राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना ‘बेल्स पाल्सी’ या विकाराचे निदान झाले. बेल्स पाल्सी हा एक प्रकारे पक्षाघाताचा प्रकार असून त्यामुळे चेहऱ्याचा काही भाग बाधित होतो. या विकारामुळे चेहऱ्याच्या स्नायूंची हालचाल नियंत्रित होऊन बोलण्यास त्रास होतो. शास्त्रीय नाव ‘आनन चेताघात’ असेही आहे. हा विकार नेमका काय आहे? त्याची कारणे व लक्षणे कोणती? कोणत्या उपाययोजना आवश्यक आहे, याविषयी…बेल्स पाल्सी म्हणजे काय? बेल्स पाल्सी या विकारात चेहऱ्याच्या अर्धा भागाचे स्नायू कमकुवत होतात. चेहऱ्याच्या अर्ध्या भागातल्या स्नायूंची शक्ती काही काळासाठी नष्ट होऊन त्यांचे आकुंचन-प्रसरण थांबते आणि ते लुळे पडतात. क्वचितप्रसंगी चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंचे स्नायूही या विकारात बाधित होतात. चेहऱ्याच्या मज्जातंतूला हानी झाल्यामुळे हा विकार होतो. मेंदूमधून एकूण १२ विशेष मज्जातंतू निघतात. त्यांना क्रेनिअर नव्र्हस म्हणतात. यातील सातव्या क्रमांकाच्या मज्जातंतूंना फेशियल नव्र्ह म्हणतात. मेंदूपासून डोक्याच्या कवटीबाहेर आल्यावर या फेशियल नव्र्हला पाच शाखा फुटतात. त्या कपाळ, भुवया, पापण्या, ऊर्ध्व व अधो ओठ, गाल, कानाच्या पुढील भाग, मानेचा एका बाजूचा भाग यांवरील स्नायूंची हालचाल नियंत्रित करतात. चेहऱ्यासाठी हा मज्जातंतू महत्त्वाचा आहे. मात्र या मज्जातंतूला इजा झाल्याने स्नायूंच्या हालचाली बंद होतात आणि त्यामुळे बेल्स पाल्सी हा विकार होतो. बेल्स पाल्सी झालेल्या रुग्णाच्या चेहऱ्याच्या एका बाजूला किंवा काही वेळा दोन्ही बाजूंना धूसर दिसू लागते. ही स्थिती सहसा गंभीर नसते आणि काही महिन्यांत उपचाराशिवाय निघून जाते. स्कॉटलंडमधील ख्यातनाम वैद्यकीय तज्ज्ञ सर चार्ल्स बेल यांनी १८२१ मध्ये या विकारावर संशोधन केले, त्यामुळे या विकाराला बेल्स पाल्सी असे म्हणतात.
बेल्स पाल्सी किती गंभीर?
बेल्स पाल्सी हा विकार कोणत्याही वयात कोणालाही होऊ शकतो. मात्र १५ ते ६० वयोगटातील लोकांवर त्याचा सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता असते. हा विकार गंभीर नाही. बहुतेकदा हा विकार काळानुसार आपोआप बरा होतो. मात्र बेल्स पाल्सीची लक्षणे पक्षाघातासारखी गंभीर वैद्यकीय स्थितींसारखीच असतात. म्हणूनच चेहऱ्यावर स्नायू कमकुवत झाल्याचे लक्षात येताच वैद्यकीय तज्ज्ञांकडे जाणे आवश्यक आहे. बेल्स पाल्सी तुलनेने सामान्य आहे. दरवर्षी एक लाखांपैकी १५ ते ३० जणंना हा विकार होतो. सुमारे ६० पैकी एकाला त्याच्या आयुष्यात कधीतरी हा विकार होतो.
या विकाराची लक्षणे काय?
