संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या कामकाजाची सुरुवात नव्या इमारतीत झाली आहे. आज (१९ सप्टेंबर) संसदेच्या जुन्या इमारतीच्या आवारात सदस्यांचे एकत्रित छायाचित्र घेण्यात आले. यापुढे संसदेचे कामकाज नव्या इमारतीतच होणार आहे. दरम्यान, संसदेची जुनी इमारत देशाच्या ७५ वर्षांतील जडणघडणीची साक्षीदार आहे. याच पार्श्वभूमीवर या इमारतीची नव्याने चर्चा होत आहे. मध्य प्रदेशमधील चौसष्ठ योगिनी मंदिराच्या रचनेची प्रेरणा घेऊनच या जुन्या इमारतीची निर्मिती करण्यात आली होती, असे म्हटले जाते. मध्य प्रदेशमधील हे चौसष्ठ योगिनी मंदिर कोठे आहे? त्याची विशेषता काय आहे? याच मंदिरापासून जुन्या इमारतीच्या निर्मितीसाठी प्रेरणा घेण्यात आली होती का? हे जाणून घेऊ या.
संसदेची जुनी इमारत कशी उभी राहिली?
ब्रिटिश वास्तुविशारद एडविन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी जुन्या संसद इमारतीची रचना केली होती. ब्रिटिशांनी आपली राजधानी दिल्ली येथे हलवण्याचे ठरवल्यानंतर ही इमारत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पुढे १८ जानेवारी १९२७ ते १५ ऑगस्ट १९४७ या काळासाठी ही इमारत ‘इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काऊन्सिल’ म्हणून ओळखली जायची. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारतासाठी नव्या संविधानाची रचना करण्यात आली. हे संविधान स्वीकारल्यानंतर भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले. पुढे संसदेचे राज्यसभा आणि लोकसभा ही दोन्ही सभागृहे याच इमारतीत होते. आता मात्र इमारतीते संग्रहालयात रुपांतर करण्यात येणार आहे.
लुटियन्स आणि बेकर यांनी अनेक वास्तूंना भेट दिली
जेव्हा नव्या दिल्लीची रचना करण्यात येत होती, तेव्हा तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंज यांना राज्यकारभार चालवण्यासाठी एक मोठी वास्तू असावी असे वाटले. त्यासाठी त्यांनी भारतीय संस्कृतीची छबी असलेली एक इमारत उभारण्याचे सांगितले. त्यानंतर लुटियन्स आणि बेकर यांनी भारतातील अनेक शहरांना भेट देऊन भारताच्या वास्तूकलेचा अभ्यास केला. यामध्ये मांडू, लाहोर, लखनौ, कानपूर, इंदौर या शहरांचा या दौघांनी दौरा केला. सध्या नवी दिल्लीत असलेले राष्ट्रपती भवन, संसदेची जुनी इमारत या वास्तू भारतीय आणि पाश्चात्त्य वास्तूकलेचे मिश्रण आहेत.
चौसष्ठ योगिनी मंदीर आणि त्याची विशेषता
चौसष्ठ योगिनी मंदीर हे मध्य प्रदेशमधील मोरेना जिल्ह्यात आहे. ग्वाल्हेरपासून साधारण ४० किमी अंतरावर मिताओली नावाच्या डोंगरावर हे मंदीर आहे. मोरेना जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर या मंदिराविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. या माहितीनुसार हे मंदीर १३२३ साली कच्छापाघाता राजवंशाचा राजा देवपाला यांनी उभारले होते. भारतातील एका मंदिरात शक्यतो एक देव असतो. मात्र हे मंदीर ६४ योगिंनींना समर्पित आहे.
६४ योगिनी कोण होत्या?
पौराणिक कथेनुसार रक्तबीज नावाचा एक राक्षस होता. हा राक्षस अतिशय शक्तिशाली होता. त्याच्या रक्ताचा एकजरी थेंब जमिनीवर सांडला की त्यातून शेकडो अपत्ये जन्माला येत. याच कारणामुळे त्याचा वध करणे अशक्य आहे, असे म्हटले जाई. मात्र दुर्गादेवीने त्याच्याविरोधात युद्ध पुकारले. त्याला मारण्यासाठी दुर्गामातेने ६४ योगिनींना मुक्त केले. याच योगिनींनी रक्तबीज या राक्षसाचा एकही थेंब जमिनीवर सांडू दिला नाही. त्याचे सर्व रक्त पिऊन घेतले. त्यामुळे शेवटी रक्तबीज या राक्षकाचा अंत झाला, असे म्हटले जाते.
