढे नमूद करतात की, “शेवटी लाभार्थी हे इंग्रज ठरले. मराठा किंवा मुघल नाही. या लढाईनंतर त्यांना आपले पाय भारतात घट्ट रोवता आले”

प्राचीन समुदायांच्या कथा

पानिपतच्या पराभवानंतर जे वाचले त्यांनी हरियाणाच्या जंगलात आश्रय घेतला. आज त्यांचेच वंशज हे रोड मराठे म्हणून ओळखले जातात. सुमारे सात ते दहा लाखांची लोकसंख्या असलेला हा समुदाय सध्या करनाल, रोहतक आणि भिवानी जिल्ह्यांमध्ये विखुरलेला आहे. ‘ट्रॅव्हल्स विथ नंदीघोष’ या पुस्तकाचे सहलेखक आणि इतिहासप्रेमी यशवंत मराठे आपल्या ब्लॉगमध्ये लिहितात की, उर्वरित २२,००० पुरुष, स्त्रिया आणि लहान मुलांसाठी नशिब आणखीनच क्रूर ठरले. कैद करण्यात आलेल्या या लोकांना अहमद शहाच्या सैन्याबरोबर अफगाणिस्तानकडे घेऊन जाण्यात आले. सैन्य पंजाबमधून जात असताना शीख योद्ध्यांनी अनेक स्त्रिया आणि मुलांना वाचवले. मराठे नमूद करतात की, बलुचिस्तानच्या डेरा बुग्ती भागात पोहोचलेल्यांचे भवितव्य फारच भयावह होते. ‘बलुच’ या चित्रपटाच्या सुरुवातीच्या थरारक दृश्यात या कैद्यांची भीती स्पष्टपणे दर्शवण्यात आली आहे. अहमद शहाने आपल्या बलुच सहकाऱ्यांच्या मदतीच्या बदल्यात मराठा कैद्यांना बलुच शासक मीर नासिर खान नूरी याला भेट दिले. मात्र हे उदारतेचे लक्षण नसून थकलेल्या कैद्यांपासून सुटका मिळवण्याचा तो राजनैतिक डावपेच होता. यानंतर हे मराठा कैदी बुग्ती, मारी आणि गुर्चानी यांसारख्या जमातींमध्ये विभागले गेले. ते तिथेच स्थायिक झाले आणि बलुचिस्तानच्या सामाजिक रचनेत मिसळून गेले. “हे मराठे संपूर्ण पाकिस्तानमध्ये आढळत नाहीत. ते मुख्यतः बलुचिस्तानमध्ये आढळतात. संपूर्ण समूह एकत्र ठेवणे ही धोक्याची बाब होती. म्हणूनच नासिर खानने त्यांना विभागण्याची नीति अवलंबली,” असे अभियंता आणि इतिहासप्रेमी सुधीर दांडेकर यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.

इस्लामनंतरची स्वीकृती

indianexpress.com ला दिलेल्या एका मुलाखतीत Third Battle of Panipat या पुस्तकाचे लेखक आभास वर्मा म्हणतात, “ इस्लामिक अमलाखाली जात तयार होऊ शकते याचे बलुचिस्तानमधील मराठा बुग्ती हे एक महत्त्वाचे उदाहरण आहे. “या युद्धातील कैद्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश होता. त्यांना गुलाम म्हणून विकण्यात आले आणि बंदिवान म्हणून ठेवण्यात आले. या समूहाला जमिनीचा मालकी हक्क मिळण्यास मनाई होती याशिवाय त्यांना जबरदस्तीने इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले,” असे ते सांगतात. मात्र, वर्मा हेही स्पष्ट करतात की, हा इतिहास फारसा नोंदवलेला नाही. कारण या विषयावर फारसे संशोधन झालेले नाही. त्यावेळी या समूहाची परत मायदेशी परतण्याची इच्छा असली तरी ते शत्रूच्या राज्यात होते आणि परतीचा प्रवास खूप लांबचा, अनिश्चित होता. त्यामुळे परत जाण्याचा विचार करणेही अशक्य होते. वर्मांच्या पुस्तकात नरहरी रणळेकर नावाच्या एका ब्राह्मणाची कथा आहे. नरहरी रणळेकर कैदेतून सुटून परत आपल्या मूळगावी पैठण येथे परतला. त्याला बळजबरीने इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले गेल्यामुळे त्याने ब्रह्मसभेकडून पुन्हा स्वधर्मात परतण्याची स्वीकृती मागितली. बऱ्याच विचारविनिमयानंतर ब्रह्मसभेने त्याला पुन्हा स्वीकारले.

