अनेक सेलिब्रिटींच्या हातात लक्झरी ब्रॅण्ड्सच्या बॅग पाहायला मिळतात. या बॅगच्या किमतीही कुणापासून लपलेल्या नाहीत. प्रत्येक बॅगची किंमत लाखांच्या घरात असते. त्यातलेच दोन नामांकित ब्रॅण्ड आहेत डियोर आणि अरमानी. आता या दोन लक्झरी ब्रॅण्डविषयीचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. हे दोन ‘मेड इन इटली’ लक्झरी ब्रॅण्ड कामगारांचे कथित शोषण करीत असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर न्यायालयीन चौकशीला सामोरे जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इटलीची फॅशन कॅपिटल असणार्‍या मिलान येथील सरकारी वकिलांनी केलेल्या चौकशीतून असे दिसून आले आहे की, डियोर व ज्योर्जिओ अरमानी या बड्या लक्झरी कंपन्या हजारो रुपयांमध्ये तयार होणार्‍या बॅगा लाखोंच्या किमतीत विकतात. मिलानचे वकील या वर्षी अनेक फॅशन ब्रॅण्डच्या पुरवठा साखळीची चौकशी करीत आहेत. त्यात एलव्हीएचएमची उपकंपनी असणार्‍या डियोर आणि ज्योर्जिओ अरमानी कंपनीचाही समावेश आहे. नक्की या चौकशीत काय खुलासे करण्यात आले आहेत? या ब्रॅण्डेड बॅगेची खरी किंमत काय? नेमका हा प्रकार काय? जाणून घेऊ.

हेही वाचा : करोनाच्या नव्या प्रकारांचा अमेरिका आणि ब्रिटनमध्ये धुमाकूळ; भारतातील सद्यपरिस्थिती काय?

लक्झरी बॅगची खरी किंमत

तपासात असे दिसून आले आहे की, एका छोट्या निर्मात्याला डियोरसाठी हॅण्डबॅग तयार करण्याचे ५३ युरो (४,७७९ रुपये) मिळतात. या किमतीत चामड्यासारख्या कच्च्या मालाच्या किमतीचा समावेश नसतो. हे बडे ब्रॅण्ड या वस्तू दुकानांमध्ये २,६०० युरो (२.४ लाख रुपये) मध्ये विकतात, असे वृत्त गेल्या महिन्यात रॉयटर्सने दिले. आधीच्या तपासात असेही आढळून आले आहे की, उप-कंत्राटदारांनी हॅण्डबॅग तयार करण्यासाठी कामगारांना १० तासांच्या कामासाठी प्रतितास दोन ते तीन युरो (१८० ते २७० रुपये) दिले. अरमानीच्या पुरवठादाराने या हॅण्डबॅग ९३ युरो (८,३८६ रुपये)मध्ये विकत घेतल्या आणि या हॅण्डबॅग अरमानीला २५० युरोमध्ये (२२,५४३ रुपये) विकण्यात आल्या, तर ग्राहकांना १,८०० युरो (१,६२,३११ रुपये)मध्ये विकल्या गेल्या.

कामगारांचे शोषण

डियोर आणि अरमानीसाठी हॅण्डबॅग्ज आणि चामड्याच्या वस्तूंचे उत्पादन करणारे इटलीमधील स्थानिक कारखाने कामगारांचे शोषण करीत असल्याचे आढळले आहे, असे वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलने मिलान येथील वकिलांकडून करण्यात आलेल्या तपासणीच्या आधारावर दिले आहे. कर्मचारी नियमबाह्य परिस्थितीत काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सरकारी वकिलांनी सांगितले की, हे बहुतांश कामगार चीनचे आहेत. रॉयटर्सच्या अहवालानुसार, कामगारांना अतिरिक्त तास कामावर ठेवण्यात येते. रात्रीपर्यंत आणि सुटीच्या काळातही त्यांच्याकडून काम करून घेतले जाते. वकिलांना आढळले की, काही कर्मचारी त्यांच्या कामाच्या ठिकाणी झोपले होते. त्यातील काही कामगार अवैधरीत्या स्थलांतर केले असल्याचे आढळून आले.

मार्च आणि एप्रिलमध्ये इटालियन पोलिसांनी केलेल्या तपासणीत असे दिसून आले की, कामगारांना अस्वच्छतेत काम करावे लागते; ज्यामुळे त्यांच्या आरोग्यासाठी चिंताजनक स्थिती निर्माण होऊ शकते, असे ३४ पृष्ठांच्या न्यायालयीन आदेशात म्हटले आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, कामगारांना मशीन ऑपरेट करण्यासाठी तयार करण्यात आले होते; परंतु उत्पादन वाढविण्यासाठी मशीनमधील सुरक्षा उपकरणे काढून टाकण्यात आली होती.

न्यायालयाच्या माहितीनुसार, अरमानीच्या उपकंपनीपैकी एक असलेल्या जीए ऑपरेशन्सने दोन उपकंत्राटदारांना नियुक्त केले; ज्यांनी इटलीमध्ये अनेक चिनी उपकंत्राटदारांची भरती केली. अहवालात असाही आरोप करण्यात आला आहे की, डियोरने वास्तविक कामाची परिस्थिती किंवा कंत्राटी कंपन्यांची तांत्रिक क्षमता तपासण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या नाहीत, असे वृत्त रॉयटर्सने दिले. डियोर आणि अरमानीचे उत्पादन युनिट एका वर्षासाठी न्यायिक प्रशासनाच्या अधीन आहे. मिलानच्या कोर्ट ऑफ जस्टिसने प्रस्तावित केले आहे की, लक्झरी कंपन्यांनी कामगार कायद्यांचा आदर करावा.

हेही वाचा : हृदयविकार रुग्णांसाठी भारताची मार्गदर्शक तत्त्वे कोणती?

बहुतांश लक्झरी वस्तूंचे उत्पादन इटलीत

कन्सल्टन्सी बेनच्या म्हणण्यानुसार, जागतिक लक्झरी वस्तूंच्या उत्पादनापैकी ५० ते ५५ टक्के उत्पादन इटलीमध्ये होते. इटलीच्या फिर्यादीने म्हटले आहे की, फॅशन जगतात कामगार नियमांचे उल्लंघन करणे ही सामान्य बाब आहे; ज्याचा उद्देश नफा वाढवणे आहे. मिलानच्या न्यायालयीन व्यवस्थेचे अध्यक्ष फॅबियो रोया यांनी ‘रॉयटर्स’ला सांगितले, “लोकांशी गैरवर्तन केले जात आहे, ही साहजिकच मुख्य समस्या आहे. आरोग्य, सुरक्षितता, कामाचा कालावधी, वेतन आदींसाठी कामगार कायदे लागू करणे आवश्यक आहे. परंतु, कायद्याचे पालन करणाऱ्या कंपन्यांना बाजारातून बाहेर ढकलणारी अयोग्य स्पर्धा ही आणखी एक मोठी समस्या आहे.” रोया पुढे म्हणाले, “हे केवळ एका कंपनीचे प्रकरण नसून, इतर अनेक कंपन्यांमध्ये कामगारांचे शोषण होत आहे. या पद्धतीमुळे केवळ कामगारांचेच नाही, तर कायद्याचे पालन करणार्‍या कंपन्याचेही नुकसान होत आहे.”

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dior armani luxury handbag exploited workers rac
Show comments