What is happy bhoot Chaturdashi? भारत हा विविध प्रथा- परंपरांनी नटलेला आहे. प्रभू रामाचे अयोध्येत परतणे आणि अंधारावर प्रकाशाचा विजय यासारखे प्रसंग दिवाळी का साजरी केली जाते, यासाठी प्रामुख्याने सांगितले जातात. परंतु भारताच्या विविध भागात दिवाळी साजरी करण्यासंबंधी वेगवेगळ्या कथा, परंपरा आढळतात. काही ठिकाणी आदल्या दिवशीच दिवाळी साजरी केली वाजते. काही ठिकाणी दिवाळीचा संबंध आत्म्यांशी, पूर्वजांशी, नरकासुराशी जोडण्यात आला आहे. त्यामुळेच चतुर्दशीला भूत किंवा नरक चतुर्दशी असेही म्हणतात. दिवाळीच्या देशभरातील प्रथा- परंपरांचा हा आढावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोव्यातील नरकासूर पुतळा दहन-Naraka Chaturdashi

गोव्यात असुर राजा नरकासुर याच्या पुतळ्याचे राज्यभर दहन केले जाते. ‘नरकासुर वध’ हे भगवान श्रीकृष्णाने नरकासुराच्या केलेल्य पराभवाचे प्रतीक आहे. कोकणात कारेटे फोडून नरकासुराच्या वधाची ही प्रथा जपली जाते. इतिहासकार संजीव व्ही. सरदेसाई सांगतात, “पुराण कथेनुसार, सत्तेच्या नशेत असलेल्या नरकासुराने खूप विनाश केला. त्याने भगवान इंद्राच्या आईची कर्णफुले लुटली, १६ हजार स्त्रियांचे अपहरण केले, या प्रसंगामुळे सर्वत्र अंधार पसरला असे मानले जाते. नंतर नरकासुराचा कृष्णाशी झालेल्या युद्धात वध झाला. “नरकासुराचा वध पहाटेच्या सुमारास झाला असावा. त्यामुळे नरकासुराचे पुतळे फटाके भरून पहाटेच्या वेळी जाळले जातात. हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. गोवा पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झाल्यानंतर या परंपरेला अधिक महत्त्व प्राप्त झाले. गोवा मुक्तीपूर्वी, पोर्तुगीजांनी अनेक प्रकारचे स्थानिक विधी दडपले, ” असेही सरदेसाई नमूद करतात. सणाआधीच्या दिवसांत, गोव्यातील खेड्यापाड्यातील युवक निधी गोळा करतात आणि राक्षसाचे महाकाय पुतळे तयार करतात. आकर्षक रोख पारितोषिकांसह अनेक स्पर्धांमध्ये पुतळे प्रदर्शित केले जातात. सरदेसाई सांगतात, “कालांतराने, स्थानिक राजकारण्यांनी या परंपरेला प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या निधीपुरवठ्यामुळे स्पर्धा मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या जातात,” सरदेसाई म्हणाले.

नरकासुरवध (विकिपीडिया)

अधिक वाचा: Diwali 2023: दिवाळीत फटाके वाजविणे ही खरंच भारतीय प्राचीन परंपरा आहे का?

पश्चिम बंगाल- Bhoot Chaturdashi

दिवाळीच्या आदल्या दिवशी (छोटी दिवाळी) पश्चिम बंगालमध्ये साजरी केली जाते. या दिवाळीलाच ‘भूत चतुर्दशी’ असेही म्हणतात, जी ‘नरक चतुर्दशी’ किंवा ‘काली चौदश’ सारखीच असते. कार्तिक महिन्यातील कृष्ण पंधरवड्यातील हा १४ वा दिवस आहे. बंगालमध्ये यावर्षी ३० ऑक्टोबर रोजी भूत चतुर्दशी साजरी करण्यात येत आहे. या रात्री मृतांचे आत्मे आपल्या प्रियजनांना भेटण्यासाठी पृथ्वीवर येतात असे मानले जाते. १४ पिढ्यांचे पूर्वज आपल्या जिवंत नातेवाईकांना भेट देतात, हे पूर्वज त्यांच्या कुटुंबाला मार्गदर्शन करण्यासाठी येतात, या दिवशी तेलाचे १४ दिवे घरात वेगवेगळ्या ठिकाणी लावले जातात. १४ दिवे (‘छोड्डो प्रदीप’) पूर्वजांचे स्वागत करण्यासाठी आणि दुष्ट आत्म्यांचा पाठलाग करण्याच्या हेतूने लावले जातात. या प्रसंगी १४ वेगवेगळ्या प्रकारच्या ‘साग’ किंवा पालेभाज्या (‘छोडडो शाक’) खाणे हा देखील एक विधी आहे.

