एका जमैकन लेखकाचे प्रसिद्ध वाक्य आहे, “थकलेले पाय नेहमीच रस्ता खूप दूर असल्याचे सांगतात.” याचा अर्थ असा की, जी व्यक्ती चालण्यासाठी तयार नसते, ती मार्ग खूप लांब असल्याची तक्रार करते. आपल्या सर्वांना पोषक आहार हवा आहे, व्यायामही करायचा आहे आणि एक निरोगी आयुष्य जगायचे आहे. पण हे सर्व थकवणारे आहे. मग थकवा हे कारण बनते आणि आपल्याला निरोगी जीवनशैलीपासून दूर नेते. एका ब्रिटिश अभ्यासानुसार असे लक्षात आले की, थकवा आणि प्रेरणेचा अभाव ही दोन कारणे निरोगी जीवनशैली आचरणात आणण्यात मोठा अडथळा बनतात. या अभ्यासात कोणती तथ्ये समोर आली आहेत, त्यातून आपण काय बोध घ्यायचा, यावर टाकलेली एक नजर.
निरोगी राहताना खूप थकवा आलाय
वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंड या संस्थेच्या वतीने YouGov या संस्थेने २,०८६ लोकांचा ऑनलाईन सर्व्हे केला. याचे निकाल बुधवारी प्रकाशित करण्यात आले. या सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या लोकांना त्यांच्या शारीरिक हालचाली आणि ते घेत असलेला पोषक आहार याबाबत प्रश्न विचारण्यात आले. सर्व्हेत सहभागी झालेल्या ३८ टक्के लोकांनी सांगितले की, व्यायाम आणि चांगला आहार घेण्यासाठी त्यांच्याकडे प्रेरणाच नव्हती. तर ३५ टक्के लोकांनी सांगितले की, खूप थकल्यामुळे त्यांना या गोष्टी करता आल्या नाहीत. महिला आणि पुरुष अशी वर्गवारी करून आकडेवारीचे विश्लेषण केले असता. ४० टक्के महिलांनी थकवा येत असल्याचे कारण दिले, तर हेच कारण देणाऱ्या पुरुषांची संख्या २९ टक्के एवढी होती.
लिंगआधारित वर्गवारी करत असताना त्यामध्ये वयानुसारही माहिती गोळा केली. जवळपास ५० टक्के तरुणांनी (२५ ते ३४ वयोगट) थकवा येत असल्याचे कारण पुढे केले. तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये (५५ वर्षे आणि त्याहून अधिकचे वय) हा आकडा २३ टक्के होता. या सर्व्हेमधील पोलनुसार असे लक्षात आले की, वेळेच्या कमतरतेमुळे पोषक आहार घेण्यापासून अनेक लोक वंचित राहिले आहेत. तर महागड्या जिममुळे त्यांनी व्यायामापासून चार हात लांब राहण्याचा पर्याय स्वीकारला.
आधुनिक जीवनशैलीचा परिणाम
वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंडचे आरोग्य माहिती अधिकारी मॅट लॅम्बर्ट म्हणाले, लोकांचे दैनंदिन वेळापत्रक अतिशय व्यस्त झाले आहे. आम्हाला माहितीये की, प्रचंड थकवा आल्यानंतर लोकांना जेवण बनविणे किंवा व्यायामशाळेत जाणे यांसारख्या गोष्टी कठीण वाटू लागतात. तसेच असे करण्यासाठी त्यांच्याकडे प्रेरणाही नसते. पण निरोगी जीवनशैलीकडे टाकलेले एक छोटेसे पाऊलदेखील दबाव न घेता आपल्या आयुष्यात सुधार घडवू शकते. लोकांनी निरोगी जीवनशैली स्वीकारणे महत्त्वाचे आहे, कारण दुसऱ्या बाजूला चुकीच्या जीवनशैली किंवा आधुनिक समाजामध्ये स्मृतिभ्रंश, स्ट्रोक, मधुमेह यांसारखे आजार मूळ धरत आहेत.
अमेरिकेच्या डिसिस कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन केंद्राच्या माहितीनुसार, अमेरिकेतील एकतृतीयांश लोकांना पुरेशी झोप मिळत नाही. त्यांचे दैनंदिन वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. तसेच तणावाची पातळीदेखील बरीच वाढली आहे.
