मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने गुरुवारी रात्री उशिरा ८५ उमेदवारांची दुसरी यादी घोषित केली. यापूर्वी पक्षाने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. २३० जागांपैकी २२९ जागांवर काँग्रेसने उमेदवार उभे केले असल्याने समाजवादी पक्षाशी जागावाटपाची बोलणी फिसकटल्याचे मानले जात आहे. काँग्रेसकडून एकतर्फी उमेदवार जाहीर झाल्यामुळे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव कमालीचे संतप्त झाले आहेत. अखिलेश यादव यांच्या काँग्रेसवरील नाराजीचा परिणाम ‘इंडिया’च्या एकजुटीवर होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
मध्य प्रदेशमध्ये मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस व समाजवादी पक्षामध्ये जागावाटपाची शक्यता वर्तवली जात होती. मध्य प्रदेशमध्ये ‘इंडिया’च्या महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या ‘सप’साठी काही जागा सोडल्या तर, आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाकडून काही जागा काँग्रेसला दिल्या जाऊ शकतात असे राजकीय गणित मांडले गेले होते. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ व दिग्विजय सिंह या ज्येष्ठ नेत्यांनी ‘सप’शी जागावाटपासंदर्भात सविस्तर चर्चाही केली होती. पण, आता दोन्ही पक्षांमध्ये मतभेद तीव्र झाले आहेत. एक जागा वगळता काँग्रेसने मध्य प्रदेशमधील सर्व उमेदवारांची घोषणा केल्यामुळे आता ‘सप’कडूनही ८० हून अधिक उमेदवार रिंगणात उतरवले जातील. ‘सप’ने पहिल्या यादीत ९ आणि दुसऱ्या यादीत २२ उमेदवारांना तिकीट दिलेले आहे. सपच्या उमेदवारांमुळे काँग्रेसचा उमेदवार पराभूत होणार नाही याची दक्षता पक्षाला घ्यावी लागणार आहे.
हेही वाचा – मातोश्री’च्या निकटवर्तीय मीना कांबळी नाराज का झाल्या ?
मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला जागा सोडायच्या नव्हत्या तर चर्चा कशासाठी केली, असा सवाल अखिलेश यादव यांनी केला आहे. कमलनाथ यांनी रात्री एक वाजता ‘सप’च्या नेत्यांना फोन करून चर्चा केली. दिग्विजय सिंह यांनीही चर्चा केली होती. २०१८च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या मतदारसंघांमध्ये ‘सप’चे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. कोणत्या मतदारसंघांमध्ये ‘सप’चा अधिक प्रभाव आहे, यासंदर्भात सगळी माहिती काँग्रेसच्या नेत्यांना दिली होती. मग, काँग्रेसने परस्पर उमेदवार कसे जाहीर केले? मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने ‘सप’ला धोका दिला असल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.
मध्य प्रदेशमध्ये ‘सप’कडे असलेल्या विद्यमान मतदारसंघांमध्येदेखील काँग्रेसने उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसने ‘सप’ला ६ जागा देण्याचे आश्वासन दिले होते. या जागा काँग्रेसने ‘सप’ला का दिल्या नाहीत? ‘इंडिया’ची बैठक फक्त लोकसभा निवडणुकीसाठी असेल आणि विधानसभा निवडणुकीत आघाडी होणार नसले तर काँग्रेसशी आम्ही चर्चाच केली नसती, असा आक्रमक पवित्रा अखिलेश यादव यांनी घेतला आहे. अखिलेश यादव यांनी अप्रत्यक्षपणे ‘इंडिया’च्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. मुंबईमधील बैठकीनंतर ‘इंडिया’च्या नेत्यांची एकही बैठक झालेली नाही. समन्वय समितीने भोपाळमध्ये संयुक्त सभा घेण्याचे नियोजन कमलनाथ यांच्यामुळे बारगळले. आता ‘इंडिया’ची पहिली संयुक्त बैठक नागपूरला होणार असल्याचे सांगितले जाते.
मध्य प्रदेशमधील दुराव्यावर काँग्रेसच्या राज्यातील वा केंद्रीय नेत्यांनी भाष्य केलेले नाही. पण, उत्तर प्रदेशातील प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी अखिलेश यादव यांना प्रत्युत्तर दिले आहे. मध्य प्रदेशमध्ये ‘सप’ची ताकद नसल्यामुळे जागावाटप होऊ शकले नाही. ‘सप’ने ६ जागांची मागणी केली होती तर ९ जागांवर उमेदवार का उभे केले? मतविभाजन टाळण्यासाठी ‘सप’ने काँग्रेसला मदत करायला हवी होती, असा मुद्दा राय यांनी उपस्थित केला आहे.
पाचपैकी चार राज्यांमध्ये काँग्रेसने चांगली कामगिरी केली तर, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उत्तर प्रदेशमध्ये अधिक जागांची मागणी होऊ शकते. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष काँग्रेसशी आघाडी करण्यास तयार नाही. मात्र, लोकसभेच्या ८० जागांपैकी काही जागा काँग्रेसला दिल्या जाऊ शकतात. नुकत्याच झालेल्या घोषी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसने ‘सप’च्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. पण, मध्य प्रदेशमध्ये जागावाटपाच्या बोलणीसाठी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने हस्तक्षेप केला नाही तर त्याचा मोठा फटका उत्तर प्रदेशमध्ये बसू शकतो, असा अप्रत्यक्ष इशारा अखिलेश यादव यांनी दिलेला आहे.