काही ठिकाणी, ‘अघोरी’, तांत्रिक ‘कापालिक’ परंपरेतील शैव संन्यासी, भूत चतुर्दशीला ‘पूजा’ आणि तांत्रिक विधी करण्यासाठी एकत्र येतात. अघोरी पंथीय घाट किंवा स्मशानभूमीत हे विधी करतात आणि बर्‍याचदा त्यांच्या विधीत जळलेल्या मृतदेहांची हाडे वापरतात.

गुजरातचा ककलत काधवो

काली चौदशच्या (चतुर्दशी) संध्याकाळी, म्हणजेच दिवाळीच्या आदल्या दिवशी (उत्तर भारतात छोटी दिवाळी), गुजरातमध्ये काही ठिकाणी ‘ककलत काधवो’ नावाचा विधी केला जातो.‘ककलत काधवो’ म्हणजे कोलाहल आणि त्रासांपासून मुक्त होणे.

विधीच्या केंद्रस्थानी अखंड चण्यापासून किंवा बेसनपासून तयार केलेला व तळलेला ‘वडा’ हा घरगुती पदार्थ असतो. संध्याकाळच्या वेळी स्त्रिया गावाच्या चौकात किंवा शहरांमध्ये, त्यांच्या घराच्या कोपऱ्यात पाणी ओतून एक वर्तुळ काढतात आणि मध्यभागी ‘वडे’ ठेवतात. हा वडा ‘प्रेतमासाला’ (अनैसर्गिक मृत्यू झालेल्या आत्म्यांना) अर्पण करतात. विधी करून स्त्रिया घराकडे निघाल्या की, त्या मागे वळून पाहत नाहीत – स्त्रियांनी मागे वळून पाहिल्यास आत्मे कधीच परत जात नाहीत,अशी एक धारणा आहे.

खेड्यांमध्ये, ‘भुव’ (समाजाचे धार्मिक प्रमुख) कालीचौदशच्या संध्याकाळी गावातील स्मशानभूमीत तलवार, काळा हरभरा आणि इतर काही गोष्टी घेऊन जातात आणि आत्मांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विधी करतात. असेही मानले जाते की कालीचौदशला तेल प्रज्वलित केल्याने जीवनातील ‘ककलत’ (भांडण, कोलाहल, नाराजी, घरगुती तक्रारी इ.) कमी होतो.

अधिक वाचा: ‘भटक्या कुत्र्यांमुळे मुंबईत पेटली दंगल, इंग्रजांची झाली होती उपासमार’! 

आलास काधवी

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या गुजराती नववर्षाच्या दिवशी गुजराती कुटुंबे पारंपारिकपणे ‘आलास काधवी’ करतात, ज्यामध्ये स्त्रिया घर स्वच्छ करतात आणि घरातील कचरा गावाबाहेर टाकण्यासाठी जुन्या मातीच्या भांड्यात वाहून नेतात. यात मातीच्या भांड्याला काठीने घासलेही जाते. हे देवी लक्ष्मीच्या प्रवेशाचे प्रतीक मानले जाते. नवीन वर्ष सुरू झाल्यावर दाणेदार मीठ असलेल्या ‘साबरा’ खरेदी करणे शुभ मानले जाते. विक्रेते पहाटे लोकांच्या घरी येतात आणि ‘साबरा’ची पाकिटे देतात. लोक विक्रेत्यांना त्यांच्या इच्छेनुसार आणि कुवतीनुसार ‘दक्षिणा’ (ऐच्छिक मानधन) देतात.

(विकिपीडिया)

चोपडा पूजन, लाभ पाचम (पंचम)

दिवाळीच्या दिवशी, गुजराती व्यावसायिक चोपडा पूजन करतात, आधीच्या आर्थिक वर्षाची चोपडा- हिशोब वही बंद करून नवीन चोपड्याची पूजा करतात. शुभ मुहूर्तावर पारंपारिक लेखापुस्तकांची पूजा केली जाते. दिवाळीनंतरच्या दिवसांत ‘लाभ पाचम’ म्हणून नवीन वर्षाच्या पाचव्या दिवसापर्यंत कोणताही व्यवहार केला जात नाही. नवीन वर्षाच्या पाचव्या दिवशी, गुजराती व्यापारी चोपड्यावर सिंदूर लावून ‘साथियो’ (स्वस्तिक) रेखाटून नवीन खाते पुस्तके उघडतात (सध्या ते संगणकाच्या स्क्रीनवरही केले जाते), लक्ष्मी आणि भगवान गणेशाला प्रार्थना केली जाते. हा दिवस नवीन वर्षाचा कामकाजाचा पहिला दिवस मानला जातो. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ‘लाभ पाचम’ देखील शुभ मानले जाते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali 2023 why is diwali called bhoot chaturdashi svs