पगाराऐवजी गुलाम

ब्रिटिश लेखक आणि पत्रकार Anatol Lieven आपल्या पाकिस्तान: अ हार्ड कंट्री (Pakistan: A Hard Country) या पुस्तकात क्वेटामधील नवाबजादा जमील बुग्ती यांच्याशी झालेल्या भेटीचा उल्लेख करतात. बुग्तींबरोबर असलेल्या “लहान, सडपातळ, काळ्या रंगाचे” नोकर पाहून लिव्हन थक्क झाले होते. विचारल्यावर त्यांनी सांगितले की, हे मध्य भारतातून युद्धात पकडण्यात आलेल्या मराठ्यांचे वंशज आहेत. मुघलांनी त्यांना युद्धात पकडले आणि त्यांच्या बुग्ती सैनिकांना पगाराऐवजी याना गुलाम म्हणून दिले होते.”

सांस्कृतिक ओळख जपली

बलुचिस्तानमधील कोरड्या आणि कठीण परिस्थितीत जबरदस्तीने इस्लाम स्वीकारावा लागूनही मराठ्यांनी अपार सहनशीलता दाखवली आणि दोनशेहून अधिक वर्षे आपली सांस्कृतिक ओळख जपली. त्यांच्या परंपरांमध्ये, आडनावांमध्ये आणि धार्मिक विधींमध्ये अजूनही त्यांच्या वारशाची छाप स्पष्टपणे दिसते. उदाहरणार्थ, बुग्ती मराठे आजही लग्नसमारंभात हळदीचा कार्यक्रम, सप्तपदी विधी आणि मराठी परंपरेप्रमाणे तांदळाचे मापटे ओलांडून नवविवाहितांना घरात प्रवेश देण्याचा विधी पाळतात. तर मातेला आई म्हणण्याची मराठी परंपरा आजही कायम आहे. दांडेकर सांगतात की, बलुचिस्तानमधील मराठा समुदायात कान टोचण्याची प्रथा आजही सर्वसामान्य आहे. “माझ्या आठवणीत अजून एक गोष्ट आहे. २० व्या शतकाच्या मध्यावर क्वेटा (बलुचिस्तानची राजधानी) येथील चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट रामशास्त्री खूप लोकप्रिय झाला होता. बलुचिस्तानमधील मराठ्यांना त्यांच्या मूळ ओळखीचा अभिमान किती आहे, हे त्यातूनच दिसून आले होते.”

भारतातील मराठ्यांना पाठिंबा

बलुचिस्तानमधील सर्वात मोठी मराठा संघटना मराठा कौमी इतिहाद २०१७ मध्ये चर्चेत आली. त्यांनी भारतातील मराठा आंदोलनात एकात्मता दर्शवत पाठिंबा दिला होता. त्यांच्या प्रमुख वडेऱ्या दिन मुहम्मद मराठा बुग्ती यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती, “आम्ही भारतातील आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देतो. समुदायावर होणाऱ्या कोणत्याही अन्यायाचा आम्ही निषेध करतो आणि आम्हाला वाटते की सरकारी नोकऱ्या व शिक्षणासाठी आरक्षण असायला हवे. पाकिस्तानमध्ये आमचे हक्क मान्य झाले आहेत, तर भारतात तसे का होऊ नाही शकत?”

बलुचिस्तानमधील शेतीत योगदान

पिढ्यान्‌पिढ्या हे मराठे संघर्षमय आणि स्थलांतरित जीवन जगले. मात्र, कालांतराने त्यांनी परिस्थितीवर मात करून प्रगती साधली. आज अनेकजण समाजात प्रतिष्ठेच्या स्थानांवर पोहोचले आहेत. बलुचिस्तानमधील शेतीतील त्यांच्या योगदानामुळे त्यांच्या सहनशक्तीचे व कष्टाचे प्रतिबिंब दिसून येते. दांडेकर सांगतात, “या मराठा वंशजांच्या ज्ञान आणि मेहनतीमुळेच बलुच भागात शेती बहरू लागली.”

वास्तव

मुख्यतः मराठ्यांचे पाकिस्तानमध्ये दोनदा स्थलांतर झाले. पहिले म्हणजे पानिपतच्या युद्धानंतर आणि दुसरे व्यापाराच्या निमित्ताने. कोकण, मुंबई प्रांतातील व्यापाऱ्यांनी कराचीमध्ये व्यापाराच्या निमित्ताने स्थलांतर केले होते. कामगारांचेही स्थलांतर पाकिस्तानात झाले. मात्र यातील बहुतांश स्थलांतर हे ऐच्छिक होते. बलुचिस्तानात जबरदस्तीने नेण्यात आलेल्या कैद्यांप्रमाणे नव्हते. या सर्व अडचणींनंतरही मराठ्यांची जिद्द कायम राहिली आणि आज मराठा कौमी इतिहाद ही संघटना अभिमानाने हा वारसा पुढे नेत आहे. आज मराठा बुग्ती समाजात मिसळले असून आता कुणालाही त्यांच्यातला फरक कळणार नाही, तरीही हा समूह आजही आपल्या मुळाशी प्रामाणिक आहे आणि आपल्या इतिहास जागृत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis announces maratha shaurya memorial the untold story of war captives from panipat in baluchistan svs