NASA accidentally kill living creatures on Mars: मंगळावर जीवसृष्टी असण्याची कल्पना अनेक दशकांपासून वैज्ञानिकांना मोहवून टाकत आली आहे. १९७० च्या दशकात नासाच्या वायकिंग मोहिमांनी मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग करून इतिहास रचला, ज्याचा मुख्य उद्देश तेथे जीवसृष्टीची चिन्हे शोधणे हा होता. मात्र एक नवीन सिद्धांत या मोहिमांच्या मुख्य गृहितकालाच आव्हान देत आहे. अॅस्ट्रोबायोलॉजिस्ट डिर्क शुल्झ-माकुच यांनी असे सुचवले आहे की, वायकिंग लँडर्सने नकळत मंगळावर आजवर असलेली जीवसृष्टीच नष्ट केली असावी, कारण त्यांनी त्या पर्यावरणात पाणी आणले. ही कल्पना पारंपरिक विश्वासालाच उधळून लावते, ज्यामध्ये द्रव पाणी हे जीवनासाठी आवश्यक मानले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अधिक वाचा: अ‍ॅडॉल्फ हिटलरने स्वप्नपूर्तीसाठी ‘फोक्सवॅगन’ गाडीला आकार का दिला?

मंगळावर मातीला पाणी…

१९७० च्या दशकाच्या मध्यात सुरू झालेल्या नासाच्या वायकिंग मोहिमांचे उद्दिष्ट मंगळावर जीवन अस्तित्वात आहे का, हा एक साधा प्रश्न सोडवणे होते. वायकिंग १ आणि वायकिंग २, १९७६ साली मंगळावर उतरले त्यांनी जैविक अस्तित्त्व शोधण्यासाठी प्रयोग केले. या प्रयोगांमध्ये मंगळावरील मातीला पाणी आणि पोषकतत्त्वे देऊन निरीक्षण करण्यात आले. गृहीत धरण्यात आले होते की, जर मंगळावर जीवन अस्तित्वात असेल, तर ते पृथ्वीवरील जीवनासारखीच प्रतिक्रिया देईल. या प्रयोगांमधून काही गूढ गोष्टी आढळल्या, मात्र नंतर त्या खोट्या सकारात्मक प्रतिक्रिया (false positives) म्हणून फेटाळण्यात आल्या. परिणामी, बहुतेक वैज्ञानिक या निष्कर्षावर पोहोचले की, या मोहिमांनी मंगळावर जीवनाचे कोणतेही पुरावे उघड केले नाहीत.

शुल्झे-माकुचचे नवीन गृहितक

जवळपास ५० वर्षांनंतर, शुल्झ-माकुच यांचा सिद्धांत (Space.com द्वारे) या निष्कर्षांना आव्हान देत आहे. त्यांचा दावा आहे की, वायकिंग मोहिमांमध्ये वापरलेल्या पाण्याने मंगळावर तोपर्यंत अस्तित्त्वात असलेल्या जीवसृष्टीला, विशेषतः सूक्ष्मजंतूंना बाधित केले, जे या ग्रहाच्या कोरड्या परिस्थितींमध्ये अनुकूल झाले होते. मंगळ हा अत्यंत शुष्क (hyperarid) पर्यावरणासाठी ओळखला जातो आणि तिथल्या सूक्ष्मजीवांनी द्रव पाण्यावर अवलंबून न राहता पातळ वातावरणातून ओलावा मिळवण्यासाठी स्वतःला अनुकूल केले असण्याची शक्यता आहे. शुल्झ-माकुच यांनी वायकिंग लँडर्सच्या परिणामाची तुलना २०१५ साली पृथ्वीवरील अटाकामा वाळवंटातील घटनेशी केली आहे, जिथे पावसाच्या अचानक झालेल्या आगमनामुळे सूक्ष्मजंतूंच्या लोकसंख्येमध्ये लक्षणीय घट झाली होती. त्यांच्या मते, वायकिंग मोहिमांनी मंगळावरील सूक्ष्मजीवांवर अशाच प्रकारे परिणाम केला असावा, जिथे पर्यावरणात ओलावा इतका वाढला की ते सूक्ष्मजीव टिकूच शकले नाहीत.

मंगळावर जीवसृष्टीच्या शोधात

हा सिद्धांत नासाच्या मंगळ मोहिमांमध्ये दीर्घ काळापासून वापरल्या जाणाऱ्या “पाण्याचा शोध घ्या” या दृष्टिकोनाला आव्हान देतो. शुल्झ-माकुच सुचवतात की, भविष्यातील जीवन शोध मोहिमांनी द्रव पाण्याचा शोध घेण्याऐवजी हायग्रोस्कोपिक सॉल्ट्स (हवेतील ओलावा शोषून घेणारे संयुगे) यावर लक्ष केंद्रित करावे, कारण ती मंगळावरील सूक्ष्मजीवांसाठी संभाव्य निवासस्थान असू शकतात. त्यांचा विश्वास आहे की, या धोरणातील बदलामुळे शास्त्रज्ञांना मंगळाच्या अत्यंत कोरड्या वातावरणाशी जुळवून घेतलेल्या जीवरूपांचा शोध घेण्यास मदत होऊ शकते. मंगळावरील जीवनाच्या शोधाचा प्रवास सुरू असतानाच, शुल्झ-माकुच यांचा सिद्धांत नवीन शक्यता आणि संशोधनाच्या दिशांना वाव देणारा ठरला आहे.

अधिक वाचा: Digital arrests: पाच दिवसांत, तब्बल पाच कोटी गायब; डिजिटल अटक प्रकरणात नेमके काय घडले? त्यातून कोणता धडा घ्याल?

द्रव पाणी हेच जीवन शोधण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे, असे गृहीत धरत राहण्याऐवजी; भविष्यातील मोहिमांनी मंगळाच्या कठोर परिस्थितीत जीवन टिकण्यासाठी कोणते घटक आवश्यक आहेत याचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे. नवीन तंत्रज्ञान आणि संशोधन पद्धतींच्या मदतीने शास्त्रज्ञ लवकरच मंगळावर जीवन अस्तित्वात होते का, याचा शोध घेण्यासाठी अधिक सक्षम होतील आणि या ग्रहावरील जीवनाचा खरा शोध लावू शकतील, असा विश्वास प्रस्तुत संशोधकानी व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did nasa accidentally kill living creatures on mars svs