Depiction of sexuality in ancient India: शतकानुशतकं कामसूत्र हा ग्रंथ अनेकांच्या मनात उत्सुकता, गोंधळ आणि गैरसमज यांचं मिश्रण निर्माण करत आला आहे. बहुतांश लोक या ग्रंथाला केवळ एक प्राचीन लैंगिक शिक्षण देणारे पुस्तक म्हणून पाहतात. परंतु, प्रत्यक्षात वात्सायनाने लिहिलेला कामसूत्र हा ग्रंथ प्रेम, आकर्षण, सहजीवन आणि संवाद यावरील सखोल तत्त्वज्ञान आहे. असं असलं तरी मात्र सध्या एक प्रश्न सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आला आहे. कामसूत्रात ‘कंडोम’चा उल्लेख आहे का? त्याच निमित्ताने घेतलेला हा आढावा.

सत्य काय सांगतं?

स्पष्ट सांगायचं झालं, तर कंडोम हा शब्द कामसूत्रात कुठेही सापडत नाही. कारण त्या काळात लेटेक्स, रबर, किंवा प्लास्टिक अस्तित्त्वातच नव्हते. म्हणूनच कंडोम या शब्दाच्या किंवा वस्तूच्या अनुषंगाने शोध घेतल्यास असा संदर्भ सापडणं कठीण आहे. पण, याचा अर्थ असा नाही की, त्या काळी गर्भनिरोधक किंवा सुरक्षित लैंगिक संबंध याचा विचार केला जात नव्हता. कामसूत्रात (८.२.४६) ‘योनी बंध’ या संकल्पनेचा उल्लेख आहे. म्हणजेच काही विशिष्ट वनस्पतीजन्य द्रव्यांद्वारे स्त्रीयोनीतील शुक्राणूंचा प्रवेश नाकारता येत असे. ही एक प्रकारची गर्भनिरोधक पद्धत असावी, असे अभ्यासक मानतात.

प्राचीन भारत आणि लैंगिक मोकळेपणा

आजच्या तुलनेत प्राचीन भारतात लैंगिकतेकडे अधिक सामान्य, सुसंस्कृत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने पाहिलं जायचं. खजुराहो आणि कोणार्कसारख्या मंदिरांतील शिल्पं, संगम तमिळ काव्यं आणि आयुर्वेदातील ग्रंथ यामध्ये सुरक्षित संबंध, स्त्री-पुरुष समान आनंद आणि वैवाहिक सल्ला यांचं सुस्पष्ट वर्णन सापडतं. “स्त्रीच्या लैंगिक इच्छांचा आदर करणं हे भारतीय परंपरेचं वैशिष्ट्य होतं. ही मोकळीक इंग्रजांच्या काळात हरवली,” असं मत संशोधक गणेश सैली यांनी मांडलं आहे.

आजच्या काळात हाच दृष्टिकोन का महत्त्वाचा आहे?

आजही आपण लैंगिक शिक्षण, सुरक्षित संबंध आणि स्त्रीच्या इच्छेबद्दल बोलताना संकोच बाळगतो. अशा वेळी कामसूत्राकडे केवळ कामुकतेचा नव्हे तर संवाद, सहमती आणि सन्मानाचा ग्रंथ म्हणून पाहणं गरजेचं आहे. सेक्स एज्युकेटर लीझा मंगलदास म्हणतात, “जर आपण खरंच कामसूत्र समजून घेतलं असतं, तर समजूत, सहमती आणि संवाद हाच त्याचा गाभा आहे हे लक्षात आलं असतं.”

