जगभरातील मुस्लिम आजच्या दिवशी ईद अल अधा (ईद-उल-अजहा असेही म्हटले जाते) साजरी करण्यासाठी सज्ज आहेत. इस्लाममधील दोन मुख्य सणांपैकी आजची ईद हा एक महत्त्वाचा सणच आहे. दुसरा सण म्हणजे ईद अल किंवा उल फितर. ईद अल अधा ही इब्राहिमच्या अंतिम बलिदानाचे प्रतीक असल्याचे मानले जाते. हिब्रू ग्रंथांमध्ये इब्राहिमला अब्राहम म्हणून ओळखले जाते. अल्लाह/ देवावरचे प्रेम आणि भक्ती दर्शवण्यासाठी, नंतरचा सण म्हणजेच रमजान/रमादान, उपवासाच्या पवित्र महिन्याच्या शेवटी साजरा केला जातो.
आणखी वाचा : Ashadhi Wari 2023: पंढरपूर वारीची प्राचीन परंपरा आणि संलग्न आख्यायिका
दोन्ही सणांना ईद म्हणून ओळखले जाते. ईद या शब्दाचा अर्थ अर्माइक आणि अरबी भाषेत ‘मेजवानी’ असा आहे, पण या सणांचे वेगळेपण, ते साजरे करण्यामागच्या कारणमीमांसेत आहे. ईद उल फितर हा सण शव्वाल महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो, हा महिना ‘ब्रेकिंग फास्ट’ म्हणजेच उपवास सोडणे या साठी ओळखला जातो. तर ईद अल अधा हा सण धु अल-हिज्जा (म्हणजेच तीर्थयात्रेचा महिना) या महिन्याच्या १० व्या दिवशी साजरा केला जातो, याचा अर्थ ‘बलिदानाचा उत्सव’ असा होतो. भारतामध्ये या दोन्ही सणांना दोन वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. ईद अल फितरला ‘मीठा ईद’ तर ईद अल अधाला बकरीद किंवा बकरी ईद म्हटले जाते. ईद अल फितरला गोड पदार्थ तयार करून आपले कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळींमध्ये वाटले जातात. खास करून शेवयांची खीर हे या सणाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. तर ईद अल अधाला देवतांना पवित्र अर्पण मानल्या जाणार्या कोकरू किंवा बकरीचा बळी दिला जातो.
बकरी ईद संदर्भातही एक कथा प्रसिद्धच आहे. ही कथा अब्राहम याची आहे. हिब्रू बायबल, (Genesis 22) नुसार, देव अब्राहमला मोरिया पर्वतावर जावून आपल्या मुलाचा बळी देण्याचा आदेश देतो. अब्राहम पूर्णतः देवाला शरण गेला होता. तो देवाच्या आज्ञेचे पालन करण्यास सुरुवात करतो. मुलाचा बळी देणार तेव्हाच चमत्कार घडतो. मुलाच्या जागी कोकरू येते. या कथेचा संदर्भ कुराणमध्ये, संदर्भ सुरा ३७ मध्ये आला आहे. ज्यामध्ये ही कथा इब्राहिम आणि त्याचा मुलगा इस्माईलचा यांच्या संदर्भाने येते. म्हणूनच जगभरातील मुस्लिम अनुयायी अल्लाहप्रती त्यांची भक्ती दर्शविण्यासाठी हा विधी करून प्रतिकात्मक बलिदानाचे अनुसरण करतात.
मुहम्मद इलियास पटेल साहेब, त्यांच्या ‘द स्पिरिट ऑफ कुर्बानी’ या पुस्तकात म्हणतात, “आत्मत्यागाची ही भावना स्वतःमध्ये जागृत करण्यासाठी, आम्हाला ईद या सणानिमित्त प्राण्यांची कुर्बानी देऊन इब्राहिमच्या या ‘सुन्नत’चे पालन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. अधा… कुर्बानी करणार्या व्यक्तीला मोठमोठे बक्षीस देण्याचे वचन दिले आहे. एका हदीसमध्ये असे म्हटले आहे की जो कुर्बानी करतो त्याला जनावराच्या शरीरावरील प्रत्येक केस किंवा मेंढीच्या बाबतीत लोकरीच्या प्रत्येक तंतूसाठी बक्षीस दिले जाईल.” हदीसमध्ये हा विधी अधिक सविस्तरपणे सांगितला आहे, ज्यात असे सांगितले आहे की बकऱ्याचा बळी देणारी व्यक्ती/ कुटुंब बकऱ्याचे एक तृतीयांश मांस ठेवेल, तर दुसरा वाटा मित्र, कुटुंब आणि शेजाऱ्यांना दिला जाईल आणि बाकीचे वाटप गरीब आणि गरजू लोकांमध्ये केले जाईल. ही परंपरा रमजान आणि ईद अल फितर दरम्यान पाळल्या जाणार्या ‘जकात’च्या विधीसारखीच आहे, ज्यामध्ये मुस्लिमांना त्यांच्या वार्षिक बचतीच्या २.५ टक्के किंवा १/४० वा भाग गरजूंना देणे आवश्यक असते.
आणखी वाचा: विश्लेषण : शूर्पणखा स्वतंत्र स्त्री ते राक्षसी… खरेच कोण होती ती?
ईद अल अधाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सौदी अरेबियातील मक्का येथे हज यात्रेची समाप्ती देखील या दिवशी होते. हज ही मुस्लिम बांधवांची काबाच्या पवित्र स्थळापर्यंत केली जाणारी अनिवार्य धार्मिक यात्रा आहे. ही यात्रा पूर्ण केल्यावर सर्व पाप धुऊन जाते, असा विश्वास मुस्लिम धर्मीयांमध्ये आहे आणि त्यानंतर यात्रा पूर्ण करणाऱ्यास हाझी/हज्जी म्हणून संबोधले जाते.
दोन ईदमधील हे मुख्य फरक असले तरी, मुश्ताक खान यांनी सहपीडियावर स्पष्ट केल्याप्रमाणे या दोन प्रकारच्या ईद साजरा करण्याच्या पद्धतीतही फरक आहे. रमादान/रमझानच्या समाप्तीची सूचक असणारी ईद अल फितर ही ‘बडा ईद’ म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी कुटुंबे मोठ्या मेजवानीने उपवास सोडण्यासाठी एकत्र येतात म्हणून ईद अल फितर धूमधडाक्यात साजरी केली जाते. या सणाचा एक भाग म्हणजे नवीन कपडे परिधान करणे (जे ईद अल अधामध्ये फारसे होत नाही) आणि ‘तोंड गोड करण्याची’ प्रथा किंवा काहीतरी गोड (सामान्यत: शेवया ) वाटणे यासारख्या गोष्टी समाविष्ट आहेत. तर याउलट, मुस्लिमांनी ईद-उल-अधाच्या वेळी कोकरे/बकरीचा बलिदान रिकाम्या पोटी करावे, असा प्रघात आहे.