भारताला दोन विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची सात क्रमांकाची जर्सी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळ कोणताही असो, जर्सीमुळे त्या-त्या संघाला वेगळी ओळख मिळालेली असते. ती जर्सी घालून खेळणारे खेळाडू स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतातच, शिवाय संघाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचा त्यांचा मानस असतो. यात यशस्वी ठरणारे खेळाडू त्या खेळाच्या इतिहासात स्वतःचे अढळ स्थान निर्माण करतात, शिवाय त्यांच्या जर्सीच्या मागे असलेला क्रमांकही अजरामर होतो. भारतीय क्रिकेटमध्ये सात क्रमांक म्हटला की कोणत्याही चाहत्याला धोनीचीच आठवण होते. त्यामुळेच बीसीसीआयने त्याचा गौरव केला आहे. मात्र, एखाद्या खेळाडूची जर्सी निवृत्त केली जाते म्हणजे नक्की काय होते आणि यापूर्वी याची काही उदाहरणे आहेत का याचा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खेळाडूंच्या जर्सीवर क्रमांक टाकण्यास कधी सुरुवात झाली?

याचे स्पष्ट उत्तर नसले तरी, १९११ मध्ये सिडनी येथे झालेल्या एका फुटबॉल सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने आपल्या जर्सीवर क्रमांक टाकले होते हा एक जुना संदर्भ सापडतो. त्यानंतर जवळपास आठ दशकांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनीच १९९५ मध्ये सर्व प्रथम आपल्या जर्सीवर क्रमांक नोंदवण्यास सुरुवात केली. खेळाडूंच्या जर्सी क्रमांकाची पद्धत ही हळूहळू खेळ आणि खेळाडू लोकप्रिय होऊ लागल्यावर वाढू लागली. यामुळे मैदानाबाहेर बसलेल्या चाहत्याला किंवा समालोचन करणाऱ्यास त्या क्रमांकावरून खेळाडू ओळखणे हे सोपे होऊ लागले. मैदानाबाहेरून सामन्यावर काम करणाऱ्या प्रत्येकाकडे सामन्यापूर्वी खेळाडूच्या जर्सी क्रमांकासह खेळाडूंची नावे दिली जातात. त्यानुसार स्कोअरर किंवा सामन्याच्या इतर नोंदी ठेवणारे खेळाडूच्या नावावर समोर लगेच नोंद ठेवू शकतात. फुटबॉलमध्ये ही पद्धत सुरुवातीला आली. त्यानंतर अनेक खेळांनी त्याचे अनुकरण केले. क्रिकेटमध्ये फार उशिराने क्रमांकाची पद्धत सुरू झाली.

क्रिकेटमध्ये जर्सीवर क्रमांक घालण्यासाठी नियम काय आहेत?

क्रिकेटपटूंनी कोणता क्रमांक घ्यावा याला बंधन नाही. क्रिकेटवर नियंत्रण असणारी शिखर संघटना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) कुठल्याही खेळाडूंचा क्रमांक निश्चित करत नाही. फक्त त्याच्या वापराबद्दल आयसीसीने नियम केले आहेत. त्यानुसार क्रमांक वापरण्यासाठी आयसीसीने पाठीचा भाग निश्चित केला आणि त्यासाठी १२.९ सेमी इतकी उंची अंतिम करण्यात आली. त्याचबरोबर प्रत्येक क्रमांकावर राष्ट्रीय किंवा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा लोगो वापरणे बंधनकारक आहे. हा लोगो पांढरा असावा असाही नियम करण्यात आला आहे. खेळाडूंना अमुक एक क्रमांक द्यावा असेही बंधन नाही. मात्र हा क्रमांक १ ते १०० मधीलच असू शकतो.

जर्सीवरील क्रमांक वापरण्यामागे नेमका तर्क काय आहे?

कुठलीही संघटना आपल्या खेळाडूवर क्रमांकाची बंधने घालत नाही. केवळ इतक्या क्रमांकामधून एक क्रमांक निवडा इतकेच शिखर संघटना सांगत असते. खेळाडू आपल्याला हवा तो क्रमांक वापरू शकतात. क्रिकेटबद्दलच बोलायचे झाले, तर शेन वॉर्नने २३ क्रमांक निवडला कारण हा क्रमांक घेऊन तो सेंट किडला संघाकडून फुटबॉल सामना खेळला होता. रिकी पाँटिंगने १४ क्रमांक निवडला जो त्याने अखेरपर्यंत वापरला. सचिनने सुरुवातीला ९९ क्रमांकाची निवड केली. पण, पुढे तो १० क्रमांक वापरू लागला. भारताचा अष्टपैलू युवराज सिंगचा जन्म १२ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजता चंडीगडच्या सेक्टर १२ येथे झाला. म्हणून युवराजने १२ क्रमांक निवडला.

हेही वाचा… विश्लेषण: ४०० जागांवर भाजप विरुद्ध ‘इंडिया’ आघाडी थेट लढत? प्रत्येक राज्यात लढतीचे स्वरूप कसे असेल?

रोहित शर्माने आईच्या सांगण्यावरून ४५ क्रमांक निवडला. अश्विनला प्रथम ९ क्रमांक हवा होता. कारण तो त्याच्या शाळेतील पट क्रमांक होता. पण, हा क्रमांक पार्थिव पटेलने आधीच घेतला होता. त्यामुळे अश्विनने ९९ क्रमांक निवडला. कुमार संघातून (१९ वर्षांखालील) खेळताना कोहलीला १८ क्रमांक मिळाला. त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरही तो क्रमांक निवडला. धोनीचा जन्म सातव्या महिन्यात ७ तारखेला झाला, म्हणून त्याने ७ क्रमांक निवडला. सेहवागने तर अनेक क्रमांकाच्या जर्सी वापरल्या. अखेर तोच कंटाळला आणि अखेरपर्यंत त्याने जर्सीवर क्रमांकच न वापरण्याचा निर्णय घेतला.

