हमास ही दहशतवादी संघटना तसेच इस्रायल यांच्यातील युद्धाला १४ दिवस उलटून गेले आहेत. अजूनही यांच्यातील युद्ध सुरूच असून यामध्ये आतापर्यंत पॅलेस्टाईन आणि इस्रायलमधील हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ७ ऑक्टोबर रोजी हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर क्षेपणास्त्र डागल्यानंतर या युद्धाला अधिकृतपणे सुरूवात झाली. दरम्यान, हा हल्ला करताना हमासच्या दहशतवाद्यांनी ‘कॅप्टगॉन’ नावाच्या गोळ्या घेतल्या होत्या, असा दावा केला जातोय. याच पार्श्वभूमीवर कॅप्टगॉन गोळ्या म्हणजे नेमकं काय? या गोळ्या घेतल्यावर काय होते? या गोळ्यांचे उत्पादन रोखण्यासाठी आतापर्यंत काय कारवाया करण्यात आलेल्या आहेत? हे जाणून घेऊ या….
हमासच्या दहशतवाद्यांना कॅप्टगॉन गोळ्यांचे सेवन केले होते का?
इस्रायलवर हल्ला करताना हमासच्या दहशतवाद्यांनी कॅप्टगॉन या गोळ्यांचे सेवन केले होते, असा दावा केला जातोय. इस्रायलच्या भूमीवर मृतावस्थेत आढळलेल्या हमासच्या दहशतवाद्यांच्या खिशात या गोळ्या आढळल्याचे वृत्त इस्रायलमधील ‘चॅनेल १२’ या वृत्तवाहिनीने दिले आहे. तर ‘घृणास्पद कृत्य करण्यासाठी हमासच्या दहशतवाद्यांना या ड्रग्जच्या रुपात मदत झाली,’ असे ‘द जेरुसलेम पोस्ट’ या जेरूसलेममधील वृत्तपत्राने म्हटले आहे.
कॅप्टगॉन म्हणजे नेमकं काय?
कॅप्टगॉन हे ‘अॅम्फेटामाईन’प्रमाणेच एक उत्तेजक म्हणून काम करते. सिरिया आणि पश्चिम आशियामध्ये या गोळ्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. जर्मनीमध्ये १९६० साली निर्माण करण्यात आलेल्या एका औषधाप्रमाणेच हे औषध वाटते. जर्मनीमध्ये तयार झालेल्या या औषधाचा वापर अटेंशन डेफिसिट डिसऑर्डर, नार्कोलेप्सी तसेच अन्य आजारांवर उपचार करण्यासाठी केला जात होता. तसे वृत्त ‘अल जझिरा’ या वृत्तवाहिनीने दिले आहे. जर्मनीने तयार केलेल्या औषधी गोळ्यांमध्ये फॅनथायलीन (Fenetylline) नावाचा घटक होता. मात्र १९८० साली जगातील अनेक देशांनी या औषधावर बंदी घातली. कारण हे औषध घेतल्यानंतर त्याची सवय लागण्याची शक्यता जास्त होती. ‘युरोपियन मॉनिटरिंग सेंटर फॉर ड्रग्स अँड ड्रग्स अॅडिक्शन’च्या २०१८ सालच्या एका अहवालानुसार याच औषधाला पर्याय म्हणून १९९०-२००० सालात बल्गेरियात कॅप्टगॉन नावाच्या बनावट गोळ्या तयार करण्यात येत होत्या. या गोळ्यांची तस्करी करण्यात येत होती. ही तस्करी अरब देशांत बाल्कन देश तसेच टर्कीमधील गुन्हेगारी टोळ्यांच्या मदतीने केली जायची.
अॅम्फेटामाईनचा शरीरावर काय परिणाम होतो?
अॅम्फेटामाईन हा ड्रग्ज मानवाच्या मज्जासंस्थेला Central Nervous System) उत्तेजना देतो. २०१५ साली ‘वॉक्स’ या अमेरिकन वृत्तसंकेतस्थळाने अॅम्फेटामाईन या ड्रग्जबाबत एक वृत्त दिले होते. या वृत्तानुसार अॅम्फेटामाईन ड्रग्जमुळे शरीरात उर्जा संचारल्यासारखे वाटते. या ड्रग्जमुळे झोप येत नाही. ड्रग्ज घेतल्यानंतर संबंधित व्यक्ती जास्त काळासाठी जागे राहू शकतो. ड्रग्ज घेतल्यानंतर उत्साहपूर्ण वाटते. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार कॅप्टगॉनची एक गोळी ३ ते २५ डॉलर्सना (२५० ते २००० रुपये) मिळते. मात्र या गोळ्यांच्या सेवनामुळे शरीरावर अनेक दुष्परीणाम होतात. ‘बीबीसी’च्या वृत्तानुसार कॅप्टगॉन गोळ्यांचे सेवन केल्यास मेंदूवर परिणाम होऊ शकतो. तसेच अनेक मानसिक आजार होण्याची शक्यता असते.
