ट्वेन्टी-२० विश्वचषक, युरो आणि कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा यांच्या सांगतेनंतर आता सर्व क्रीडाप्रेमींना पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचे वेध लागले आहेत. खेळांच्या या उत्सवाला २६ जुलैपासून सुरुवात होणार असून यासाठीची तयारी अंतिम टप्प्यावर आली आहे. फ्रान्स आणि पर्यायाने राजधानी पॅरिसची ओळख असलेल्या आयफेल टॉवरच्या शेजारून वाहणारी सीन नदी यंदाच्या ऑलिम्पिकचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. ही नदी गेली १०० वर्षे वापरासाठी बंद ठेवण्यात आली होती. मात्र, बराच खर्च करून आता या नदीचे शुद्धीकरण करण्यात आले आहे. मात्र, मुळात ही नदी वापरासाठी इतकी वर्षे का बंद ठेवण्यात आली होती आणि तिचा यंदा ऑलिम्पिकसाठी कसा वापर केला जाणार याचा आढावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सीन नदी चर्चेचा विषय का ठरत आहे?

पॅरिस येथे १९०० साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये लांब पल्ल्याच्या जलतरण स्पर्धा, रोईंग आणि वॉटर पोलो या खेळांसाठी सीन नदीचा वापर करण्यात आला होता. मात्र, १९२३ सालापासून नागरिकांना, तसेच पर्यटकांना या नदीत जाण्यास बंदी घालण्यात आली होती. नदी प्रदूषित असल्याने त्यात गेल्यास आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची भीती होती. मात्र, २०२४ च्या ऑलिम्पिकचे यजमानपद मिळाल्यानंतर सीन नदी पुन्हा प्रदूषणमुक्त करण्याची मोहीम पॅरिस शहर, तसेच केंद्र सरकारकडून राबविण्यात आली. अखेर ही मोहीम यशस्वी झाली. सीन नदी आता प्रदूषणमुक्त झाली असून ऑलिम्पिकसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे दाखवण्यासाठी पॅरिसच्या महापौर ॲना हिडाल्गो स्वतः त्यात पोहल्या. त्यामुळे सीन नदी चर्चेचा विषय ठरू लागली.

हे ही वाचा… वाघांच्या हल्ल्यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात का होतात?

सीन नदी फ्रान्सच्या कोणत्या भागात आहे?

सीन ही उत्तर फ्रान्समध्ये वाहणारी नदी बरगंडी ते नॉर्मंडीपर्यंत ७७७ किमी पसरली आहे. या नदीच्या काठावर पॅरिस शहर वसलेले आहे. ही नदी अखेर नॉर्मंडी येथे इंग्लिश खाडीला जाऊन मिळते. सीनच्या तीरावर आयफेल टॉवर, लू आणि ओरसे संग्रहालये, नॉत्र दाम कॅथेड्रल अशा जगप्रसिद्ध इमारती आहेत.

या नदीच्या वापरावर बंदी का होती?

मानवी आणि औद्योगिक प्रदूषण, तसेच पॅरिस शहरातील सांडपाणी या नदीत सोडण्यात येत असल्याने सीन नदी नागरिक व पर्यटकांसाठी १९२३ सालापासून बंद ठेवण्यात आली होती. १९८८ मध्ये फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि तत्कालीन पॅरिसचे महापौर याक शिराक यांनी सीन नदीच्या शुद्धीकरणाचे वचन दिले होते. मात्र, त्याला अंतिम स्वरूप कधीच प्राप्त झाले नाही.

हे ही वाचा… पर्यटकांनो परत जा… बार्सिलोनाचे लोण इतर युरोपियन शहरांत? अतिपर्यटकांचा फटका? 

नदीच्या शुद्धीकरणासाठी कसे प्रयत्न झाले?

सीन नदीच्या शुद्धीकरणाची मोहीम २०१५ मध्ये राबविण्यात आली. ऑलिम्पिकच्या निमित्ताने या प्रक्रियेस गती मिळाली. पॅरिसने पावसाच्या कालावधीत वाहणारे पाणी साठवण्याच्या उद्देशाने एक विशाल भूमिगत जलसाठवण खोऱ्याची निर्मिती केली. मात्र, तेच जिवाणूंनी भरलेले पाणी अतिवृष्टीच्या काळात नदीत सोडण्यात येत असल्याने त्यात पोहणे आरोग्यासाठी धोकादायक ठरण्याची भीती होती. त्यामुळे सीन नदीतील पाण्याची शुद्धता वारंवार तपासली जात होती. अखेर या नदीतील पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणेच्या प्रयत्नांना यश आले. पॅरिसच्या महापौर हिडाल्गो आणि त्यांच्याआधी फ्रान्सच्या क्रीडामंत्री ॲमेली ऑडेआ-कॅस्टेरा यांनी त्यात पोहून सीन नदी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या नदीला प्रदूषणमुक्त करण्याच्या योजनेवर तब्बल १.५ अब्ज डॉलर्स खर्च करण्यात आला आहे. ही नदी नागरिकांसाठी २०२५ सालापासून खुली केली जाणार आहे.

ऑलिम्पिकमध्ये सीन नदीचा कसा वापर?

पॅरिस ऑलिम्पिकमधील ट्रायथलॉन आणि मॅरेथाॅन या जलतरणाच्या दोन स्पर्धांसाठी सीन नदीचा वापर केला जाणार आहे. तसेच ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच उद्घाटन सोहळा एखाद्या स्टेडियमऐवजी या नदीवर पार पडणार आहे. यामध्ये २०० हून अधिक देशांच्या पथकांना अर्मांडा बोटींमधून नेण्यात येणार आहे. या वेळी नदीच्या दोन्ही बाजूंस हजारो प्रेक्षकांना बसण्याची सोय असेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dirty seine river is ready for paris olympics 2024 why was banned for the last 100 years to use print exp asj