प्रयागराजनंतर नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात साधू-महंतांमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली आहे. या कुंभमेळ्याचा उल्लेख नाशिक-त्र्यंबकेश्वर करायचा की त्र्यंबकेश्वर-नाशिक येथून सुरू झालेला संघर्ष आता परस्परांची महंताई, आखाडा परिषदेचे अस्तित्व यावर प्रश्नचिन्ह करण्यापर्यंत पोहोचला आहे.

ठिणगी कशी पडली?

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्याच्या पावणेदोन वर्ष आधीच साधू-महंतांमध्ये वादाचा श्रीगणेशा झाला. स्थळ उल्लेखाची क्रमवारी, नाशिकस्थित महंतांच्या महंताईवर आक्षेप त्याची नांदी ठरली. प्रशासकीय पातळीवर सिंहस्थाचा ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा’ असा उल्लेख केला जातो. त्यास अखिल भारतीय षडआखाडा परिषदेच्या त्र्यंबकेश्वर शाखेने आक्षेप घेतला. शासनाने ‘त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळा’ असा उल्लेख करावा, असे त्यांचे म्हणणे आहे. नाशिकस्थित महंत सुधीरदास हे महंतच नसल्याचा आरोप केला गेला. त्यास महंत सुधीरदास यांनीही मैदानात उतरून प्रत्युत्तर दिले. २००४ पासून आपण निर्वाणी आखाडा खालसाचे महंत आहोत. शैवपंथीय आखाड्यांचा आमच्या वैष्णवपंथीय आखाड्यांशी काही संबंध नाही. अखिल भारतीय आखाडा परिषद अस्तित्वात नाही. प्रयागराजमधील कुंभमेळ्यातही ती नव्हती. त्यामुळे त्र्यंबकेश्वरमधील बैठकीस आखाडा परिषदेचे नाव देणे चुकीचे असल्याचा दावा त्यांनी केला. 

शैव विरुद्ध वैष्णव

शैव-वैष्णवपंथीय साधू-महंतांमधील वादाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यास रक्तरंजित इतिहासही आहे. सन १७९० मध्ये शाही अमृत स्नानाच्या मानावरून शैव आणि वैष्णवपंथीयांत झालेल्या संघर्षात हजारो साधूंना प्राण गमवावे लागल्याचे सांगितले जाते. या वादावर तत्कालीन पेशव्यांनी निवाडा देऊन तोडगा काढला. त्यानुसार वैष्णवपंथीयांनी नाशिक येथे तर, शैवपंथीयांनी त्र्यंबकेश्वर येेथे स्नान करण्याचा निर्णय दिला. तेव्हापासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी कुंभमेळा भरण्यास सुरुवात झाली. 

मूळ स्थान कोणते?

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळा पूर्वी चक्रतीर्थ येथे भरत होता. घनघोर संघर्षाच्या निवाड्यानंतर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कुंभमेळा होऊ लागला. निवाड्याने दोन्ही पंथीय साधू-महंतांना स्वतंत्र ठिकाणी अमृत स्नानासाठी जागा मिळाली. परस्परांसमोर उभे ठाकणे टळले. मात्र, मूळ स्थानाचा वाद कायम राहिला. नाशिक येथे वैष्णवपंथीय तीन आखाडे तर, त्र्यंबकेश्वरमध्ये शैवपंथीय १० आखाडे आहेत. उभयतांकडून आपलेच मूळ स्थान असल्याचे ठासून सांगितले जाते. आपल्या दाव्याला बळकटी देण्यासाठी शैवपंथीय आखाडे वैष्णवपंथीयांसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये आणि वैष्णवपंथीय साधू-महंत शैवपंथीय आखाड्यांसाठी नाशिकमध्ये स्नानासाठी वेळ राखीव ठेवल्याचे सांगतात. मात्र दोन्ही बाजूंचे कोणीही परस्परांच्या स्थानी स्नानासाठी जात नाहीत. सध्याच्या वादालाही तशीच किनार आहे.

प्रशासनाची कसरत

शैव-वैष्णवपंथीय साधू-महंतांमधील वादात लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच कसरत होते. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये स्वतंत्र बैठका घेण्याच्या मागणीने त्याची सुरुवातही झाली आहे. कुंभमेळा नियोजनात नाशिकला झुकते माप मिळते, अशी त्र्यंबकेश्वरमधील आखाड्यांची भावना असते. यापूर्वी सिंहस्थात नियोजनाच्या एकत्रित बैठका नाशिकमध्ये झालेल्या आहेत. तरीदेखील त्र्यंबकेश्वरची बैठक त्र्यंबकेश्वरमध्ये आणि नाशिकची बैठक नाशिकमध्ये घेण्याचा आग्रह षडआखाडा परिषदेने धरला. त्यानुसार कुंभमेळ्याची जबाबदारी सांभाळणारे मंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासकीय यंत्रणेसह त्याची सुरुवातही केली. पुढील काळात स्वतंत्रपणे वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घ्याव्या लागल्यास यंत्रणेची दमछाक होईल.

विश्वासात घेणे महत्त्वाचे का ठरते?

कुंभमेळा नियोजनात साधू-महंतांना विश्वासात न घेतल्यास प्रशासकीय यंत्रणेला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. काही वेळा केलेल्या तयारीवर पाणी फेरले जाते. नाशिक शहरातील नवीन अमृत (शाही) मार्ग हे त्याचे उत्तम उदाहरण ठरते. २००४ मधील कुंभमेळ्यात अरुंद व उताराच्या जुन्या अमृत मार्गावर चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती. अशा दुर्घटना टाळण्यासाठी २०१५ च्या कुंभमेळ्यात महानगरपालिकेने नवीन प्रशस्त असा मार्ग तयार केला होता. मात्र, ऐन वेळी साधू-महंतांनी त्यावरून मिरवणूक नेण्यास नकार देत प्रशासनाची कोंडी केली होती. गतवेळी साधू-महतांचे रुसवे-फुगवे काढण्यात तत्कालीन कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनाही बरीच मेहनत घ्यावी लागली होती.