जर्सी क्रमांक किंवा जर्सी निवृत्त करणे म्हणजे नेमके काय?

काही खेळांमध्ये एखाद्या क्रमांकाला विशेष महत्त्व प्राप्त असते, पण क्रिकेटचे तसे नाही. फुटबॉलमध्ये कितीही क्रमांकाच्या जर्सी खेळाडू वापरत असले, तरी या खेळात १० क्रमांक हा बहुतांश वेळा संघातील प्रमुख खेळाडूस मिळतो. फुटबॉलसम्राट पेले, मॅराडोना, लिओनेल मेसी अशा प्रमुख खेळाडूंचा हाच क्रमांक आहे. पण, क्रिकेटमध्ये असा खेळाडूनुसार क्रमांक लोकप्रिय झाला नाही. इतकेच झाले की क्रिकेटमध्ये लोकप्रिय आणि आदर्श बनल्यावर त्याच्या जर्सीकडेदेखील सन्मानाने पाहिले जाते. त्याचा जर्सी क्रमांक त्याची ओळख होऊन बसते. अन्य खेळांमध्ये, विशेषतः अमेरिकेत दिग्गज खेळाडू निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जर्सीलाही निवृत्त केले जाते. म्हणजेच त्या क्रमांकाची जर्सी अन्य कोणीही वापरू शकत नाही. क्रिकेटमध्ये मात्र असे घडल्याची उदाहरणे नाहीत. मात्र आता प्रथमच ‘बीसीसीआय’ने धोनीच्या ७ क्रमांकाच्या बाबतीत अधिकृत घोषणा केली. तसेच अधिकृतरीत्या जाहीर केले नसले, तरी सचिनचा १० क्रमांकही अन्य कोणाला मिळणार नसल्याचे ‘बीसीसीआय’ने खेळाडूंना सांगितल्याची माहिती आहे.

आता पुढे काय?

आयसीसीने १ ते १०० आकड्यामंधील कुठलाही आकडा क्रिकेटपटूंना निवडण्यास सांगितला आहे. भारतात मात्र ७ आणि १० हा क्रमांक वापरता येणार नाही. कारण, धोनी आणि सचिन तेंडुलकर यांच्या या क्रमांकाची जर्सी यापुढे कुणी घालायची नाही असे निश्चित करण्यात आले आहे. पण, भारतात १ ते १०० हे आकडे कमी पडण्याची शक्यता आहे. कारण, आताच किमान ६० आकडे भारतात वापरले जात आहेत आणि ते सर्व आकडे सध्या खेळत असलेल्या खेळाडूंचेच आहेत. त्यामुळे आता क्रिकेटपटूंना हे क्रमांक सोडून आपला क्रमांक शोधावा लागणार आहे.

अन्य खेळात अशी उदाहरणे आढळतात का?

जर्सी क्रमांक निवृत्त करणे ही खरे अमेरिका आणि युरोपमधून आलेली प्रथा आहे. प्रामुख्याने फुटबॉल आणि बास्केटबॉलमध्ये यापूर्वी असे निर्णय घेण्यात आले आहेत. यात लक्षात राहणारे निर्णय म्हणजे एनबीए बास्केटबॉल स्पर्धेतील शिकागो बुल्स आणि मायामी हीट या दोन्ही संघांनी दिग्गज खेळाडू मायकेल जॉर्डनच्या सन्मानार्थ त्याने अखेरपर्यंत वापरलेली २३ क्रमांकाची जर्सी निवृत्त केली. फुटबॉलमध्ये पेलेंच्या सन्मानार्थ ते खेळलेल्या अखेरच्या न्यूयॉर्क कॉसमॉस क्लबने हा क्रमांक परत आपल्या क्लबमधील कुठल्याही खेळाडूला दिला नाही. पण, ज्या सँटोस क्लबसाठी पेले २० वर्षे खेळले, त्यांनी असा कुठल्याही प्रकाराचा निर्णय घेतला नाही. अर्थात, हे पूर्णपणे खेळाडूंच्या स्वयंप्रेरणेवर अवलंबून राहते. फिफा कधीही कुठला असा निर्णय घेत नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने फिल ह्यूजच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्याच्या स्मरणार्थ तो वापरत असलेला ६४ क्रमांक पुन्हा न वापरण्याचा निर्णय घेतला. फुटबॉलमध्येच इंटर मिलान आणि एसी मिलान या संघांनी झेव्हियर झनेट्टी (४) आणि पाओलो माल्दिनी (३) या दिग्गज खेळाडूंचे क्रमांक यापुढे न वापरण्याचा निर्णय घेतला. अर्जेंटिनाने २००१ मध्ये अधिकृतपणे मॅराडोना यांची १० क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला. पण, पुढे त्यांनीच मेसीसाठी हा निर्णय मागे घेतला. आता मेसी १० क्रमांक वापरतो. पण मॅराडोना यांनी एके काळी गाजवलेल्या इटालियन नापोली क्लबसाठीची दहा क्रमांकाची जर्सी त्या क्लबने मॅराडोना यांच्या हयातीतच त्यांच्या सन्मानार्थ निवृत्त केली. सचिन तेंडुलकरचा १० क्रमांक शार्दूल ठाकूरने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात वापरला. पण, त्याला नंतर समाजमाध्यमांवर इतके धारेवर धरण्यात आले की त्याने आपला जर्सी क्रमांक बदलून घेतला.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhonis number 7 jersey retired by bcci what does that mean print exp dvr
Show comments