६४ योगिनी मंदिराची विशेषता काय?
मध्य प्रदेशमधील ६४ योगिनी मंदीर हे गोलाकार आहे. पौराणिक कथेत उल्लेख असलेल्या ६४ योगिनींना समर्पित हे मंदीर आहे. या मंदिराच्या मध्यभागी शिवलिंग आहे. बहुतांश हिंदू मंदिरांमध्ये घुमट असतो, शिखर असते, मात्र मध्य प्रदेशमधील या मंदिराला शिखर किंवा घुमट नाही. तसेच या मंदिराला छतही नाही. संसदेच्या जुन्या इमारतीला जसे खांब आहेत, तसेच खांब हे ६४ योगिनी मंदिरातदेखील आहेत. मध्यभागी असलेल्या शिवमंदिरात पाण्याचा निचरा होण्यासाठी विशेष रचना करण्यात आलेली आहे. मध्य प्रदेशच्या शासकीय पर्यटन संकेतस्थळावर असलेल्या माहितीनुसार या मंदिराचा व्यास १२५ फूट आहे.
ज्योतिष आणि गणितशास्त्र शिकवण्यासाठी उपयोग
या मंदिरात एकूण ६४ कक्ष आहेत. मंदिरातील मूर्ती तसेच नक्षीकाम खराब झाले आहे. तसेच या मंदिराबाबत सखोल माहिती उपलब्ध नाही. मात्र मोरेना जिल्ह्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार या मंदीर परिसराचा उपयोग ज्योतिषशास्त्र तसेच गणितशास्त्र शिकवण्यासाठी केला जाई. सध्या हे मंदीर डोंगरावर त्याचे गुढ रहस्य घेऊन अजूनही उभे आहे.
६४ योगिनी मंदिराच्या प्रेरणेतून संसदेच्या जुन्या इमारतीचे बांधकाम?
६४ योगिनी मंदीर आणि संसदेची जुनी इमारत यांचे बांधकाम सारखेच भासते. दोन्ही वास्तू वर्तुळाकार आहेत. याच कारणामुळे संसदेची जुनी इमारत ६४ योगिनी मंदिराकडून प्रेरणा घेऊनच उभारण्यात आली आहे, असा दावा केला जातो. प्रत्यक्ष मात्र तसे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. लुटियन्स आणि बेकर यांनी संसदेची जुनी इमारत उभारताना देशातील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट दिली होती. मात्र त्यांनी या ६४ योगिनी मंदिराला भेट दिल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. मध्य प्रदेशच्या पर्यटन संकेतस्थळावर “६४ योगिनी मंदीर हे भूकंपाच्या झोन ३ मध्ये येते. १३ व्या शतकात हे मंदीर उभारण्यात आले होते. तेव्हापासून हे मंदीर आजही चांगल्या स्थितीत आहे. अनेक भूंकपांना तोंड देत हे मंदीर आजही शाबूत आहे. याच कारणामुळे लुटियन्स आणि बेकर यांनी या मंदिराचा संदर्भ घेतला असावा किंवा या मंदिरापासून त्यांना प्रेरणा मिळाली असावी,” असे सांगण्यात आले आहे.
“…तसा कोणताही पुरावा उपलब्ध नाही”
या दाव्याबाबत इतिहासकार स्वप्ना लिडल यांनी याआधी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला माहिती दिलेली आहे. “भारतीय वास्तुकलेचा अभ्यास करण्यासाठी, भारतातील वास्तुकला पाहण्यासाठी ल्युटियन्स आणि बेकर यांना भारतात फिरण्यास सांगितले होते. भारतीय पुरातत्व विभागाने जमा केलेले काही फोटोदेखील त्यांनी पाहिले असावेत. त्यांनी संसदेची जुनी इमारत उभारताना भारतातील वास्तुंचा संदर्भ घेतल्याचे पुरावे नाहीत. मात्र हे मान्य करणे काहीसे अवघड आहे,” असे लिडल म्हणाल्या होत्या. सोमवारी (१८ सप्टेंबर) त्यांच्याशी या विषयावर पुन्हा एकदा बातचित करण्यात आली. यावेळीदेखील त्यांनी बेकर यांनी वेगवेगळ्या ठिकाणांना भेट दिली होती. मात्र त्यांनी ६४ योगिनी मंदिराला भेट दिल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. त्यांनी या मंदिराचे काही फोटो पाहिले असतील, पण त्यांनी फोटो पाहिल्याचाही पुरावा उपलब्ध नाही, असे स्वप्ना यांनी सांगितले.