पालकमंत्री मुद्द्यावरून रायगड जिल्ह्यात महायुतीमधील वाद विकोपाला गेला आहे. शिवसेनेचे तिन्ही आमदार आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देण्यावरून आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांना एवढा टोकाचा विरोध का, त्यामागची कारणे कोणती, याचा आढावा…
वादाची सुरुवात कुठून झाली?
रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधील वाद हा नवीन नाही. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून या वादाला सुरवात झाली होती. २०१९ मधील निवडणुकीनंतर राज्यात युती तोडत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. आजवर ज्यांच्या विरोधात कायम शिवसेनेने लढा दिला अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांशी जुळवून घेण्याची वेळ पक्षावर आली. स्थानिक पातळीवर हा निर्णय पक्षाच्या नेत्यांच्या पचनी पडला नाही. दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने रायगड जिल्हा परिषदेत शेकाप सोबत असलेली आघाडी तोडली नाही. शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले आणि शेकापसोबत सत्ता उपभोगली. यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती.
वाद विकोपाला कसे गेले?
२०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच निवडून आलेल्या आदिती तटकरे यांची राज्यमंत्रीपदावर वर्णी लागली. त्याच वेळी तीन वेळा निवडून येऊनही भरत गोगावले यांना मंत्रीपदात सामावून घेतले गेले नाही. त्यामुळे शिवसेनेच्या जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे जिल्ह्यात शिवसेनेचाच पालकमंत्री द्या, आदिती तटकरे नको अशी विनंती केली. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्याकडे दुर्लक्ष करत आदिती तटकरे यांनाच पालकमंत्री पद दिले. त्यामुळे शिवसैनिकांची अस्वस्थता अधिकच वाढली. जिल्हा परिषदेत शेकापशी राष्ट्रवादीशी आघाडी असल्याने सहाजिकच जिल्हा नियोजन समितीत दोन्ही पक्षांचे वर्चस्व कायम राहिले. दुसरीकडे सत्तेत असून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा कोंडमारा होत राहिला. आदिती तटकरे शिवसेनेला जिल्ह्याचा विकास निधी देत नाहीत, शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात ढवळाढवळ करतात, आमदारांच्या मतदारसंघातील कामाचे श्रेय घेतात असा आरोप सेनेच्या आमदारांनी केला. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्याची दखल घेतली नाही. याच दरम्यान माणगाव येथे शिवसेनेचा एक मेळावा पार पडला. यावेळी आदित्य ठाकरे उपस्थित होते. भरत गोगावले यांनी कार्यकर्त्यांची व्यथा आदित्य ठाकरे यांच्यासमोर मांडली. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. कार्यकर्त्यांना संयम राखण्याचा सल्ला दिला. मुंबईला परतत जाताना तटकरेंच्या घरी जाऊन पाहूणचार घेतला. हे फोटो नंतर राष्ट्रवादीकडून व्हायरल केले गेले. यानंतर मात्र शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी आपल्या पक्षाविरोधात बंडाचे निशाण फडकवले. जिल्ह्यात शिवसेनेच्या फुटीला हाच वाद कारणीभूत ठरला. जिल्ह्यातील तिन्ही आमदार बहुसंख्य पदाधिकाऱ्यांसह शिंदे गटात दाखल झाले.
महायुतीमधील वादाची कारणे कोणती?
२०१९च्या उठावानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप युतीचे सरकार स्थापन झाले. पण भरत गोगावले यांना मंत्रीपद मिळू शकले नाही. उलट रायगडचे पालकमंत्रीपद उदय सामंत यांच्याकडे सोपवले गेले. सर्व काही सुरळीत आहे असे वाटत असतानाच महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एन्ट्री झाली. आणि पुन्हा एकदा आदिती तटकरे यांचा ,समावेश एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये झाला. पण शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद मिळू दिले नाही. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीमधील प्रवेशामुळे भरत गोगावले यांना एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमडळात स्थान मिळू शकले नाही याचा राग शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये होता.
विधानसभा निवडणुकीत काय झाले?
लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने सुनील तटकरे यांना जुने वाद बाजूला ठेवून मदत केली. त्यामुळे तटकरे रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. याची परतफेड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस करेल अशी अपेक्षा शिवसेना शिंदे गटाला होती. मात्र तसे झाले नाही. आधी शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांच्या कर्जतच्या विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सांगितला. जागावाटपात ही जागा शिवसेनेकडे कायम राहिल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे यांनी बंडखोरी केली. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक लढवली. अटीतटीच्या लढतीत थोरवे निवडून आले. महाड विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे महाड विधानसभा अध्यक्ष मतदार बाबू खानविलकर हे शिवसेना ठाकरे गटात दाखल झाले. त्यामुळे शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता होती. अलिबाग विधान मतदारसंघातही महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या विभागात अपेक्षित मदत झाली नसल्याचा आरोप निवडणुकीनंतर केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांचे संबध पुन्हा एकदा ताणले गेले. आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये आदिती तटकरे आणि भरत गोगावले दोघांनाही कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे तीन, भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार आहे. त्यामुळे पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावे अशी सेना आमदारांची मागणी आहे. या मागणीला भाजप आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा भरत गोगावले यांनी केला आहे. मात्र तरीही आदिती यांची पालकमंत्रीपदावर वर्णी लागल्याने दोन्ही पक्षांतील वाद विकोपाला गेले आहेत. या वादानंतर आदिती तटकरे यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली असली तरी आगामी काळात हे वाद संपण्याची चिन्ह दिसून येत नाहीत.
harshad.kashalkar@expressindia.com