भारत आणि चीनदरम्यानचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या हिंसेत २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर देशामध्ये चिनी मालाविरोधातील मोहीम अधिक तिव्र झाल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केलं जात आहे. भारतीय उत्पादनांना प्राधान्य देण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र याचवेळी काही जणांनी ‘मेड इन चायना’बरोबर चीनच्या ‘असेंबल्ड इन इंडिया’ उत्पादनांवरही बहिष्कार टाकण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. अशावेळी पडणारा पहिला प्रश्न म्हणजे या दोन्हींमध्ये काय फरक आहे?
‘मेड इन इंडिया’ म्हणजे काय?
एखाद्या उत्पादनांचे सुटे भाग आणि तंत्रज्ञान भारतामध्येच तयार करुन अंतिम उत्पादनांची निर्मिती केली जाते तेव्हा त्या उत्पादनांना ‘मेड इन इंडिया’ उत्पादने म्हणजेच भारतात निर्माण झालेली उत्पादने असं म्हटलं जातं. सोप्या शब्दात सांगायचं तर कोणत्याही वस्तूचे उत्पादन घेण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल, मनुष्यबळ, तंत्रज्ञान, निर्मिती भारतामध्येच झाली तर ती वस्तू भारतात निर्माण झाली असं म्हणतात. म्हणजेच अगदी तंत्रज्ञानापासून सर्व काही भारतीय असेल तरच एखादी गोष्ट स्वदेशी म्हणून ओळखली जाते.
‘मेक इन इंडिया’ म्हणजे काय?
दुसरीकडे एखाद्या परदेशी कंपनीने भारतामध्ये वस्तू निर्माण करण्याचा कारखाना सुरु केली आणि सर्व आवश्यक गोष्टींची जुळवाजुळव भारतामध्येच केली तर अशी उत्पादने ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत येतात. यामध्ये तंत्रज्ञान भारतामध्ये वापरणं हा सर्वात मोठा मुद्दा असतो. एखादी कंपनी उत्पादन घेण्यासाठी स्वत:चे तंत्रज्ञान देशात आणत असेल तर त्या तंत्रज्ञानाची देखरेख करण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी कंपनी देशातील यंत्रणांवर अवलंबून राहत नाही.
‘मेक इन इंडिया’चा अर्थव्यवस्थेला सर्वाधिक फायदा कसा होतो?
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर केंद्र सरकारने मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी परदेशी कंपन्यांना आमंत्रित केलं तेव्हा त्यांच्यासमोर पहिली अट ही तेथील तंत्रज्ञान भारतामध्ये वापरण्यासंदर्भातील होती. याच तंत्रज्ञानाला भविष्यात अधिक सक्षम बनवून वस्तू पूर्णपणे भारतात बनवण्यासाठी ही अट ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते. असं झाल्यास सध्या मेक इन इंडिया अंतर्गत असणाऱ्या या वस्तू भविष्यात पूर्णपणे भारतातच बनवणे म्हणजेच मेड इन इंडिया अंतर्गत निर्माण करता येणे शक्य होईल. देशातच एखादी गोष्ट तयार केल्यास अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागतो. परदेशी गुंतवणूक वाढते. भारतातच वस्तूंची निर्मिती केल्याने स्थानिकांना रोजगार मिळतो. तसेच यामुळे आयत आणि निर्यातीमधील तूट कमी होते. या सर्व गोष्टींमुळे भारतीय चलन अधिक सक्षम होते.
‘असेंबल्ड इन इंडिया’ म्हणजे काय?
एखादी परदेशी कंपनी भारतामध्ये आपला कारखाना उभारते आणि वस्तू निर्मितीसाठी लागणारे सुटे भाग हे आपल्या देशामधून आयात करुन भारतीय मनुष्यबळाच्या आधारावर निर्मिती करत असेल तर अशा वस्तूंना ‘असेंबल्ड इन इंडिया’ असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास ‘असेंबल्ड इन इंडिया’ अंतर्गत येणाऱ्या वस्तूंच्या कच्च्या मालापासून ते तांत्रिक गोष्टींपर्यंत आणि आतील सर्व सुट्या भागांपर्यंत सर्व काही दुसऱ्या देशातील असते. या सर्व गोष्टी भारतामध्ये आणून त्या एकत्र करुन त्यापासून अंतिम वस्तूची निर्मिती केली जाते. या अशा वस्तूंवर ‘असेंबल्ड इन इंडिया’चा मार्क दिसतो. यामध्ये केवळ रोजगार निर्मितीचा फायदा भारताला होतो.
आकडे काय सांगतात?
वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या २०१८ च्या एका अहवालानुसार भारतामध्ये २०१४ मध्ये चीनमधून ६.३ अरब डॉलर किंमतीचे फोन आयात करण्यात आले. त्यानंतर भारताने मेक इन इंडियाला प्राधान्य दिल्यानंतर या आयात करण्यात येणाऱ्या फोनची संख्या कमी कमी होत गेली. २०१७ मध्ये ३.३ अरब डॉलरचे फोन भारतात आयात करण्यात आले. एकीकडे मेक इन इंडियाला दिलेले प्राधान्य तर दुसरीकडे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात मोबाइलच्या सुट्या भागांची झालेली आयात या दोन कारणांमुळे हा बदल दिसून आल्याचे सांगण्यात येते. भारताने २०१४ साली चीनमधून १.३ अरब डॉलरचे मोबाइलचे सुटे भाग आयात केले होते. तर २०१७ मध्ये हाच आकडा ९.४ अरब डॉलर इतका होता. यावरुन चिनी कंपन्या त्यांच्या देशातून कच्चा माल आणून आपल्या देशामध्ये अंतिम वस्तूंची निर्मिती करत होत्या.