सिरियात या गोळ्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार कॅप्टगॉन या गोळ्या २०१४ साली जगभरात चर्चेचा विषय ठरल्या होत्या. कारण मुस्लीम देशांत तसेच सिरियात या गोळ्या खूप प्रसिद्ध आहेत. युद्धादरम्यान भूक लागू नये यामुळे सिरियन लढवय्ये या गोळ्यांचे सेवन करायचे.
कॅप्टगॉनची तस्करी रोखण्यासाठी आतापर्यंत काय प्रयत्न झाले?
कॅप्टगॉनची तस्करी रोखण्यासाठी याआधी अनेकदा प्रयत्न करण्यात आलेला आहे. २०१४ सालच्या ‘रॉयटर्स’च्या वृत्तानुसार २०११ साली गृहयुद्धादरम्यान सिरियामध्ये अॅम्फेटामाईनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात येत होते. याच देशात अॅम्फेटामाईन खरेदी करणाऱ्यांचे प्रमाणही बरेच होते. “युद्धादरम्यान जागे राहता यावे म्हणून कॅप्टगॉनचा वापर केला जातो, असे सिरियाचे सैनिक तसेच बंडखोर गटाने सांगितले. सिरियामध्ये ५ ते २० डॉलर देऊन कॅप्टगॉनच्या गोळ्या खरेदी करता येतात. सामान्य नागरिकांकडून अशा गोळ्यांचा वापर वाढला आहे, असे सिरियातील डॉक्टरांनी सांगितले,” असे रॉयटर्सने आपल्या वृत्तात म्हटलेले आहे. कॅप्टगॉन गोळ्यांच्या विक्रीमुळे सिरियाचे अध्यक्ष बशर अल-असद आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा झाल्याचा दावा केला जातो. मात्र असद यांनी हा दावा फेटाळून लावलेला आहे.
आतापर्यंत कॅप्टगॉनच्या अब्जावधी गोळ्या जप्त
‘अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंट अँड ट्रेझरी तसेच ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालय आणि इतर स्वतंत्र संशोधकांच्या मते असद आणि हेजबोला या लेबनीज अतिरेकी गटाशी संबंध असणाऱ्या लोकांकडून कॅप्टगॉनची निर्मिती आणि तस्करी करण्यात येते,’ असे वृत्त ‘ब्लूमबर्ग’ने दिले होते. गेल्या काही वर्षांपासून पश्चिम आशियातील अनेक देशांनी कॅप्टगॉनची निर्मिती आणि तस्करी रोखण्यासाठीचे प्रयत्न केले आहेत. सिरियन अर्थशास्त्रज्ञ आणि संशोधक असणाऱ्या करम शार यांच्या म्हणण्यानुसार गेल्या तीन वर्षांत कॅप्टगॉनच्या अब्जावधी गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. यातील बहुतांश गोळ्या या सौदी अरेबियामध्ये पाठवल्या जात होत्या.
कॅप्टगॉनची तस्करी रोखण्यासाठी अमेरिकेत कायदा
दरम्यान, कॅप्टगॉनच्या गोळ्यांची तस्करी रोखण्यासाठी सौदी अरेबियाने मोहीम राबवल्यानंतर आता तस्कर या गोळ्यांची तस्करी करण्यासाठी वेगळा मार्ग तसेच नवी बाजारपेठ शोधण्याची शक्यता आहे. हे युरोप तसेच संपूर्ण जगासाठी धोकादायक ठरू शकते. या गोळ्यांची अमेरिकेतही तस्करी केली जाण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे खबरदारी म्हणून अमेरिकेने गेल्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात ‘कॅप्टगॉन कायदा’ लागू केला आहे. या कायद्यानुसार कॅप्टगॉनची तस्करी रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.