विश्वातील सर्वोत्तम बुद्धिबळपटू अशी ख्याती असणारा मॅग्नस कार्लसन आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (फिडे) यांच्यात पुन्हा वाद निर्माण झाला आहे. पाच वेळच्या जगज्जेत्या कार्लसनची सहमालकी असणाऱ्या ‘फ्रीस्टाइल चेस प्लेयर्स क्लब’ अर्थात ‘एफसीपीसी’ने बुद्धिबळविश्वात दुफळी निर्माण केल्याचा आरोप ‘फिडे’कडून करण्यात आला आहे. तसेच ‘फ्रीस्टाइल चेस प्लेयर्स क्लब’शी जुळवून घेण्याची आपली तयारी आहे, पण त्यांनी त्यांच्या आगामी स्पर्धेला ‘जागतिक अजिंक्यपद’ म्हणण्यास आपला विरोध असल्याचे ‘फिडे’ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ‘फिडे’ आणि कार्लसन यांच्यात असलेला दुरावा आता अधिकच वाढण्याची चिन्हे आहेत.

नक्की प्रकरण काय?

‘फ्रीस्टाइल चेस प्लेयर्स क्लब’ने आपल्या खासगी स्पर्धेस ‘जागतिक अजिंक्यपद’ असे संबोधले आहे. याला ‘फिडे’ने तीव्र विरोध दर्शविला आहे. ‘‘फ्रीस्टाइल चेस प्लेयर्स क्लबचे त्यांची स्पर्धा जागतिक अजिंक्यपद म्हणून सादर करण्याचे प्रयत्न हे ‘फिडे’च्या सुस्थापित दर्जाच्या आणि चेस९६०/फ्रीस्टाइल बुद्धिबळासह सर्व संबंधित प्रकारांमध्ये जागतिक अजिंक्यपद विजेतेपदांवरील ‘फिडे’च्या अधिकाराच्या विरोधात आहेत,’’ असे ‘फिडे’ने आपल्या परिपत्रकात स्पष्ट केले. ‘‘फ्रीस्टाइल चेस प्लेयर्स क्लबने उचललेल्या पावलांमुळे बुद्धिबळविश्वात फूट पडणे अपरिहार्य आहे,’’ असेही ‘फिडे’ने नमूद केले आहे. त्याच प्रमाणे जागतिक अजिंक्यपद हे शब्द काढून न टाकल्यास कायदेशीर करण्याचा इशाराही ‘फिडे’ने दिला आहे.

ही स्पर्धा कधी आणि त्यात कोणाचा सहभाग?

फ्रीस्टाइल बुद्धिबळ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला पुढील महिन्यात (फेब्रुवारी २०२५) जर्मनीतील वाइसेनहॉस येथे सुरुवात होईल. त्यानंतर या स्पर्धेचे पुढील टप्पे पॅरिस, न्यूयॉर्क, दिल्ली आणि केप टाऊन येथे आयोजित केले जाणार आहेत. मॅग्सन कार्लसन, पाच वेळचा जगज्जेता आणि विद्यमान ‘फिडे’ उपाध्यक्ष विश्वनाथन आनंद, विद्यमान जगज्जेता दोम्माराजू गुकेश, आर. प्रज्ञानंद हे भारतीय, तसेच हिकारू नाकामुरा आणि फॅबियानो कारुआना यांच्यासह १० नामांकित बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी होत आहेत.

खेळाडूंवरही कारवाई?

‘जागतिक अजिंक्यपद’ हा शब्द वापरल्यास फ्रीस्टाइल चेस प्लेयर्स क्लब’विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा ‘फिडे’ने दिला आहे. तसेच ‘फिडे’ व्यतिरिक्त अन्य कोणत्याही बुद्धिबळ संघटनेने आयोजित केलेल्या ‘जागतिक अजिंक्यपद’ स्पर्धेत सहभाग नोंदवल्यास खेळाडूंवर कारवाई होणार असल्याचे ‘फिडे’ने स्पष्ट केले आहे. ‘‘२०२५-२०२६च्या फिडे जागतिक अजिंक्यपद लढतीच्या पात्रता स्पर्धांना आता सुरुवात झाली आहे. या स्पर्धांसाठी पात्र असलेल्या सर्व खेळाडूंना एका अतिरिक्त करारावर स्वाक्षरी करावी लागणार आहे. ‘फिडे’ची मान्यता नसलेल्या ‘जागतिक अजिंक्यपद’ स्पर्धेत (फ्रीस्टाइल दौरा वगळता) खेळल्यास खेळाडूंना फिडे जागतिक अजिंक्यपदाच्या सलग दोन पर्वांसाठी अपात्र ठरविले जाईल असे त्या करारात नमूद केलेले असेल,’’ असे ‘फिडे’ने म्हटले आहे. त्यामुळे माजी जगज्जेता आनंद, विद्यमान जगज्जेता गुकेश हेदेखील अचडणीत येण्याची शक्यता आहे.

‘फिडे’ आणि कार्लसन वादाचा नवा अध्याय…

‘फिडे’ आणि कार्लसन यांच्यात गेल्या काही वर्षांपासून तणावपूर्ण संबंध आहेत. जागतिक अजिंक्यपद लढतीच्या स्वरूपावरून कार्लसनने ‘फिडे’वर बरेचदा टीका केली आहे. आपला प्रतिस्पर्धी निवडण्याची जगज्जेत्याला मुभा असली पाहिजे असे त्याचे म्हणणे होते. मात्र, ‘फिडे’ने त्यासाठी स्पष्ट नकार दिल्यानंतर कार्लसनने जगज्जेतेपद बहाल केले होते. तसेच गेल्या वर्षीच्या अखेरीस जागतिक जलद आणि अतिजलद अजिंक्यपद स्पर्धेदरम्यानही कार्लसन वादात सापडला होता. जलद प्रकारातील स्पर्धेच्या वेळी त्याने ड्रेसकोडचे (पेहरावसंहिता) पालन केले नव्हते. मग अतिजलद प्रकाराच्या स्पर्धेत त्याने इयन नेपोम्नियाशी याच्यासह जेतेपद विभागून घेण्याचा निर्णय घेतल्यानेही वाद निर्माण झाला होता. आता कार्लसनची सहमालकी असणाऱ्या संघटनेच्या कृतीला ‘फिडे’ने विरोध दर्शविला आहे. त्यामुळे विश्वातील सर्वोत्तम बुद्धिबळपटू आणि बुद्धिबळ महासंघ यांच्यातील वाद अधिक वाढू शकेल.