कंडोम नाही, पण सहमती आवश्यक होती

वात्सायनच्या काळी Durex किंवा Trojan नव्हते, पण सुरक्षिततेचा विचार, स्त्रीचा सन्मान आणि सहमतीचा आग्रह हे सगळं त्याच्या लिखाणात ठामपणे दिसून येतं. एकुणातच आज आपण ज्या गोष्टी ‘टॅबू’ म्हणून टाळतो, त्यांच्यावर प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये मोकळेपणाने आणि समजूतदारपणाने चर्चा केली गेली होती, हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. कामसूत्र म्हणजे केवळ शरीरसुखाचं पुस्तक नाही, तर ते संवाद, समजूत, सहमती आणि नात्यांमधील भावनिक गुंतवणूक याचं दार्शनिक दर्शन घडवतं. ‘कंडोम’चा स्पष्ट उल्लेख नसला, तरी सुरक्षिततेचा विचार, स्त्रीच्या भावनांचा आदर आणि दोघांच्या समाधानाला महत्त्व देणारी संस्कृती होती. आजच्या काळातही, ही दृष्टी, ही शिकवण आणि ही समज आपल्याला आरोग्यदायी, समानतेवर आधारित आणि सुसंवादात्मक सहजीवन घडवण्यासाठी दिशादर्शक ठरू शकते.

पहिला रबरी कंडोम कधी तयार करण्यात आला

रबरी कंडोमचा वापर इ.स. १८५५ साली सुरू झाला. अमेरिकन संशोधक चार्ल्स गुडईयर यांनी व्हल्कनायझेशन नावाच्या प्रक्रियेद्वारे रबर अधिक लवचिक आणि टिकाऊ करण्याचा शोध लावला. याच तंत्रज्ञानावर आधारित पहिले रबरी कंडोम तयार झाले, हे कंडोम जाडसर आणि पुन्हा वापरण्या योग्य होते. सुरुवातीला हे केवळ उच्च वर्ग व लष्करापुरते मर्यादित होते. मात्र इ.स. १९२० पासून लेटेक्सपासून तयार करण्यात आलेले हलके, एकदाच वापरता येणारे आधुनिक कंडोम बाजारात आले आणि ते गर्भनिरोधक व लैंगिक रोगांपासून बचावाचं प्रभावी साधन मानलं जाऊ लागलं. त्यानंतर रबरी कंडोमचा वापर जगभरात झपाट्याने वाढला.

भारतामध्ये रबरी कंडोमचा वापर

भारतामध्ये रबरी कंडोमचा वापर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात म्हणजेच १९४० च्या दशकात लष्करी गरजांसाठी सुरू झाला. त्या काळात रबरी कंडोम विदेशातून आयात करून वापरले जात होते. १९६८ साली भारत सरकारने ‘निरोध’ (Nirodh) हा पहिला देशी कंडोम ब्रॅण्ड सुरू केला आणि कुटुंब नियोजनासाठी मोफत किंवा अत्यल्प दरात हे कंडोम वितरित केले गेले. सुरुवातीला वापरले जाणारे कंडोम जाडसर आणि पुन्हा वापरण्यायोग्य रबराचे होते, तर १९८० नंतर लेटेक्सपासून तयार होणारे हलके, सुलभ आणि सुरक्षित कंडोम बाजारात आले.

कामसूत्र कंडोम

नंतर १९९१ साली ‘कामसूत्र कंडोम’ या खासगी ब्रॅण्डच्या माध्यमातून कंडोमचा वापर केवळ गर्भनिरोधक नव्हे, तर सुरक्षित आणि आनंददायक लैंगिक जीवनाचा भाग म्हणून स्वीकारला जाऊ लागला. हा ब्रॅण्ड १९९१ साली सुरू झाला. महाराष्ट्रातील संभाजी नगर येथे उत्पादन युनिट आहे. सुरुवातीला, हा ब्रॅण्ड रेमंड ग्रुप आणि ऑस्ट्रेलियन कंपनी अँसेल लिमिटेड यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे (J.K. Ansell Ltd.) चालवला जात होता. नंतर, रेमंड ग्रुपने पूर्ण मालकी घेतली आणि Raymond Consumer Care Ltd. च्या अंतर्गत कामसूत्र कंडोमचं उत्पादन आणि विपणन केलं जात आहे. कामसूत्र कंडोम ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंडोम ब्रॅण्ड आहे. या ब्रॅण्डने भारतीय बाजारात कंडोमच्या वापराबाबतचा दृष्टिकोन बदलला आहे.