प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमधून एमबीएची पदवी मिळवणे म्हणजे हुकुमी यशाची खात्री असे मानले जाते. मात्र यावर्षी त्याला धक्का बसल्याचे दिसत आहे. अनेक आघाडीच्या विद्यापीठांतील या परिस्थितीची दखल विविध माध्यमे घेत आहेत. २०२२मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतलेल्या १० टक्के विद्यार्थ्यांना तीन महिन्यानंतरही नोकरी मिळाली नव्हती. आता २०२४मध्ये हे प्रमाण २३ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
एमबीएचे २०२४चे चित्र
हार्वर्ड विद्यापीठ जगातील सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक मानले जाते. येथून पदवी घेणे म्हणजे पुढील यशस्वी आणि सुखी आयुष्याची गुरुकिल्ली अशी खूणगाठ बांधून जगभरातील प्रतिभावान विद्यार्थी विद्यापीठातून एमबीए करण्यासाठी भरपूर मेहनत करतात. यंदा मात्र त्यांच्या कष्टाला तितकेसे फळ मिळालेले दिसत नाही. ‘फोर्ब्ज’सह काही प्रतिष्ठित नियतकालिकांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालांनुसार, गेल्या तीन वर्षांत विद्यार्थ्यांना मिळालेल्या नोकरीची तुलना केल्यास असे दिसते की, २०२२मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतलेल्या १० टक्के विद्यार्थ्यांना तीन महिन्यानंतरही नोकरी मिळाली नव्हती. आता २०२४मध्ये हे प्रमाण २३ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे बदलत्या परिस्थितीत खरेच ही पदवी तितकी महत्त्वाची राहिली आहे का असा प्रश्न विचारला जात आहे. दुसरे उदाहरण मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे (एमआयटी) आहे. ‘एमआयटी’च्या बिझनेस स्कूलमधून २०२२पर्यंतच्या दशकामध्ये एमबीएची पदवी घेतलेल्या ८२ टक्के विद्यार्थ्यांना लगेचच नोकऱ्या मिळाल्या होत्या. तर तीन महिन्यांच्या कालावधीपर्यंत ९३ टक्के विद्यार्थी नोकरी करत होते. मात्र, २०२४मध्ये लगेच नोकरी मिळालेले विद्यार्थ्यांचे प्रमाण ६२ टक्क्यांपर्यंत आणि तीन महिन्यांत नोकरीला लागलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ७७ टक्क्यांपर्यंत खालावल्याचे चित्र आहे.
हेही वाचा : महाकुंभ मेळ्यातील आयआयटी बाबा अभय सिंहची जुना आखाड्यातून हकालपट्टी; कारण काय?
बाजारात मंदी आहे का?
‘जेपी मॉर्गन’च्या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की अमेरिकेमध्ये डिसेंबर महिन्याच्या अखेरीस नोकऱ्यांचा बाजार तेजीत होता. गेल्या वर्षाअखेरीला अमेरिकेत तब्बल दोन लाख ५६ हजार नोकऱ्या उपलब्ध होत्या. म्हणजेच वरकरणी पाहता बाजारपेठेत मंदी नाही. तरीही एमबीएधारकांना पुरेशा नोकऱ्या का मिळत नाहीत असा प्रश्न उपस्थित होत आहे. अमेरिकेत बेरोजगारीचा दर कमी आहे, मात्र त्याच्या जोडीला अनेक क्षेत्रांमध्ये पुरेसे कुशल कर्मचारी मिळत नाहीत. अशा वेळेला परिस्थिती अधिकच गुंतागुंतीचे झालेली दिसते. दुसरीकडे, तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नोकरभरती थांबली आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम इतर कोणाहीपेक्षा एमबीए पदवीधारकांवर झाला आहे.
कंपन्यांच्या धोरणांमध्ये बदल?
अनेक कंपन्या विशेषतः कोविड काळानंतर आपल्या धोरणामध्ये बदल करत आहेत. त्यामध्ये रचनात्मक सुधारणा, कमी संख्येने कर्मचाऱ्यांना पसंती देणे आणि सरसकट व्यवसायाच्या ज्ञानापेक्षा विशिष्ट तांत्रिक ज्ञानावर किंवा कौशल्यावर भर देणे याला महत्त्व दिले जात आहेत. कोविड काळात स्वयंचलन, दुरून काम करणे आणि गिग-आधारित रोजगार प्रारूप अशा प्रकारे झपाट्याने बदल झाले. या बदलत्या धोरणामध्ये पारंपरिक एमबीए पदवीला अगदीच नाकारले गेलेले नाही, त्यांचे महत्त्व अजूनही कायम आहे. पण नवीन प्राधान्यक्रमांमध्ये त्यांना आघाडीचे स्थान मिळेल याची हमी उरलेली नाही.
