लोकसभा निवडणूक जाहीर होण्यास काही दिवसांचाच अवधी आहे. मात्र जागावाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच असून, माघार घेण्यास कोणीच तयार नाही. महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी महायुती यामध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) याखेरीज रिपाइं (आठवले गट) जनसुराज्य, सदाभाऊ खोत, विनायक मेटे यांचे पक्षही आहेत. तर महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना (उद्धव ठाकरे) तसेच डाव्या पक्षांचा प्रामुख्याने समावेश आहे.

विभागवार चित्र

राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघाचा विचार करता, विदर्भात १०, मराठवाडा ८, पश्चिम महाराष्ट्र – यात सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे व अहमदनगर हे जिल्हे येतात – १२ जागा आहेत. मुंबई शहरात सहा जागा असून, ठाणे, पालघर तसेच रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात ६ अशा मुंबई-कोकणात १२ जागा आहेत. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे व जळगावमध्ये ६ जागा येतात.

Demand money from company owner in name of MLA Pune news
आमदाराच्या नावाने कंपनी मालकाकडे पैशांची मागणी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
if want vote then Save rivers trees and hills
मत हवं? नद्या, झाडे, टेकड्या वाचवा…
special fund of 20 lakhs each to all departmental offices of Mumbai Municipal Corporation
सुविधांसाठी पालिकेचे पाच कोटी, पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांना प्रत्येकी २० लाखांचा विशेष निधी
ubt mla vaibhav naik face nilesh rane kudal in assembly constituency
लक्षवेधी लढत : कुडाळमध्ये राणेंच्या वर्चस्वाचा कस
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त

हेही वाचा >>>विश्लेषण: यंदाचा उन्हाळा किती तीव्र असणार?

विदर्भात तुलनेने वाद कमी

विदर्भात प्रामुख्याने भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना आहे. गेल्या वेळी भाजपला पाच तर शिवसेनेला तीन जागा मिळाल्या. शिवसेनेचे तिन्ही सदस्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. चंद्रपूरला काँग्रेस तर अमरावतीत अपक्ष नवनीत राणा विजयी झाल्या. यवतमाळ मतदारसंघ कुणाला मिळतो ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल. शिंदे गटातील या जागेवर भाजपने दावा सांगितला आहे. रामटेक, बुलडाणा शिंदे गटाकडे राहतील असे चित्र आहे. अमरावतीत भाजप नवनीत राणा यांचा पाठिंबा देणार काय, हा मुद्दा दिसतो. महाविकास आघाडीतही विदर्भातील जागांवर फार वाद नाही. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आघाडीत आल्यास अकोला मतदारसंघ त्यांना देण्यात सहमती आहे. शरद पवार गटाची फारशी ताकद विदर्भात नाही. त्यामुळे काँग्रेससाठी या विभागात जागा पदरात पडण्यात अडचण नाही. अर्थात रामटेक तसेच अमरावतीच्या जागेसाठी काँग्रेस व ठाकरे गटात स्पर्धा आहे.

पश्चिम महाराष्ट्रात तिढा

सर्वच पक्षांचे लक्ष पश्चिम महाराष्ट्रात आहे. एके काळी हा भाग राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. मात्र गेल्या पाच वर्षांत भाजपने इतर पक्षातून अनेक नेते फोडून ताकद वाढवली. या साखर पट्ट्यात गेल्या वेळी भाजप-शिवसेनेने मुसंडी मारली. एकूण १२ जागांपैकी भाजपने पाच, शिवसेनेने चार तर राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जागा जिंकल्या. राष्ट्रवादीचे तीनही सदस्य शरद पवार गटात आहेत. शिवसेनेचे चारही सदस्य शिंदे यांच्याबरोबर असून, येथे जागांसाठी रस्सीखेच आहे. कोल्हापूरवर भाजपने तर शिरूरवर शिंदे गटाच्या दाव्याने वाद निर्माण झाला. अर्थात शिरूरची जागा अजित पवार गट सोडणार नाही. सातारा मतदारसंघावरही तीनही पक्षांचा दावा आहे. मावळवरून चढाओढ असली तरी, शिंदे गटाकडे ही कायम राहण्याची अधिक शक्यता आहे. माढ्यावरूनही भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चढाओढ आहे. महाविकास आघाडीत कोल्हापूर व सांगलीवरून वाद होते. अर्थात कोल्हापूरमध्ये शाहू महाराज निवडणूक लढवतील हे स्पष्ट झाले. तर सांगलीत काँग्रेसऐवजी शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा >>>सनातन धर्मरक्षक म्हटल्यावरून वाद; कोण आहेत अय्या वैकुंदर?

