संजय जाधव
खनिज तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात वाढू लागले आहेत. त्यातच जगातील प्रमुख तेल शुद्धीकरण कंपन्यांकडून सध्या डिझेलचे उत्पादन कमी झाले आहे. यामुळे आगामी काळात डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची भीती आहे. वीज निर्मिती आणि वाहतूक यासाठी डिझेलवर अवलंबून असलेल्या देशांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसणार आहे. अशा देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. कारण भारतातील मालवाहतूक ही प्रामुख्याने डिझेल वाहनांच्या माध्यमातून होते. भारतात पेट्रोलपेक्षा डिझेलची मागणी सुमारे अडीचपट आहे. मे महिन्यात देशात ८२ लाख टन डिझेलची विक्री झाली होती तर पेट्रोलची विक्री ३४ लाख टन होती. जगासमोर डिझेल संकट उभे राहिले आहे का, त्याची कारणे काय आहेत, यावर दृष्टिक्षेप.
डिझेलचे उत्पादन कमी का?
तेल उत्पादक देशांची संघटना ‘ओपेक प्लस’मधील आघाडीच्या सौदी अरेबिया आणि रशिया यांनी या वर्षात खनिज तेल उत्पादनावर मर्यादा आणल्या आहेत. त्यातही या दोन देशांनी डिझेलचा अंश जास्त असलेल्या खनिज तेलाचे उत्पादन कमी केले आहे. विशेष म्हणजे, खनिज तेलाची मागणी वाढण्यास सुरवात होते, त्याचवेळी ही उत्पादन मर्यादा घालण्यात आली आहे. पश्चिमी देशांनी निर्बंध घालूनही रशिया हा जागतिक पातळीवर मोठा पुरवठादार देश कायम राहिला आहे. रशियाने आता तेल उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतल्याचा दबाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर दिसून येत आहे. याचवेळी अमेरिका आणि सिंगापूरमधील डिझेलचा साठा सरासरी पातळीच्या खाली घसरला आहे. मागील वर्षी रशिया-युक्रेन युद्धामुळे तेलाच्या वाहतुकीवर मर्यादा आल्या होत्या. त्यातून अनेक देशांमध्ये खनिज तेलाचा साठा कमी झालेला आहे.
आणखी वाचा-हरदीपसिंग निज्जर ते अर्शदीप, एनआयएने पंजाबमधील टोळ्यांवर कशी कारवाई केली?
सध्या किमतीवर दबाव किती?
आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा भाव प्रतिपिंप ९४ डॉलरवर पोहोचला आहे. याचवेळी युरोपमध्ये उन्हाळ्यापासून खनिज तेलाच्या भावात ६० टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. आगामी काळ हिवाळ्याचा आहे. त्यावेळी युरोपसह अनेक देशांमधून डिझेलची मागणी वाढते. नेमकी याच काळात तेल उत्पादक देशांनी उत्पादन कमी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आगामी काळात डिझेलचे उत्पादन कमी होणार असून, त्याचा फटका युरोपसह इतर देशांना बसणार आहे.
हवामान बदलाचाही परिणाम?
जागतिक पातळीवर हवामान बदलाचा फटका अनेक क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्यात तेलशुद्धीकरण क्षेत्राचाही समावेश आहे. उत्तर गोलार्धातील उष्णता वाढल्याने अनेक तेलशुद्धीकरण प्रकल्प क्षमतेपेक्षा कमी वेगाने कार्य करीत आहेत. त्यामुळे आपोआप साठा कमी झालेला आहे. याचवेळी डिझेलपेक्षा विमान इंधन आणि पेट्रोल उत्पादनावर तेलशुद्धीकरण कंपन्या भर देत आहेत. कारण त्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. करोना संकटाच्या काळात मागणी कमी झाल्याने कार्यक्षम नसलेले तेलशुद्धीकरण प्रकल्प बंद पडले. आता मागणी करोनापूर्व पातळीवर आली आहे. याचवेळी हिवाळ्यात तापमान कमी होणार असल्याने आगामी काळात तेलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होतील. त्यातून डिझेलचा पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. असे असले तरी याच कालावधीत अनेक तेलशुद्धीकरण प्रकल्पांची हंगामी दुरुस्ती होते. त्यामुळे डिझेलचा पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता कमी आहे.
आणखी वाचा-देशात १८.८३ कोटी लोकांना उच्च रक्तदाब; ४६ लाख मृत्यू रोखण्याचे भारतासमोर आव्हान
उत्पादनाचे गणित जुळणार का?
युरोप, अमेरिकेसह भारत आणि इतर देशांमध्ये मालवाहतुकीसाठी डिझेलवरील वाहनांचा वापर प्रामुख्याने होतो. अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीच्या वाटेवर जाईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. इंधन दराचा भडका उडाल्यास परिस्थिती आणखी बिकट होईल. डिझेलचे भाव वाढल्यास तेलशुद्धीकरण प्रकल्पांवर त्याचे उत्पादन वाढविण्याचा दबाव येईल. त्यातून आपोआप पेट्रोलचे उत्पादन कमी होईल. यामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होऊन पेट्रोलच्या भावातही वाढ होऊ शकते.
महागाई वाढणार का?
खनिज तेलाच्या भावाने प्रतिपिंप १०० डॉलरची पातळी गाठली आहे. या वर्षी पहिल्यांदाच खनिज तेल या पातळीवर पोहोचले आहे. जूनपासून खनिज तेलाच्या भावात सुमारे ३० टक्के वाढ झाली आहे. यातच चीनमधून मागणी वाढू लागल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर भाव वाढू लागले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने रशिया आणि सौदी अरेबियाच्या तेल उत्पादन कपातीबाबत इशारा दिला आहे. या कपातीमुळे आगामी काळात तेलाच्या भावात अस्थिरता निर्माण होईल. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत खनिज तेलाचा भाव कमी होता. त्यामुळे महागाई नियंत्रणात ठेवणे अनेक देशांना शक्य झाले. आता दुसऱ्या सहामाहीत खनिज तेलाचे भाव वाढणार आहेत. त्यामुळे महागाई नियंत्रण अवघड बनणार आहे. खनिज तेलाच्या भावात वाढ सुरूच राहिल्यास आगामी काळात महागाईचा भडका उडण्याची चिन्हे आहेत.
sanjay.jadhav@expressindia.com