हेही वाचा : बांगलादेशच्या संविधानातून ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द हटणार? नेमका हा वाद काय?
अमेरिकेतील बिझनेस स्कूल
हार्वर्ज बिझनेस स्कूलमध्ये एमबीए अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला तेव्हा, १९०८मध्ये त्यांची खिल्ली उडवण्यात आली होती. ‘व्यवसाय शिकवता येत नाही, तो मुळातच अंगी असावा लागतो’ अशी काहीशी धारणा तेव्हा होती. मात्र हळूहळू त्यामध्ये बदल होत गेला. इतका की १९४९मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए झालेले विद्यार्थी डॉलरमध्ये खेळत असल्याचे वर्णन ‘फॉर्च्यून’ मासिकामधून करण्यात आले होते. याच विद्यापीठातून १९८२मध्ये जेमी डायमन, जेफ्री इमेल्ट, सेथ क्लार्मान यांसारखे भविष्यात यशस्वी व्यावसायिक आणि गुंतवणूकदार झालेले विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडले होते. एस अँड पी ५०० इंडेक्समध्ये समाविष्ट कंपन्यांपैकी जवळपास निम्म्या कंपन्या एमबीए पदवीधारक चालवतात. हार्वर्डसारख्या विद्यापीठांसाठी ही अभिमानाची बाब आहे.
टेक कंपन्यांच्या उदयाचा फटका?
अल्फाबेट, ॲमेझॉन, ॲपल, मेटा आणि मायक्रोसॉफ्ट यासारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपन्या एमबीएधारकांना नोकरी देण्यात तुलनेने कमी स्वारस्य दाखवतात. २०१८पासून तुलना केल्यास असे दिसते की २०१८ ते २०२२ या चार वर्षांच्या कालावधीत या कंपन्यांनी शिकागो बूथ, कोलंबिया, एमआयटी स्लोन आणि न्यूयॉर्क स्टर्न या चार बड्या शैक्षणिक संस्थांमधून एमबीए केलेल्या जितक्या विद्यार्थ्यांना नोकरी दिली होती त्याच्या तुलनेत २०२४मध्ये हे प्रमाण निम्म्याने कमी झाले आहे.
हेही वाचा : जमिनीचे कायदेशीर अधिकार देणारी स्वामित्व योजना आहे तरी काय? याचा फायदा कोणाला होणार?
एमबीए विद्यार्थ्यांना दिला जाणारा सल्ला
नवीन पिढीतील विद्यार्थ्यांना पदवी न घेता आवडीचे कौशल्य विकसित करण्यात आणि त्यात कारकीर्द घडवण्यात रस आहे असे निरीक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञ नोंदवतात. तसेच नोकरी देणाऱ्या कंपन्यांचे बदललेले कल पाहता विद्यार्थ्यांनी कोणत्याही नोकरीमध्ये उपयुक्त ठरणारी ‘ट्रान्सफरेबल स्किल्स’ विकसित करावीत असा सल्ला दिला जातो. ‘ट्रान्सफरेबल स्किल्स’ म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेण्याचे कौशल्य, भावनिक बुद्ध्यांक आणि समस्या सोडवण्याची हातोटी अशा प्रकारची कौशल्ये. ही कौशल्ये अनेकदा तांत्रिक नैपुण्यालाही मागे टाकतात. त्याबरोबरच एआयचे वाढते महत्त्व विचारात घेऊन त्यामध्ये सातत्याने शिकण्याची तयारी हवी. समाज माध्यमांचा वापर कमी करून सामाजिक कौशल्य विकसित करण्यावर भर द्यावा, म्हणजेच केवळ समाज माध्यमावर संपर्कात न राहता प्रत्यक्ष भेटीगाठी घ्याव्यात त्यामधून मानवी कौशल्य विकसित होण्यात मदत होते असे या तज्ज्ञ सुचवतात.
nima.patil@expressindia.com