चेहऱ्याच्या एका बाजूला अशक्तपणा, बोलण्यात अडचण, चेहऱ्याच्या एका बाजूच्या स्नायू बधीर झाल्यासारखे वाटणे, एका किंवा अधिक इंद्रियांचे (दृष्टी, श्रवण, गंध, चव आणि स्पर्श) आंशिक किंवा अधिक नुकसान, अस्पष्ट किंवा दुहेरी दृष्टी (डिप्लोपिया), गतिविभ्रम (ॲटॅक्सिया), चक्कर येणे, मळमळ व उलट्या, मान कडक होऊन तिची हालचाल मंदावणे, भावनिक अस्थिरता आणि व्यक्तिमत्त्व बदल, समृतीभ्रंश, अचानक डोकेदुखी ही बेल्स पाल्सीची काही लक्षणे आहेत. या विकारात कपाळ, भुवया, डोळा व पापणी, तोंडाचा कोपरा यांना बधीरपणा येऊन त्यांची हालचाल मंदवते. बेल्स पाल्सीची लक्षणे अचानक दिसून येतात आणि ४८ ते ७२ तासांच्या आत तीव्रतेवर पाेहचतात. काही रुग्णांमध्ये चेहऱ्याच्या स्नायूंचा सौम्य कमकुवतपणा दिसून येतो तर काहींना त्यांच्या चेहऱ्यावर संपूर्ण स्नायू अर्धांगवायूचा अनुभव येतो. हा विकार सामान्य असला तरी वेळेत उपचार न घेतल्यास तो गंभीर होऊ शकतो. त्यामुळे लक्षणे दिसल्यास तात्काळ उपचार घेणे आवश्यक आहे.
हा विकार होण्यामागची कारणे काय?
बेल्स पाल्सीचे नेमके कारण अस्पष्ट आहे. या विकाराच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये कानामागील बाजूस थोडा ताप आणि वेदना यांचा समावेश असू शकतो. तथापि बेलचा पक्षाघात एकदा सुरू झाल्यानंतर विकसित होण्यापासून रोखण्यासाठी आपण काहीही करू शकत नाही. सातव्या क्रॅनियल नर्व्हच्या वेदना आणि कम्प्रेशन हे बेल्स पाल्सीचे मुख्य कारण आहे. सातव्या क्रॅनियल नर्व्हमध्ये मज्जातंतूचे सिग्नल असतात, जे तुमच्या चेहऱ्याच्या हालचाली आणि हावभाव नियंत्रित करतात. हे स्वाद आणि तुमच्या डोळ्यांत अश्रू निर्माण करण्यामध्ये गुंतलेले तंत्रिका सिग्नलदेखील नियंत्रित करतात. सातव्या क्रॅनियल नर्व्हचे नुकसान झाल्यास चेहऱ्याचे स्नायूंच्या हालचालींमध्ये बाधा येते. शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की काही विषाणूजन्य संसर्गामुळे सातव्या क्रॅनियल नर्व्हला बाधा येऊ शकते. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असणे, ताणतणाव, झोप कमी असणे, शारीरिक आघात यांमुळेही बेल्स पाल्सी होऊ शकतो. मधुमेह, गर्भधारणा, प्रीक्लॅम्पसिया, अतिलठ्ठपणा, उच्च रक्तदाब हे बेल्स पाल्सीचे जोखीम घटक आहेत. एकदा बेल्स पाल्सी झाल्यानंतर पुन्हा हा विकार होऊ शकतो.
निदान आणि चाचण्या….
वैद्यकीय तज्ज्ञ लक्षणांवर आधारित बेल्स पाल्सीचे निदान करू शकतात. रुग्णाची लक्षणे कधी सुरू झाली आणि ती बदलली का याबद्दल ते रुग्णाशी चर्चा करतात. बेल्स पाल्सीची मुख्य शारीरिक तपासणी म्हणजे रुग्णाच्या कपाळाची आंशिक किंवा संपूर्ण कमकुवतपणा याची तपासणी. स्ट्रोक, सारकोइडोसिस, लाइम डिसीज, कानांमध्ये जिवाणू संक्रमण, मल्टिपल स्क्लेरोसिस आणि चेहऱ्याच्या मज्जातंतूजवळील ट्यूमर यांसह इतर कारणांमुळेही पक्षाघात होऊ शकतो, जो बेल्स पाल्सीसारखा असतो. वैद्यकीय तज्ज्ञ लक्षणांच्या इतिहासाच्या आधारे आणि केवळ तपासणीवर आधारित बेल्स पाल्सीचे अचूक निदान करू शकतात. त्यासाठी रक्त चाचण्या आणि इतर वैद्यकीय तपासणीही केली जाते.
बेलच्या पाल्सीवर उपचार कसे केले जातात?
बेल्स पाल्सी हा विकार बहुतेक वेळा उपचारांशिवाय बरा होतो. मात्र तरीही वैद्यकीय तज्ज्ञ लक्षणांपासून आराम मिळवण्यासाठी आणि जलद बरा होण्यासाठी काही उपचारांची शिफारत करतात. काही औषधोपचार करावे लागतात, तर काही वेळा भौतिक चिकित्सा केली जाते. काही प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया किंवा प्लास्टिक सर्जरी केली जाते.
sandeep.nalawade@expressindia.com