राजेंद्र येवलेकर
करोनाची साथ अजून भारतामध्ये सामाजिक संक्रमणात गेलेली नाही पण तो धोका कायम आहे. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त चाचण्या करायला पाहिजेत अशी सूचना पुढे आली ती योग्यच होती पण या चाचण्या करायला लागणारा वेळ व पैसा हे पाहता त्यातून मार्ग काढणे गरजेचे होते त्यातून साखळी चाचण्यांची पद्धत पुढे आली. या पद्धतीने सामाजिक संक्रमण कळते शिवाय ज्यांना करोनाची लागण आहे पण लक्षणे नाहीत अशांचाही शोध घेता येतो. सोमवारी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने या साखळी चाचणी पद्धतीला मान्यता दिली आहे. व्यक्तीची चाचणी ज्या पीसीआर प्रक्रियेने केली जाते तीच यात वापरली जाते. कमी काळात जास्त चाचण्या करण्याचे आव्हान पेलण्यासाठी साखळी पद्धतीचा वापर केला जातो. सामूहिक पद्धतीने चाचण्यांची ही पद्धत आहे. ही पद्धत काय आहे त्याचा आढावा आपण घेऊ या.
साखळी किंवा समूह चाचणी म्हणजे नेमके काय ?
साखळी किंवा समूह चाचणीत वेगवेगळ्या लोकांचे नमुने गोळा केले जातात व नंतर ते परीक्षानळीत एकत्र करून त्यांची पीसीआर चाचणी केली जाते. जर या एकत्रित केलेल्या स्त्राव नमुन्यांची चाचणी सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह आली तर मग त्या समूहातील लोकांची वेगवेगळी चाचणी केली जाते म्हणजे यात कालहरण होत नाही व सामाजिक संक्रमण कमी काळात लवकर शोधता येते. जर चाचणी नकारात्मक आली तर नमुन्यातील व्यक्तींची वेगवेगळी चाचणी केली जात नाही सर्वांची सामूहिक चाचणी नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह आली तर त्या समूहातील कुणालाही करोनाची लागण नाही असा त्याचा अर्थ लावला जातो. त्यामुळे सगळ्यांचीच चाचणी करून होणारा कालापव्यय टळतो शिवाय खर्चही वाचतो.
भारतीय वैद्यक परिषदेने नेमकी काय शिफारस केली आहे ?
भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने म्हटले आहे की, यात सरसकट दोन ते पाच नमुने एकत्रित घेऊन त्यांची पीसीआर चाचणी करावी मात्र पाच पेक्षा जास्त नमुने एकत्र करण्यात येऊ नयेत. खूप जास्त नमुने एकत्र करून तपासले तर त्या सामूहिक किंवा साखळी चाचणीची विश्वासार्हता कमी होऊ शकते. त्यामुळे पाचपेक्षा अधिक नमुने एकत्र करून जर चाचणी नकारात्मक किंवा निगेटिव्ह आली तर त्याआधारे घेतलेले निर्णय चुकीचे असतील कारण ती चाचणीच चुकीची ठरू शकते.
कुठल्या परिस्थितीत साखळी किंवा सामूहिक चाचणी वापरली जाते ?
साखळी चाचणी ही ज्या भागात करोनाचा प्रसार कमी आहे अशा भागातील लोकांसाठी वापरली जाते. जर एखाद्या भागात व्यक्तीगत पातळीवरील करोना चाचण्यांचा पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक येण्याचे प्रमाण 2 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर अशा परिस्थिती साखळी व सामुदायिक चाचण्या केल्या जातात. जर एखाद्या भागात सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह चाचण्यांचे प्रमाण दोन ते पाच टक्के असेल तर नमुने एकत्र करून पीसीआर चाचणी ही सामुदायिक सर्वेक्षणासाठी वापरण्यात येते पण ती केवळ लक्षणे नसलेले रूग्ण तपासण्यासाठी करतात.
साखळी चाचण्यांची संकल्पना अचानक कुठून आली ?
मेडआरएक्स मध्ये एक शोधनिबंध प्रकाशित झाला आहे त्यात या संकल्पनेचा उल्लेख असून जर एखाद्या समूहात सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह व्यक्तीगत चाचण्या कमी असतील तर साखळी चाचण्या करून अंदाज घ्यायला हरकत नाही असे त्यात म्हटले होते. नमुने एकत्र करून चाचणी केली तर त्यातून येणारे निष्कर्ष जर निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक असतील पुढील व्यक्तीगत चाचण्यांची गरज नसते. प्रत्येक नमुना वेगळा तपासण्यास लागणारा वेळ व खर्च त्यातून वाचतो. जिथे व्यक्तीगत चाचण्या सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण आधीच पाच टक्के पेक्षा जास्त आहे तेथे साखळी किंवा सामूहिक चाचणीचा उपयोग होत नाही.
सामूहिक किंवा साखळी चाचणी पद्धत महत्वाची का आहे ?
भारताची लोकसंख्या खूप जास्त आहे व चाचणी साधने पुरतील एवढी नाहीत शिवाय करोना साथ पसरत असताना वेगवेगळ्या चाचण्या करून वेळ घालवत बसणे परवडणारे नाही. शिवाय त्याचा खर्चही जास्त होऊ शकतो. त्यामुळे सामूहिक चाचण्यांची पद्धत उपयोगाची आहे. त्यात 2 टक्क्यांपेक्षा कमी व्यक्तीगत चाचण्या पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक असलेल्या भागात करोना पसरण्याचे प्रमाण किती आहे हे फार कमी वेळात शोधता येते.शिवाय अनेक रूग्ण असे असतात जे लक्षणे दाखवत नाहीत पण त्यांना संसर्ग असू शकतो त्यांचाही शोध कमी काळात व कमी खर्चात घेतला जाऊ शकतो पण ही पद्धत हॉटस्पॉट असलेल्या भागात उपयोगाची नाही. रिसर्च गेटच्या मते सामूहिक चाचण्या या घरोघरी जाऊन नमुने घेतल्यानंतर केल्या जातात. त्यामुळे कमी व मध्यम उत्पन्न गटाच्या भागात पटकन चाचण्या करून सामाजिक संक्रमण शोधता येते. यातून जर करोना संसर्गाची दुसरी लाट येणार असेल तर ती शोधता येणे शक्य आहे. सामूहिक किंवा साखळी चाचणी पद्धतीमुळे एकूण चाचण्यांचे प्रमाण ५६ ते ९७ टक्के कमी होते तरीही संसर्ग शोधण्यास मदत होते. जिथे कमी ते मध्यम प्रमाणात करोनाचा प्रसार असेल अशाच ठिकाणी ही युक्ती उपयोगाची आहे.