करोना व्हायरसचा प्रदुर्भाव भारतात वाढण्यास सुरूवात झाली आहे. करोना हे विषाणूच्या एका समूहाचे नाव असून माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये आढळतो. हा विषाणू यापूर्वी माणसामध्ये आढळलेल्या सहा-सात विषाणूंपेक्षा वेगळा आहे. म्हणून याला नोवेल करोना विषाणू असे म्हटले आहे. या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असली तरी यातून पूर्णपणे बरे होणे शक्य आहे. करोना व्हायरसवर अद्याप कोणतेही औषधं उपलबद्ध नाही. या रोगांपासून वाचण्यासाठी रुग्णांन आणि संशयितांना अलगीकरण (क्वारंटाइन) आणि विलगीकरण (आयसोलेशन) कक्षात ठेवलं जातेय. पण विलगीकरण आणि अलगीकरण कक्ष म्हणजे काय? …हे आज आपण जाणून घेणार आहोत…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलगीकरण (क्वारंटाइन) कक्ष म्हणजे जेथे संशयित रुग्णांना १४ दिवसांसाठी वेगळ्या वॉर्डमध्ये ठेवले जाते. येथे मास्कपासून, जेवण, वायफाय, औषधांसह सर्व सुविधा रुग्णालयात पुरविल्या जातात. यांना या दिवसात करोनाची लक्षणे आढळल्यास तातडीने विलगीकरण (आयसोलेशन) कक्षामध्ये ठेवले जाते. संशयित रुग्णांपासून इतरांना संसर्ग पसरू नये म्हणून प्रतिबंधात्मक काळजी म्हणून त्यांना वॉर्डमध्ये ठेवले जाते. करोनाबाधित रुग्ण विलगीकरण कक्षामध्ये ठेवलेले असतात. त्यामुळे प्रत्यक्ष रुग्णांपासून त्यांना संसर्ग होण्याची शक्यता नसते. देशात परतल्यापासून १४ दिवसांनंतर कोणतीही लक्षणे न आढळल्यास आणि चाचणी नकारात्म्क आल्यास या रुग्णांना घरी सोडले जाते.

विलगीकरण कक्ष म्हणजे जेथे करोनाचा संसर्ग झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले असते अशा रुग्णांना स्वतंत्र ठेवले जाते. करोनाच्या संसर्गावर सध्या औषधे उपलब्ध नसल्याने त्यांना सर्दी, खोकला, ताप यावरील औषधे दिली जातात. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांपासून सर्वच कर्मचारी कक्षामध्ये जाताना विशेष काळजी घेतात. अलगीकरण आणि विलगीकरण हे पूर्णपणे वेगवेगळे वॉर्ड असतात. यातील रुग्णांचा एकमेकांशी संबंध येणार नाही, याची काळजी घेतली जाते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Difference between quarantine and isolation nck