तज्ज्ञ सांगतात की, हे फक्त थकव्यामुळे होते असे नाही. शारीरिक आळस हा नैसर्गिक आणि सामान्य आहे, अशी माहिती डॅनिअल लिबरमन यांनी २०१५ साली केलेल्या संशोधनातून समोर आली होती. डॅनिअल लिबरमन हार्वर्ड विद्यापीठातील मानवी उत्क्रांती जीवशास्त्र या विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांच्या मते, आपले पूर्वज जगण्यासाठी संघर्ष करत होते, त्यामुळे इतर वेळी त्यांना आरामाची गरज वाटत असे. यातून ते स्वतःच्या शक्तीचा संचय करत असत.
आरोग्यदायी जीवनशैलीचे लाभ
वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंड आणि यूके कॅन्सर रिसर्च यांच्या माहितीनुसार, आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारल्यामुळे कॅन्सरसारखे आजार दूर ठेवण्याचे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत जाते. शारीरिक हालचालीचे प्रमाण वाढवून आपण ऑक्सिजनचे अभिसरण वाढवू शकतो. ज्यामुळे शरीरातील मायटोकॉन्ड्रिया नामक पेशींचा विकास होतो आणि आपल्या शारीरिक ऊर्जेमध्ये वाढ होते.
हे ही वाचा >> निरोगी राहणे एवढे पण अवघड नसते! ‘या’ ५ सोप्या सवयी लावा, स्वत:ला नेहमी सक्रिय ठेवा
हार्वर्ड आरोग्य संशोधकांच्या माहितीनुसार मायटोकॉन्ड्रिया या ऊर्जादायी पेशी म्हणून ओळखल्या जातात. शरीरातील ग्लुकोज, अन्न आणि श्वासाद्वारे घेतलेल्या ऑक्सिजनच्या आधारे मायटोकॉन्ड्रिया पेशी ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य करतात. जर या तीनही गोष्टी शरीरात मुबलक प्रमाणात असतील तर तेवढ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होत राहते. तसेच जर न चुकता रोज व्यायाम केला जात असेल तर त्याचा फायदा चांगली झोप मिळण्यासाठीही होतो.
‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने हार्वर्ड कंट्री जनरल हॉस्पिटलमधील जोन्स हॉपकिन्स सेंटर फॉर स्लिप विभागाच्या न्यूरॉलॉजी प्राध्यापक चार्लेन गमाल्डो यांच्याशी याबाबत बातचीत केली. चार्लेन म्हणाल्या की, जर नियमित व्यायाम केला जात असेल तर झोप लवकर लागणे आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यामध्ये निश्चितच चांगले परिणाम दिसून येतात आणि याचे भक्कम पुरावे आमच्याकडे आहेत.
निरोगी आहारदेखील तितकाच महत्त्वाचा
निरोगी आतडे झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करते. फळे, भाज्या आणि शेंगा किंवा द्विदल धान्यांमुळे आतड्याचे आरोग्य सुधारत असते. आणखी काही संशोधनानुसार निरोगी आतडे हेदेखील प्रेरणेवर प्रभाव टाकू शकते.
आठ आठवड्यांची निरोगी जीवन योजना
संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करूनही काही लोकांचा संघर्ष संपत नाही. त्यासाठी वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंडने आठ आठवड्यांची निरोगी जीवन योजना तयार केली आहे. या योजनेमुळे लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात चांगल्या सवयी लावून घेता येऊ शकतात. निरोगी पोषक आहार घेणे आणि नियमित व्यायाम करणे या दोनच गोष्टींमुळे कॅन्सरसारख्या आजाराला दूर ठेवता येऊ शकते. वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंडने ‘बेटर हेल्थ – एव्हरी माइंड मॅटर्स’ हे अभियान नुकतेच लाँच केले आहे. तसेच डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड सोशल केअर विभागातर्फे लोकांना शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी उद्युक्त केले जात आहे. त्यासाठी Active 10 आणि Couch to 5K अशी मोफत ॲप्स लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यांचा वापर करून लोक दैनंदिन व्यायामाचे प्रमाण वाढवत नेऊ शकतात.