Why Is Soan Papdi So Famous During Diwali: भारतीयांचा खवय्या स्वभाव जगभरात प्रसिद्ध आहे. जिथे भारतीय व्यक्ती तिथे सर्वात चविष्ट मेजवानी असं समीकरण आहे म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. भारतात प्रत्येक सणासाठी समर्पित असेही प्रसिद्ध पदार्थ आहेत. म्हणजे बघा ना, गणपतीला मोदक, नवरात्रीत जलेबी- फाफडा, होळीला पुरणपोळी, गुजिया तसं दिवाळी म्हंटलं की डोळ्यासमोर काय येतं… एकदम बरोबर सोनपापडी…!
सोशल मीडियावर आतापर्यंत तुम्ही सोनपापडीवरून अनेक मजेशीर मीम्स पाहिले असतील, शेअरही केले असतील. दिवाळीत प्रत्येक घरात आजही सोनपापडीशिवाय सेलिब्रेशन पूर्ण होतच नाही. दिवाळीची रंगत वाढवणाऱ्या रांगोळी, कंदील, फटाके या सगळ्या यादीत सोनपापडीचं स्थान अढळ आहे. कितीही मस्करी केली तरी दिवाळीत घरी सोनपापडी आणली नाही तर सण वाटतच नाही, हो ना? पण नेमकी ही सोनपापडी एवढी प्रसिद्ध का आहे? भारतीय मिठायांचे एवढे प्रकार असताना दिवाळीत सोनपापडीला एवढं महत्त्व का आहे? चला तर आज यावर सविस्तर उत्तर जाणून घेऊया..
सोनपापडीची सुरुवात…
सोनपापडीचा इतिहास पाहिल्यास, सोन पापडीला ‘सान पापरी’, ‘शोंपापरी’, ‘सोहन पापडी’, ‘शोन पापडी’ आणि ‘पाटीसा’ म्हणूनही ओळखले जाते. ‘सोहन’ या शब्द मूळ फारसी आहे त्याचा अपभ्रंश होत त्याला सोनपापडी असं नाव देण्यात आलं.
पुरातत्वशास्त्रज्ञ आणि पाककृती मानववंशशास्त्रज्ञ कुरुश एफ दलाल यांनी, सोनपापडीला “व्हर्सटाईल” डिश म्हंटले आहे. “सोन पापडी हा पदार्थ मूळ पर्शियन आहे. ‘सोहन पश्माकी’ या शब्दापासून सोनपापडी हे नाव प्रसिद्ध झाले. चौकोनी आकाराचे, कुरकुरीत आणि अनेक थर असणारी या पदार्थाची रचना असते. यामध्ये मुख्य सामग्री बेसन (चणाडाळीचे पीठ) असल्याने सोनपापडी पटकन खराब होत नाही.
सोन पापडीची लोकप्रियता कशी वाढली?
कुरुश दलाल यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, भारतात दुधापासून बनलेली मिठाई प्रसिद्ध आहे मात्र हे पदार्थ लवकर खराब होतात. मुख्यतः सणाच्या वेळी घरात इतरही पदार्थ बनवलेले असताना सर्व मिठाई वैधता संपण्याआधी खाणे शक्य होत नाही. सोनपापडीच्या बाबत मात्र अशी समस्या उद्भवत नाही. सोनपापडी अनेक दिवस टिकते त्यामुळे सणांनंतरही आपण खाऊ शकता.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मिठाईची किंमत, दुधापासून बनलेली मिठाई किमतीने थोडी महाग असते. खरंतर सोनपापडीतही दूध असलं तरी अन्य महाग सामग्रीची गरज पडत नाही. सोनपापडीच्या चवीचा मुख्य घटक वेलची असते. वेलची महाग असूनही तिचा वापर कमी केला तरी चव येते. त्यामुळे स्वस्त व मस्त असा सोनपापडीचा पर्याय प्रसिद्ध झाला आहे.
खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक शैलश्री शंकर सांगतात की मिठाई टिकण्यासाठी यात किती साखर वापरली आहे हे महत्त्वाचे असते. चिंचेप्रमाणेच साखरेतही अशी सत्व असतात ज्यामुळे पदार्थ अधिक काळ टिकू शकतात. मिठाईमध्ये मुख्यतः साखर व तूप यांचे मिश्रण असते जे चवीचं एक सर्वोत्तम समीकरण आहे. या पाकात थोडं बेसन व आवडीनुसार सुका मेवा टाकून आपण हवी तशी सोनपापडी बनवू शकता. सोनपापडीच्या सजावटीसाठीही फार मेहनत घ्यावी लागत नाही उलट चार काजू बदाम कापून तुम्ही या पदार्थाला सजवू शकता. यंदाच्या दिवाळीत तुम्ही घरीही हा पदार्थ बनवून पाहू शकता.