करोना विषाणूच्या ‘बीएफ.७’ (BF.7) व्हेरिएंटने चीनमध्ये थैमान घातलं आहे. चीनमधील करोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतातही करोनाची नवीन लाट निर्माण होईल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. संभाव्य करोना लाटेशी लढण्यासाठी प्रशासकीय स्तरावर तयारी केली जात आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण असून भारतात करोनाची चौथी लाट येऊ शकते, असा अंदाज अनेकांकडून वर्तवला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बीएफ.७’ हा व्हेरिएंट अत्यंत संक्रामक मानला जातो. करोना विषाणूच्या या उपप्रकाराच संसर्ग झालेली व्यक्ती जवळपास १८ लोकांमध्ये विषाणू सहजपणे पसरवू शकते, असे आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या विषाणूची ‘आर-व्हल्यू’ (R-Value) उच्च असली तरी चीनच्या तुलनेत भारतात याचा विशेष परिणाम होणार नाही, असं मत भारतीय तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

‘बीएफ.७’ व्हेरिएंटचा भारतात शिरकाव

ओमायक्रॉनच्या ‘बीएफ.७’ उपप्रकाराने भारतात शिरकाव केला असला तरी लोकांनी घाबरलं नाही पाहिजे, असा सल्लाही आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. कारण आपल्या देशातील नागरिकांनी करोना विषाणूशी लढण्यासाठी ‘हायब्रीड इम्युनिटी’ विकसित केली आहे. त्यामुळे आपण करोनाची संभाव्य लाट सहजपणे रोखू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

कोविड-१९ पॅनेलचे प्रमुख एन. के. अरोरा यांनी ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, भारतीयांमध्ये विकसित झालेली रोग प्रतिकारकशक्ती ‘हर्ड इम्युनिटी’ नाही. तर ही ‘हायब्रीड इम्युनिटी’ आहे. जी भारतीयांना साथीच्या रोगापासून सुरक्षित ठेवते. पण खबरदारीचा उपाय म्हणून लोकांनी करोना नियमांचं काटेकोर पालन करायला हवं.

आणखी वाचा – करोनाच्या नव्या व्हेरीयंटपासून वाचण्यासाठी मदत करतील ही १० उपकरणं; जाणून घ्या किंमत आणि उपयोग

‘हर्ड इम्युनिटी आणि ‘हायब्रिड इम्युनिटी यातील फरक

संसर्गजन्य रोगांपासून लोकसमूहाचं अप्रत्यक्षपणे रक्षण करणाऱ्या सामूहिक रोगप्रतिकारक शक्तीला ‘हर्ड इम्युनिटी’ असं म्हटलं जातं. जेव्हा लोकसमूह एखादी लस घेतो किंवा संसर्गातून बरे झाल्यानंतर त्यांच्या शरीरिरात संबंधित रोगाशी लढणारी प्रतिकारशक्ती विकसित होते. समूहाच्या या सामूहिक प्रतिकारशक्तीला ‘हर्ड इम्युनिटी’ असं म्हणतात.

तथापि, ‘हायब्रिड इम्युनिटी’ ही ‘हर्ड इम्युनिटी’च्या पुढचा टप्पा आहे. करोना संक्रमणाच्यावेळी आणि लसीकरण अशा दोन्हींमुळे तयार होणाऱ्या रोगप्रतिकारकशक्तीला ‘हायब्रिड इम्युनिटी’ म्हणतात. ज्यांना करोना विषाणूची लागण झाली, त्यांच्यामध्ये करोनाविरोधात प्रतिकारक शक्ती विकसित होते. तसेच त्यांनी करोना प्रतिबंधक लसही घेतली असेल, तर अशा लोकांमध्ये ‘हायब्रिड इम्युनिटी’ तयार होते.

हेही वाचा- Covid New Variant: करोनाविरुद्धच्या लढ्यात घरामधील ‘हे’ पदार्थ ठरतील सुरक्षाकवच! आजच करा आहारात समावेश

भारतातील बहुसंख्य लोकांनी कोविड-१९ लशीचे किमान दोन डोस घेतले आहेत. तसेच करोना साथीच्या पहिल्या तीन लाटांमध्ये कोट्यवधी लोकांना संसर्ग झाला आहे. त्यामुळे देशातील लोकांमध्ये आता करोना विषाणूविरुद्ध ‘हायब्रिड इम्युनिटी’ विकसित झाली आहे.

‘बीएफ.७’ व्हेरिएंट भारतात घातक ठरणार का?

‘एनडीटीव्ही’शी संवाद साधताना डॉ. एन. के. अरोरा म्हणाले की, भारतात मजबूत ‘हायब्रिड इम्युनिटी’ आहे. भारताने एकापाठोपाठ करोना संसर्गाच्या तीन लाटांचा सामना केला आहे. या काळात देशातील कोट्यवधी लोकांना करोना संसर्ग झाला आणि यातून ते यशस्वीपणे बाहेरही पडले.

हेही वाचा- विश्लेषण : जीआय टॅग म्हणजे नेमकं काय? उत्पादकांना नेमका कसा फायदा होतो? जाणून घ्या

भारतात आतापर्यंत पाच कोटींहून अधिक लोकांना कोविड-१९ ची लागण झाली आहे. त्यामुळे बर्‍याच भागातील लोकसमूहांमध्ये ‘हर्ड इम्युनिटी’ तयार झाली. त्यामुळे ओमायक्रॉनचा अति संसर्गजन्य ‘बीएफ.७’ व्हेरिएंट भारतात फारसा घातक ठरणार नाही, असा विश्वास आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Difference between herd and hybrid immunity corona virus latest varient bf7 rmm