मराठवाड्यातही पेच

मराठवाड्यातील आठही जागांवर सर्व पक्षांमध्ये जागा पदरात पाडून घेण्यासाठी संघर्ष आहे. महायुतीत भाजपचे चार, तर शिंदे गटाचा एक, ठाकरे गटाचे दोन तर एमआयएमचा एक खासदार आहे. पूर्वीचा औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघासाठी भाजप आग्रही आहे. याखेरीज परभणीची जागा तिन्ही पक्षांना हवी आहे. हिंगोली तसेच पूर्वीचा उस्मानाबाद म्हणजे आताचा धाराशिव मतदारसंघ भाजपला हवे आहेत. महाविकास आघाडीत तुलनेत मराठवाड्यात वाद कमी आहेत.

उत्तर महाराष्ट्रावर लक्ष

नाशिक मतदारसंघावर भाजपने दावा केला असला तरी तो शिंदे गटाकडे राहील अशी चिन्हे आहे. दिंडोरी अजित पवार गटाला हवा आहे. मात्र तेथे भाजपचे केंद्रीय मंत्री आहेत. विभागातील सहापैकी पाच भाजपचे तर नाशिकमध्ये शिंदे गटाचा खासदार आहे. भाजप आपले विद्यमान सदस्य असलेल्या जागा सोडण्याची शक्यता कमी आहे. धुळे मतदारसंघावरही मित्रपक्षांनी दावा केला होता. महाविकास आघाडीत धुळे, नंदुरबार काँग्रेसला तर नाशिक, जळगाव ठाकरे गटाला तर दिंडोरी व रावेर शरद पवार गटाकडे जागावाटपात राहण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा >>>बुद्धधातूचा भारतीय राजकारण आणि राज्यघटनेवर कसा प्रभाव पडला?

मुंबई, कोकणात काय?

मुंबईत भाजप सहा जागांपैकी चार जागांवर आग्रही आहे. पूर्वीच्या तीन जागांबरोबरच उत्तर-पश्चिम मुंबईवर भाजपने दावा सांगितला आहे. याखेरीज पूर्वी शिवसेनेच्या ताब्यातील रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजप लढवण्याची शक्यता आहे. तसेच पालघरची जागाही भाजप आपल्याकडे घेण्याची शक्यता आहे. ठाण्याची प्रतिष्ठेची जागा भाजप मागत आहे. तेथे सध्या ठाकरे गटाचा खासदार आहे. मात्र त्या अंतर्गत येणाऱ्या विधानसभेच्या सहा जागांपैकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येथून निवडून येतात. यामुळे ही जागा देणे कठीण दिसते. रायगडची जागाही तीनही पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. मात्र अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे येथील खासदार असून, तेच रिंगणात उतरतील अशी चिन्हे आहेत.

तिढा कसा सुटणार?

महायुतीचा निर्णय दिल्लीत होणार आहे. ९ मार्चला ही कोंडी फुटेल असे दिसते. महाविकास आघाडीतही ९ तारखेलाच जागावाटप जाहीर होणे अपेक्षित आहे. उद्धव ठाकरे गटाला २२, काँग्रेसला १८ तर शरद पवार गटाला ८ जागा मिळतील असे चित्र आहे. जर वंचित आघाडी यामध्ये सहभागी झाली तर शिवसेना चार जागा त्यांना सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच शरद पवार गट माढा तसेच हातकणंगलेची जागा अन्य मित्रपक्षांसाठी सोडू शकतो.

hrishikesh.deshpande@expressindian.com