पूर्व विदर्भात मोठा भक्तसमूह असलेले बाबा जुमदेव आणि त्यांच्या सेवकांबद्दल अलीकडेच बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर महाराज यांनी आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे बाबा जुमदेव यांच्या अनुयायांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बागेश्वर बाबांनी केलेल्या विधानाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता असल्याने राजकीय पक्षांनीही सावध भूमिका घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाबा जुमदेव कोण आहेत?

जुमदेवजी ठुब्रिकर ऊर्फ बाबा जुमदेवजी यांचा जन्म ३ एप्रिल १९२१ रोजी नागपूरमधील एका गरीब कुटुंबात झाला. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे बाबा जुमदेवजी यांना इयत्ता चौथीच्या पुढे शिक्षण घेता आले नाही. १९३८ मध्ये वयाच्या सतराव्या वर्षी बाबा जुमदेव यांचा विवाह झाला. काही कारणांमुळे त्यांनी आपला वडिलोपार्जित विणकामाचा व्यवसाय सोडला. पुढे त्यांनी नागपूर महापालिकेत कंत्राटदार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. या व्यवसायातील गैरप्रकार लक्षात आल्यावर त्यांनी या व्यवसायाचाच त्याग केला. दरम्यान, बाबांच्या मुलाला व्हर्जिनिया मेडिकल सेंटर, व्हर्जिनिया (अमेरिका) येथे नोकरी लागली. त्यानंतर बाबांनी व्यवसाय सोडून दिला.

हेही वाचा – एल्गार परिषद: शोमा सेन यांना सहा वर्षांनंतर जामीन, हे प्रकरण आहे काय आणि त्यातील अन्य १६ आरोपींची सद्यस्थिती काय?

बाबा जुमदेव यांचे अनुयायी किती?

१९७६ नंतर बाबांनी समाजसेवेकडे लक्ष पुरवले. ते गुरुपूजा घेत नव्हते. अनुयायांना पाया पडू देत नव्हते. गरीब, कष्टकऱ्यांसाठी आपले सर्व लक्ष सामाजिक कार्याकडे वळवून अनुयायांसाठी सहकारी तत्त्वावर ‘परमात्मा एक सेवक’ नागरिक सहकारी बँक, बहुउद्देशीय ग्राहक भांडार, दूध डेअरी, मानव मंदिर आदींची स्वकष्टाने निर्मिती केली. बाबा जुमदेव यांचा कल समाजसुधारणेकडे होता. व्यसनाच्या आहारी गेलेल्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी बाबांनी ‘परमात्मा एक मानव धर्मा’ची स्थापना केली. मानव धर्म स्वीकारणाऱ्या कित्येक लोकांना त्यांनी व्यसनमुक्त केले. अंधश्रद्धेवरही त्यांनी प्रहार केला. बाबांनी चार तत्त्वे, तीन शब्द आणि पाच नियम सांगितले. यानुसार चार तत्त्वांमध्ये- परमात्मा एक, देवाच्या नावावर जन्म, मृत्यू, दुःख मिटवा, इच्छेनुसार भोजन करा. तीन शब्द- खरे बोला, मर्यादांचे पालन करा, प्रेमाने व्यवहार करा. पाच नियम- भक्ती आणि समर्पण, कुटुंब आणि अनुयायांत प्रेम, व्यसन बंद करा, कुटुंब, अनुयायांत एकता, कुटुंबाला मर्यादित ठेवा असे होते. बाबांनी दिलेले उपदेश आणि संदेश याचे पालन करून जीवनात बदल घडवून आणणारे पूर्व विदर्भात त्यांचे लाखो अनुयायी आहेत. भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमांना लागून असलेल्या मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये बाबांच्या अनुयायांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत.

बागेश्वर बाबांचे आक्षेपार्ह वक्तव्य काय?

नेहमी वादग्रस्त विधान करून प्रसिद्धी झोतात राहणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या भागवत कथा सप्ताहाचे आयोजन भंडारा जिल्ह्यातील मोहाडीत करण्यात आले आहे. या दरम्यान त्यांनी बाबा जुमदेव व त्यांच्या सेवकांच्या विरोधात हनुमानजींच्या पूजेवरून भावना दुखावणारे वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले “नागपूर आणि भंडारा या क्षेत्रामध्ये एका विशेष संप्रदायाला मानणारा वर्ग आहे. ते हनुमानजींना तर मानतात. मात्र, हनुमानजींची पूजा करणे मानत नाही. श्राद्ध करायचे नाही, माता-पित्यांचे फोटो ठेवायचे नाहीत, राम राम म्हणायचे नाही. ज्या हनुमानाने संपूर्ण जीवनभर रामनामाचा जप केला, त्यांचे उपासक रामराम नाही बोलणार. हद्द झाली. असे करणाऱ्या लोकांनी कान उघडून ऐकावे की, तुमचे पूर्वज नरकात गेले आहेत, तुमची येणारी पिढी पण नरकात जाईल. अशी भक्ती हनुमानजींना कधीच प्रिय नाही”, बागेश्वर बाबांच्या वरील वक्तव्यामुळे जुमदेव यांच्या अनुयायांत संतापाची भावना निर्माण झाली.

हेही वाचा – विश्लेषण : लगेचच आयटीआर दाखल करण्यासाठी घाई का करू नये?

बाबा जुमदेवांच्या समर्थकांची प्रतिक्रिया काय?

बागेश्वर बाबांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भात लाखोंच्या संख्येत असलेल्या बाबा जुमदेव यांना मानणाऱ्या परमात्मा एक सेवकांनी रोष व्यक्त केला. या भावना इतक्या संतप्त स्वरूपाच्या होत्या की अनुयायांनी पोलीस ठाणे गाठून तेथे बाबा बागेश्वरच्या अटकेची मागणी लावून धरली. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी पोलीस ठाणे, नागपूरमधील कळमना पोलीस ठाण्यात सेवकांनी रीतसर तक्रार नोंदवली. बाबा बागेश्वरांना तत्काळ अटक करा, असा आग्रह धरला. बागेश्वर महाराजांच्या वादग्रस्त विधानानंतर मोहाडीमध्ये ठिकठिकाणी बागेश्वर महाराजांचे फलक फाडण्यात आले. यात आता राजकीय नेत्यांनी उडी घेतली असून शिवसेना समर्थित अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी बागेश्वर महाराजांवर गुन्हे दाखल करून अटक करावी, अशी मागणी केली आहे.

राजकीय परिणामाची शक्यता आहे का?

बागेश्वर महाराज यांचे आतापर्यंतचे बहुतांश कार्यक्रम हे भाजप नेत्यांच्या पुढाकाराने झाले आहेत. काही महिन्यांआधी नागपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बागेश्वर महाराजांचे दर्शनही घेतले होते. बागेश्वर बाबांकडून कायमच वादग्रस्त वक्तव्ये केली जातात. याआधी त्यांनी साईबाबा, तुकाराम महाराज यांच्याबद्दलही वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर आता बाबा जुमदेव व त्यांच्या अनुयायांबद्दल आक्षेपार्ह विधान केले. बाबा जुमदेव यांना मानणारा मोठा वर्ग पूर्व विदर्भात आहे. त्यामुळे बागेश्वर महाराजांच्या विधानाचा फटका भाजपच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhirendra shastri alias bageshwar maharaj of bageshwar dham recently made offensive statements about baba jumdev and his servants print exp ssb